मणिपूरचे माजी मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी नुकताच आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राज्यपाल अजय भल्ला यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली होती. मणिपूरमधील मेतेई आणि कुकी समुदायांमधील हिंसाचारामुळे बिरेन सिंग यांच्यावर सतत टीका होत होती. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
९ फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर बिरेन सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्यासोबत प्रदेश भाजप अध्यक्ष ए शारदा, भाजपचे ईशान्य मणिपूर प्रभारी संबित पात्रा आणि सुमारे १९ आमदार उपस्थित होते. काँग्रेसकडून विधानसभेत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात येणार होता. तत्पूर्वी, मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
हे ही वाचा :
जामिया मिलियाचे १४ विद्यार्थी ताब्यात; निदर्शनावेळी तोडफोड!
दलाई लामा यांना केंद्राकडून झेड श्रेणीची सुरक्षा प्रदान!
दिल्लीपुढे न झुकणारे आदित्य ठाकरे दिल्लीत राहुल गांधींची हुजरेगिरी करतायेत!
गेल्या वर्षाच्या अखेरीस मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी मणिपूरमधील हिंसाचाराबद्दल जनतेची माफी मागितली होती. ते म्हणाले होते की, हे संपूर्ण वर्ष खूप दुर्दैवी गेले. गेल्या ३ मे पासून आज जे काही घडत आहे त्याबद्दल मला खेद व्यक्त करायचा आहे. अनेकांनी प्रियजन गमावले. अनेकांनी आपली घरे सोडली. मला वाईट वाटत आहे. मी माफी मागतो.
परंतु, आता आशा आहे की, गेल्या तीन ते चार महिन्यांतील शांततेच्या दिशेने प्रगती पाहिल्यानंतर, २०२५ मध्ये राज्यात स्थिती पूर्ववत होईल, असा विश्वास बिरेन सिंग यांनी व्यक्त केला. दरम्यान, बिरेन सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात नवा मुख्यमंत्री, नवे मंत्री मंडळ स्थापन होईल अशी चर्चा होती. मुख्यमंत्री पदासाठी अनेक नेत्यांची नावेही समोर येत होती. तत्पूर्वी, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली.