पंतप्रधान मोदी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भेट; कोणकोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?

पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केली भारताची भूमिका

पंतप्रधान मोदी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भेट; कोणकोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या द्विपक्षीय चर्चेकडे साऱ्या जगाचे लक्ष होते. गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात झालेल्या चर्चेत व्यापार, ऊर्जा आणि संरक्षण यासह विविध क्षेत्रात भारत आणि अमेरिका संबंध अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. ट्रम्प यांनी दुसऱ्या कार्यकाळात पदभार स्वीकारल्यानंतरची भारत आणि अमेरिका यांच्यात ही पहिलीच अधिकृत चर्चा होती. या बैठकीत भारताने अधिक अमेरिकन तेल आणि वायू खरेदी करण्यास सहमती दर्शविली, तर ट्रम्प यांनी घोषणा केली की अमेरिका भारताला लष्करी विक्री वाढवेल, यासह इतर महत्त्वाचे निर्णय घेतले.

MIGA आणि MAGA एकत्रितपणे समृद्धीसाठी एक मोठे भागीदार बनलेत

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, भारत MIGA (मेक इंडिया ग्रेट अगेन) कडे वाटचाल करत आहे, जे MAGA (मेक अमेरिका ग्रेट अगेन) चे त्यांचे रूप आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की MIGA आणि MAGA एकत्रितपणे समृद्धीसाठी एक मोठे भागीदार बनले आहेत. तसेच बैठकीनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आणि अमेरिकेने २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापारासाठी ५०० अब्ज डॉलर्सचे लक्ष्य ठेवले आहे, तसेच व्यापार तूट कमी करण्यासाठी भारत अमेरिकेकडून अधिक तेल आणि वायू आयात करणार आहे.

भारताचे हित प्रथम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांचे दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्याबद्दल भारतातील १४० कोटी जनतेच्या वतीने अभिनंदन केले. गेल्या वर्षी, भारतातील जनतेने मला तिसऱ्यांदा सत्ता देऊन सेवा करण्याची संधी दिली. पुढील चार वर्षे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत काम करण्यास मी उत्सुक आहे, असेही ते म्हणाले. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या भव्य आणि उबदार स्वागतामुळे अहमदाबादमधील ‘नमस्ते ट्रम्प’ आणि अमेरिकेतील ‘हाउडी मोदी’च्या आठवणी जाग्या झाल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेला प्रथम स्थान देतात, तसेच आपणही आपल्या देशाचे हित प्रथम स्थानी ठेवतो. एकत्रितपणे आपल्या दोन्ही देशांच्या प्रगती आणि समृद्धीकडे वाटचाल करू. यावर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, नरेंद्र मोदी एक महान नेते आहेत. भारत आणि अमेरिकेतील संबंध खूप मजबूत आहेत. मोदीजी भारतात खूप चांगले काम करत आहेत, प्रत्येकजण यावर चर्चा करत आहे.

दहशतवादी तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाला मान्यता दिल्याबद्दल आभार

ट्रम्प यांनी २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वुर राणा याला भारतात न्यायाला सामोरे जाण्यासाठी प्रत्यार्पणाला मान्यता दिली. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी सहकार्य करू. सध्याच्या काळात, सीमापार दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई करण्याची गरज आहे. मुंबई २६/११ दहशतवादी तहव्वुर राणा याचे प्रत्यार्पण करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभारही त्यांनी मानले. पुढे ट्रम्प म्हणाले की, दोन्ही देशांमधील संरक्षण संबंधांना मोठी चालना देण्यासाठी, अमेरिका भारताला त्यांच्या लष्करी विक्रीत अब्जावधी डॉलर्सची वाढ करणार आहे. तसेच ते भारताला पाचव्या पिढीतील एफ- ३५ स्टेल्थ जेट विमाने देतील.

हे ही वाचा:

मंत्रालयात दलाल हवेच…

मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू!

नवे आयकर विधेयक लोकसभेत सादर

श्रीदेव रवळनाथ पंचायतन देवस्थानचा पुनःप्रतिष्ठापना महोत्सव

रशिया- युक्रेन युद्धात भारत तटस्थ नाही, तर भारत शांततेच्या बाजूने

रशिया-युक्रेन युद्धाबद्दल ट्रम्प यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दलही नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले. भारत शांततेच्या बाजूने उभा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवाय हे युद्धाचे संकट कमी करण्याच्या ट्रम्प यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. नरेंद्र मोदी यांनी भारताची भूमिका स्पष्ट करताना म्हटले की, “जगाला वाटते की भारत तटस्थ आहे, परंतु भारत तटस्थ नाही. भारताची स्वतःची भूमिका आहे, ती शांतता आहे,” असे नरेंद्र मोदी म्हणाले. ट्रम्प यांनी भारत आणि चीनमधील एलएसीवरील दीर्घकालीन सीमा प्रश्न सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्याची ऑफरही दिली. “जर मी मदत करू शकलो तर मला मदत करायला आवडेल, कारण ते थांबवले पाहिजे. ते खूपच हिंसक आहे,” असे ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींचे कौतुक करत म्हटले की, पंतप्रधान मोदी भारतात चांगले काम करत आहेत. नरेंद्र मोदी हे एक महान नेता असून ते खूपच कठोर वाटाघाटी करणारे नेते आहेत. त्यांच्यात आणि माझ्यात कोणतीही स्पर्धा नाही. माझ्याहून ते खूप चांगले आहेत.

Exit mobile version