४४ वर्षानंतर मुंबईत भाजपाचा महापौर; रितू तावडेंनी महापौरपदाची स्वीकारली सूत्रे

शिवसेनेच्या संजय घाडी यांनी स्वीकारला उपमहापौरपदाचा कार्यभार

४४ वर्षानंतर मुंबईत भाजपाचा महापौर; रितू तावडेंनी महापौरपदाची स्वीकारली सूत्रे

मुंबईला बुधवार, ११ फेब्रुवारी रोजी अखेर महापौर मिळाला असून भाजपच्या रितू तावडे यांनी अधिकृतरित्या महापौर पदाचा पदभार स्वीकारला. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेतील प्रशासक राजवट संपुष्टात येऊन सत्ता लोकप्रतिनिधींच्या हाती आली.

भाजपच्या रितू तावडे यांनी महापौरपदाची आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या संजय घाडी यांनी उपमहापौरपदाची सूत्रे हाती घेतली आहे. महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत विरोधात कोणताही उमेदवार नसल्याने रितू तावडे आणि संजय घाडी यांची बिनविरोध निवड झाली. यामुळे तब्बल ४४ वर्षांनंतर मुंबई महानगरपालिकेत भाजपाकडे महापौर पदाची सूत्रे आली आहेत. महापौर आणि उपमहापौर यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हातून पदभार स्वीकारला.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. तर महायुतीने महापौरपदाचं बहुमत मिळवलं होतं. त्यामुळे भाजपचा महापौर बनवण्याचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानंतर भाजपने रितू तावडे यांची भाजपचे महापौरपदाचे उमेदवार म्हणून नाव घोषित केले तर शिवसेनेने संजय घाडी यांचे उपमहापौर पदाचे उमेदवार म्हणून नाव घोषित केले. दुसरीकडे, संख्याबळाअभावी उद्धव ठाकरे यांच्या गटाने महापौरपदाच्या निवडणुकीत उमेदवार दिला नाही. त्यामुळे या निवडणुकीत विरोधात एकही अर्ज आला नसल्याने रितू तावडे आणि संजय घाडी यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्र्यांसह दोन्ही पक्षांचे नेते उपस्थित होते.

रितू तावडे या भाजपच्या मुंबईच्या दुसऱ्या महापौर ठरल्या आहेत. यापूर्वी १९८२ मध्ये प्रभाकर पै हे भाजपचे मुंबईचे महापौर झाले होते. त्यानंतर रितू तावडे यांना भाजपच्या दुसऱ्या महापौर बनण्याचा मान मिळाला आहे. रितू तावडे या घाटकोपरच्या नगरसेविका आहेत. यापूर्वी त्यांनी मुंबई महापालिकेत नगरसेविका म्हणून काम पाहिलं होतं. त्यांनी शिक्षण समितीच्या अध्यक्षा म्हणूनही काम पाहिलं होतं.

हे ही वाचा:

जनरल नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तक प्रकरणी पेंग्विन प्रकाशनाला नोटीस

भारत अमेरिका व्यापार करारात काही महत्त्वाचे बदल

मालाडमध्ये २२ फेब्रुवारीला शरीरसौष्ठवाचा थरार

सरकारी कार्यक्रमांमध्ये सहा कडव्यांचे ‘वंदे मातरम्’ अनिवार्य!

नवीन नियमानुसार पिठासीन अधिकारी म्हणून आयुक्त भूषण गगराणी विराजमान झाले. या अगोदर ज्येष्ठ सदस्य महापौर निवडणुकीवेळी कार्यभार स्वीकारायचे. यावरून ठाकरे गटाने आक्षेप घेतला होता. नव्या महापौर निवडीवेळी पीठासीन अधिकारी कोण असावा? याचा नियम सरकारने अधिसूचनेद्वारे बदलला आहे. आधीच्या नियमानुसार मावळते महापौर किंवा सर्वांत ज्येष्ठ नगरसेवक पीठासीन अधिकारी असायचे. नव्या अधिसूचनेनुसार महापौर निवडीचे अधिकार प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला देण्यात आले आहेत. सध्याचे आयुक्त भूषण गगराणी यांचा दर्जा प्रधान सचिवाचा असल्याने तेच पीठासीन अधिकारी आहेत.

Exit mobile version