बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीत के. अण्णामलाई यांच्या प्रचाराचा थेट फायदा भारतीय जनता पार्टीला झाल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. अण्णामलाई यांच्या उपस्थितीत प्रचार झालेल्या तीन वॉर्डमध्ये भाजप उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला असून, यामुळे विरोधकांची टीका भाजपाच्या पथ्यावर पडल्याचे चित्र दिसत आहे.
निवडणूक निकालानुसार, मलाड पश्चिमेतील वॉर्ड क्रमांक 47 मधून तेजिंदर सिंग तिवाना यांनी विजय मिळवला आहे. तसेच वॉर्ड क्रमांक 35 मधून योगेश वर्मा यांनी यश संपादन केले, तर चारकोप येथील वॉर्ड क्रमांक 19 मधून दक्षता कवठणकर यांनी बाजी मारली. या तिन्ही वॉर्डमध्ये भाजप उमेदवारांना स्पष्ट आघाडी मिळाली. प्रचारादरम्यान अण्णामलाई यांनी घेतलेल्या सभांना मोठी गर्दी झाली होती. याचा सकारात्मक परिणाम मतदानावर झाल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
महाराष्ट्रात महायुतीची घवघवीत आघाडी
‘मुंबईच्या जनतेने केला उद्धव ठाकरे यांच्या माफिया सेनेचा वध’
मुंबईत महिला नेतृत्वाच्या विजयाचा झंझावात!
मुंबईत महिला नेतृत्वाच्या विजयाचा झंझावात!
प्रचारादरम्यान अण्णामलाई यांनी मुंबईला “आंतरराष्ट्रीय शहर” असे संबोधले होते. या वक्तव्यावरून विरोधकांनी आक्षेप घेतला होता. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी अण्णामलाई यांच्यावर उपहासात्मक टीका करत ‘रसमलाई’ असा शब्दप्रयोग केला होता. मात्र निवडणूक निकालानंतर हाच मुद्दा भाजपासाठी फायद्याचा ठरला. भाजप कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर ‘रसमलाई’ हा शब्द प्रतीकात्मक पद्धतीने वापरून विजय साजरा केला.
भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना, “निकाल शांततेने मिळवले—आवाजाने नाही. मुंबईचे आभार,” असे म्हटले आहे. भाजपाने असा दावा केला की मतदारांनी भाषिक किंवा प्रादेशिक वादांपेक्षा विकासकेंद्रित राजकारणाला प्राधान्य दिले.
या निकालांमुळे भारतीय जनता पार्टी–महायुतीसाठी हे यश महत्त्वाचे मानले जात असून, बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील पुढील टप्प्यांसाठी भाजपाचा आत्मविश्वास अधिक बळावला आहे. वादातून सुरू झालेला ‘रसमलाई’ मुद्दा आता भाजपाच्या विजयाचे प्रतीक ठरताना दिसत आहे.
