मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतमोजणीदरम्यान वापरात येणाऱ्या ‘पाडू’ मशीनबाबत मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की PADU (Printing Auxiliary Display Unit) हे ईव्हीएमसाठीचे पूरक यंत्र असून, ते कोणत्याही परिस्थितीत ईव्हीएमला पर्याय म्हणून वापरले जाणार नाही. ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्यासच पाडू मशीन बॅकअप म्हणून वापरण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
साधारणपणे मतमोजणी करताना ईव्हीएमच्या कंट्रोल युनिटवरील डिस्प्लेवर निकाल दिसतो. मात्र, काही वेळा डिस्प्ले बंद पडणे, आकडे स्पष्ट न दिसणे किंवा तांत्रिक अडचण निर्माण होण्याची शक्यता असते. अशा वेळी मतमोजणी थांबू नये, यासाठी पाडू मशीनचा उपयोग केला जाणार आहे. ईव्हीएमला जोडल्यावर हे मशीन मतांची माहिती थेट कागदावर प्रिंट करून देते आणि स्वतंत्र स्क्रीनवरही निकाल स्पष्टपणे दाखवते.
हे ही वाचा:
“उत्तर भारतात महिलांना घरीच राहण्यास सांगितले जाते” द्रमुक खासदार बरळले
मुंबई महापालिका निवडणुकीत वापरली जाणारी ‘पाडू’ मशीन काय आहे?
चार वर्षांनंतर आयसीसी वनडे रँकिंगमध्ये विराट कोहली पुन्हा अव्वल
सोन्या-चांदीने गाठले आकाश, नवे उच्चांक प्रस्थापित
भूषण गगराणी यांनी सांगितले की पाडू मशीन सर्व मतमोजणी केंद्रांवर सरसकट वापरले जाणार नाही. केवळ अत्यावश्यक परिस्थितीतच ते वापरण्याची परवानगी असेल. त्यामुळे मतमोजणी प्रक्रियेत कोणताही बदल होणार नाही किंवा नव्या पद्धतीने मतदान अथवा मोजणी केली जाणार नाही.
निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता राखणे, तांत्रिक अडथळ्यांमुळे होणारा वेळेचा अपव्यय टाळणे आणि निकालाबाबत कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये, हा पाडू मशीन वापरण्यामागचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाडू मशीनवर राजकीय चर्चा सुरू असली, तरी प्रशासनाच्या मते ही केवळ तांत्रिक बॅकअप व्यवस्था असून, संपूर्ण प्रक्रिया निवडणूक नियमांनुसारच पार पाडली जाणार आहे.
