एकूण ६५१९ उमेदवार विषयांकित पदाकरिता शिफारसपात्र
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दि. १७ डिसेंबर, २०२३ रोजी मुंबईसह औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हाकेंद्रांवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३ मधील लिपिक-टंकलेखक या संवर्गातील एकूण २७८ नियुक्ती प्राधिकारी कार्यालयांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण ६५१९ उमेदवार विषयांकित पदाकरिता शिफारसपात्र ठरले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील श्री. कटुळे तन्मय तानाजी (बैठक क्रमांक AU053165) हे राज्यातून प्रथम आले आहेत. मागासवर्गवारीमधून पुणे जिल्ह्यातील श्री. किसवे किशोर चंद्रकांत (बैठक क्रमांक- PN068345) हे राज्यात प्रथम आले आहेत तर महिला वर्गवारीमधून सांगली जिल्ह्यातील श्रीमती गावडे दुर्गा विजयराव (बैठक क्रमांक -PN071182) या राज्यात प्रथम आल्या आहेत.
अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत, आयोगाकडे ऑनलाईन पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.या संवर्गाकरिता प्रतीक्षायादी कार्यान्वित राहणार नाही. अधिक माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे आयोगाने कळविले आहे.
