सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक ताण, शारीरिक थकवा आणि अस्वस्थता वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत दिवसाची सुरुवात योग्य पद्धतीने झाली, तर संपूर्ण दिवस सकारात्मक, ऊर्जावान आणि यशस्वी ठरतो. योगशास्त्रानुसार पहाटे, म्हणजेच ब्रह्ममुहूर्तात केलेली योगसाधना शरीर, मन आणि विचारांना संतुलित ठेवते. आता जाणून घेऊया, पहाटे उठल्यावर कोणती योगासने करावीत, जेणेकरून दिवस उत्तम जाईल.
प्राणायाम- श्वासातून ऊर्जा
पहाटे सर्वप्रथम प्राणायाम केल्याने शरीरातील प्राणशक्ती सक्रिय होते.
अनुलोम-विलोम : मेंदू शांत ठेवतो, तणाव कमी करतो आणि रक्ताभिसरण सुधारतो.
कपालभाती- पचनशक्ती वाढवते, वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
भ्रामरी- चिंता, चिडचिड कमी करून मन स्थिर करते.
दररोज किमान ५ ते १० मिनिटे प्राणायाम करणे लाभदायक ठरते.
सूर्यनमस्कार- पूर्ण शरीराचा व्यायाम
सूर्यनमस्कार हा योगासनांचा सर्वोत्तम संच मानला जातो. यातून संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. याशिवाय स्नायू देखील लवचिक होतात. रोगप्रतिकारशक्ती वाढते तसेच आत्मविश्वास आणि स्फूर्ती मिळते. सुरुवातीला ५ सूर्यनमस्कार करून हळूहळू संख्या वाढवावी.
ताडासन- स्थिरता आणि एकाग्रता
ताडासनामुळे शरीराचा समतोल सुधारतो. पाठीचा कणा मजबूत होतो. तसेच शरीराची उंची सुधारते. मन एकाग्रही राहते. हे आसन दिवसाच्या सुरुवातीला केल्यास कामात लक्ष केंद्रित राहते.
भुजंगासन- ऊर्जा आणि स्फूर्ती
भुजंगासन केल्याने शरीरात नवचैतन्य येते. पाठीचा आणि कंबरेचा त्रास कमी होतो. तसेच फुफ्फुसांची क्षमता वाढते. थकवा आणि आळस दूर होतो. सकाळी ३ ते ५ वेळा हे आसन करावे.
वज्रासन- पचनासाठी उपयुक्त
वज्रासन हे एकमेव आसन आहे जे जेवणानंतरही करता येते, पण सकाळी केल्यास त्याचा अधिक फायदा होतो. यामुळे पचनक्रिया सुधारते. गॅस व अॅसिडिटी कमी होते. तसेच मन शांत राहते.
ध्यान- मानसिक शांती
योगासनानंतर ५ ते १० मिनिटांचे ध्यान केल्यास मन पूर्णतः शांत होते. नकारात्मक विचार दूर होतात. निर्णयक्षमता वाढते. तसेच दिवस सकारात्मकतेने सुरू होतो.
हे ही वाचा..
पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाचा पराक्रम बघा..
योगासन करताना रिकाम्या पोटी आणि स्वच्छ, हवेशीर ठिकाणी करावीत. कोणताही आजार असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. पहाटे उठून नियमित योगासने आणि ध्यान केल्यास शरीर निरोगी, मन शांत आणि दिवस ऊर्जावान राहतो. योग ही केवळ व्यायामपद्धती नसून जीवनशैली आहे. दररोजची ही सवय आपले आयुष्य अधिक सकारात्मक आणि संतुलित बनवू शकते.
