रशिया- युक्रेन युद्ध आणखी तीव्र झाले असून, युक्रेनने रशियाच्या सीमेत तब्बल ११०० किलोमीटर आत असलेल्या तातारस्तानमधील निझनेकाम्स्क शहरावर मोठा ड्रोन हल्ला केला आहे. या हल्ल्यात किमान १३ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये एका मुलाचाही समावेश आहे. रशियन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या हल्ल्यात ३९ जण जखमी झाले आहेत.
निझनेकाम्स्क हे रशियाची राजधानी मॉस्कोपासून सुमारे ८०० किलोमीटर पूर्वेला असलेल्या तातारस्तान प्रजासत्ताकातील महत्त्वाचे औद्योगिक शहर आहे. युक्रेनच्या सीमेपासून हे शहर सुमारे ११०० किलोमीटर अंतरावर आहे. रशियन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनने रात्रीच्या सुमारास रशियाच्या विविध भागांवर ४५० हून अधिक ड्रोन पाठवले. रशियाच्या हवाई संरक्षण यंत्रणेने यातील मोठ्या संख्येने ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. मात्र, तातारस्तानमधील निझनेकाम्स्कमध्ये करण्यात आलेल्या हल्ल्यामुळे मोठी जीवितहानी झाली. शहराचे महापौर रादमीर बेल्यायेव यांनी हल्ल्याची पुष्टी करत मृतांबद्दल शोक व्यक्त केला आहे.
युक्रेनच्या लष्कराने या हल्ल्यात टॅटनेफ्टच्या TANECO तेलशुद्धीकरण प्रकल्पाला लक्ष्य केल्याचे म्हटले आहे. या ठिकाणी आग लागल्याची माहितीही युक्रेनकडून देण्यात आली आहे. TANECO हे रशियातील महत्त्वाचे तेलशुद्धीकरण केंद्र आहे. २०२४ मध्ये या प्रकल्पाने सुमारे १.७ कोटी टन कच्च्या तेलावर प्रक्रिया केली होती. त्यातून सुमारे २७ लाख टन पेट्रोल आणि ८५ लाख टन डिझेलचे उत्पादन झाले होते. त्यामुळे या प्रकल्पावरील हल्ल्याचे केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे, तर रशियाच्या ऊर्जा पुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा:
भारतीय उच्चायुक्तांनी घेतली बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांची भेट
लष्करशी संबंधित गटाकडून काश्मिरी पंडितांना धमकी; कुटुंबांना लक्ष्य करण्याचा इशारा
लाल समुद्र ते हिंदी महासागर; भारतीय नौदलाने तेल टँकर्सना दिले ‘सुरक्षा कवच’!
रांचीमध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, वॉटर कॅननचा मारा
गेल्या काही महिन्यांत युक्रेनने रशियातील तेलशुद्धीकरण प्रकल्प आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर ड्रोन हल्ले वाढवले आहेत. युक्रेनचा उद्देश रशियाच्या तेल उत्पन्नाला आणि युद्धासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक संसाधनांना धक्का देणे हा असल्याचे अहवालांत नमूद करण्यात आले आहे. या हल्ल्याच्या अवघ्या एक दिवस आधी रशियाने युक्रेनमधील विविध भागांवर मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले केले होते. यामुळे दोन्ही देशांमधील ड्रोन युद्ध अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे.
