केरळमधील पिरावोम येथे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सात वर्षांच्या चिमुकलीचा मृतदेह रविवारी नदीत सापडल्यानंतर एका कुटुंबातील चारही सदस्यांच्या मृत्यूचे गूढ अखेर उलगडले. याआधी तिची दृष्टीहीन आई विजी, दोन वर्षांचा भाऊ आणि वडील नारायणन यांचे मृतदेह वेगवेगळ्या दिवशी नदीत सापडले होते. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, तीव्र आर्थिक संकट आणि घरभाडे भरता न आल्यामुळे या कुटुंबाने टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
कोठामंगलम येथे भाड्याच्या घरात राहणाऱ्या या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. घरभाडे भरण्यासाठीही पैसे नसल्याने त्यांनी काही दिवसांपूर्वी पोलिसांकडे आर्थिक मदतीची विनंती केली होती. पोलिसांनी त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेत पर्यायी निवासाची व्यवस्था केली होती आणि रविवारी त्यांचे नवीन घरात स्थलांतर होणार होते. मात्र त्याआधीच हे संपूर्ण कुटुंब बेपत्ता झाले. तपासादरम्यान पोलिसांना पिरावोममधील एका हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, त्यामध्ये हे चौघेही एकत्र जेवण करताना दिसत आहेत. त्यानंतर काही तासांतच ही भीषण घटना घडल्याचे समोर आले.
शुक्रवारी आई आणि दोन वर्षांच्या मुलाचा मृतदेह नदीत आढळला. शनिवारी वडिलांचा मृतदेह सापडला, तर सात वर्षांच्या मुलीचा शोध सुरूच होता. अखेर रविवारी सकाळी अग्निशमन दल आणि पोलिसांच्या संयुक्त शोधमोहीमेदरम्यान तिचाही मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून, दारिद्र्य आणि आर्थिक विवंचनेमुळे एका निष्पाप कुटुंबाचा झालेला दुर्दैवी अंत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून सर्व बाजूंनी तपास सुरू ठेवला आहे.
