गुरुवारी उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. राजापूर मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेत त्या पक्षात प्रवेश केला. ठाण्यात हा प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. स्वतः एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत साळवी यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला. त्याचवेळी त्यांच्या मतदारसंघातील आमदार किरण सामंत, मंत्री उदय सामंत उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वी राजन साळवी यांनी आपल्या उपनेतेपदाचा राजीनामा सादर केल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र केल्याचे समोर आले होते.
आपल्या या नव्या वाटचालीबद्दल बोलताना राजन साळवी म्हणाले की, एकनाथ शिंदे हे माझे पहिल्यापासून गुरु होते. मागच्या काळात त्यांच्यासोबत मी जाऊ शकलो नाही. पण जाण्यासाठी निमित्त लागतं. आता मी शिंदे साहेबांचा आशिर्वाद घेतला आहे. ते म्हणाले, मी बाळासाहेबांचा लाडका शिवसैनिक आहे. त्यांना अभिप्रेत असलेले काम मी आजपर्यंत केले आणि त्यांच्याच विचारांचे काम मी पुढे नेणार आहे. माझ्या पराभवाला जी मंडळी कारणीभूत आहेत, त्या संबंधीची माहिती, पुरावे मी उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले. त्यानंतर वाटलं आता थांबावं. एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व महाराष्ट्राने स्वीकारलं आहे. त्यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा शिवसेना, धनुष्यबाण घेऊन लोकांमध्ये जाऊ.
हे ही वाचा:
मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू!
श्रीदेव रवळनाथ पंचायतन देवस्थानचा पुनःप्रतिष्ठापना महोत्सव
उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी यावेळी टोलेबाजी करत साळवी यांचे स्वागत केले. ते म्हणाले की, जिथे विचारांना लागली वाळवी, तिथे कसा राहिल राजन साळवी असा बॅनर मी अलिकडे वाचला होता. त्यामुळे तिकडे लागली वाळवी म्हणून इथे आले राजन साळवी, असे म्हणता येईल. शिंदे म्हणाले की, कोकणातील ढाण्या वाघ पुन्हा शिवसेनेच्या गुहेत आला. आतादेखील ते आमदार झाले असते. किरण सामंत यांनी राजन साळवी यांना तिकीट द्या म्हणाले होते. राजा का बेटा राजा नही बनेगा, जो काम करेगा वही आगे जायेगा.