रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून ४ आणि ५ डिसेंबर रोजी भारत दौऱ्यावर येणार आहेत. रशियाच्या सरकारी वृत्तसंस्थांनी क्रेमलिनचा हवाला देत यासंबंधीची माहिती दिली आहे. तसेच परराष्ट्र मंत्रालयानेही शुक्रवारी अधिकृत निवेदनात या भेटीची पुष्टी केली आहे. या दौऱ्यादरम्यान, पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध विषयांवर चर्चा करतील. तर, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देखील रशियन राष्ट्राध्यक्षांचे स्वागत करतील आणि त्यांच्या सन्मानार्थ भोजन आयोजित करतील.
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, या भेटीमुळे भारत आणि रशियाच्या नेत्यांना द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीचा आढावा घेता येईल आणि सहकार्याच्या पुढील टप्प्याची दिशा निश्चित करता येईल. दोन्ही देशांच्या हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर दोन्ही बाजूंनी चर्चा होण्याची अपेक्षा आहे. ही बैठक २३ व्या भारत- रशिया वार्षिक शिखर परिषदेचा भाग म्हणून आयोजित केली जाईल. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या चर्चेत भागीदारीची स्थिती आणि दोन्ही देशांमधील दीर्घकालीन संबंध मजबूत करण्याच्या योजनांवर लक्ष केंद्रित केले जाईल.
हे ही वाचा:
स्थगिती नाही, सगळ्या निवडणुका होणारच!
मध्य प्रदेश- महाराष्ट्र- छत्तीसगड झोनमधील नक्षलवादी १ जानेवारी २०२६ रोजी आत्मसमर्पण करणार!
कपिल शर्मा कॅफे गोळीबार: सूत्रधाराला चीनी बनावटीच्या पिस्तुलसह अटक
तिकीट तपासनीसाने नौदल अधिकाऱ्याच्या महिलेचा खून केल्याचा संशय
“आगामी राजकीय भेट भारत आणि रशियाच्या नेतृत्वाला द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीचा आढावा घेण्याची आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी दृष्टिकोन निश्चित करण्याची आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी प्रदान करेल,” असे परराष्ट्र मंत्रालयाने एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे. पुतिन यांनी शेवटची २०२१ मध्ये नवी दिल्लीला भेट दिली होती, तर मोदी गेल्या वर्षी जुलैमध्ये वार्षिक शिखर परिषदेसाठी मॉस्कोला गेले होते.
