गेल्या काही वर्षात एक ट्रेण्ड निर्माण झालेला आहे. जागतिक नेते दिल्लीत न येता थेट मुंबईत दाखल होतात. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात हा ट्रेण्ड सुरू झाला. यूकेचे पंतप्रधान किअर स्टार्मर यांच्यानंतर आता फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रॉन तीन दिवसांच्या भारत भेटीवर आले असताना मुंबईत उतरले. मुंबई हे जागतिक कीर्तीचे शहर आहे. देशाची आर्थिक राजधानी आहे. फ्रान्सचा सर्वोच्च नेता भारतात दाखल होतो आणि पंतप्रधान मोदी त्यांची पहिली भेट मुंबईत घेतात ही बाब खचितच महत्वाची आहे. मुंबईचे महत्व वाढवणारी आहे. हा मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा आणि दिल्लीला जोडण्याचा डाव आहे, अशी ओरड कऱण्याची संधी देणारी मॅक्रॉन यांची भेट आहे.
महानगर पालिका निवडणुकीत पुन्हा एकदा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची हाकाटी पिटण्यात आली होती. ती निवडणुकी पुरती असते. निवडणुका संपल्या की मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डावही संपतो. मुंबई तोडण्याची हाळी देणारे ते लोक आहेत, ज्यांच्या कार्यकाळात मुंबईत फक्त झोपड्या वाढल्या, गर्दी वाढली, मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला गेला. मुंबई अधिक सुदंर आणि समृद्ध करण्यासाठी त्यांनी काहीही केले नाही. ज्या मोदींवर मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा आरोप झाला. त्यांनीच मुंबईचे महत्व आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढवण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला दिसतो. हे सगळे शांतपणे, नियोजनबद्ध रित्या, कोणतीही भाषणबाजी आणि ओरड केल्याविना केले. ज्या वेगाने हे आकारास आले, त्या वेगाचे कौतूक व्हायलाच हवे.
जागतिक दर्जाचे शहर बनण्यासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा लागतात. उत्तम दर्जाची सार्वजनिक वाहतुक सेवा लागते. हे सगळे गेल्या दहा वर्षात एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवण्यात आले आहे. फक्त मुंबई पुरते नाही. म्हणजे मुंबईत जागतिक दर्जाची मेट्रो सेवा, पूल, बोगदे तयार करण्यात आले आहेतच, शिवाय मुंबईला देशभरातील महत्वाच्या शहरांशी जोडणारे भव्य प्रकल्प आकार घेतायत. अनेक मार्गी लागले आहेत. अनेकांच्या घोषणा झाल्या आहेत.
जागतिक नेत्यांना मुंबईत आमंत्रित करण्यापूर्वी हजारो कोटींचे पायाभूत सुविधांचे प्रकल्प मार्गी लावून मुंबई चमकवण्याचे काम केंद्र सरकारने केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते तडफेने पार पाडले. जागतिक दर्जाचे शहर म्हणजे फक्त टोलेजंग टॉवरची गर्दी नाही. जागतिक दर्जाच्या सोयीसुविधाही हव्यात.
हे ही वाचा:
केरळ स्टोरी २ येतोय…’लव्ह जिहाद’मुळे तीन मुलींच्या उद्ध्वस्त आयुष्याची कथा!
इस्रायली महिलेवर बलात्कार तसेच पर्यटकाचा खूनप्रकरणात तिघांना मृत्युदंड
हळद आणि दूध: आरोग्यासाठी नैसर्गिक अमृत
उत्तर प्रदेश भीतीकडून विश्वासाकडे…ना कर्फ्यू, ना दंगली!
मुंबईच्या मेट्रोत बसून उपनगरातील रहीवासी थेट दक्षिण मुंबईत दाखल होतात. ना उकाडा, ना प्रदूषण, ना धूळीचा मारा. मस्त गारे गार प्रवास. तुम्ही जेव्हा लोकांना घरी बोलवता तेव्हा घराची मांडणीही सुबक आणि सुंदर हवी. मोदी आणि फडणवीसांच्या जोडगोळीने गेल्या दहा वर्षात हे करून दाखवले आहे. चांगल्या कामांसाठी चांगली माणसे योग्य ठिकाणी ठेवावी लागतात. मविआच्या राजवटीत मेट्रो वुमन अश्विनी भिडे यांचे पंख कापण्यात आले होते. त्यांना डीप फ्रीजरमध्ये टाकण्यात आले होते. फडणवीसांनी अशी कर्तबगार अधिकाऱ्यांचा शहराच्या विकासासाठी उत्तम उपयोग केला. फ्रान्स सारख्या सुंदर आणि विकसित देशाचा राष्ट्राध्यक्ष मुंबईच्या प्रेमात पडावा अशाप्रकारे मुंबईला सजवण्याचा प्रयत्न होतो आहे.
जागतिक दर्जाचे नेते मुंबईत येतील तेव्हा त्यांच्या नजरेस जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा पडाव्यात विचार या मागे होता. कफ परेडपर्यंत पसरलेली जागतिक दर्जाची मेट्रो सेवा, वरळी वांद्रे सिलिंक, कोस्टल रोड, भुयारी मार्ग पाहील्यानंतर खरोखरच आपण एका जागतिक दर्जाच्या शहरात आहोत, याची जाणीव होते. मुंबईचा हा बदललेला चेहरा जागतिक पातळीवर काम करणारे नेते, उद्योजक यांना निश्चितपणे सुखावणारा आहे. यूपीएच्या कार्यकाळ मुंबई फक्त बॉम्बस्फोट आणि घातपातांसाठी चर्चेत होती. हे चित्र आता पूर्णपणे बदललेले आहे.
प्रदूषण, ठिकठिकाणी वाढत असलेल्या झोपड्या, वाहनांचा गोंगाट, अपुऱ्या मोकळ्या जागा अशा काही समस्या आहेत. परंतु ज्या वेगाने काम सुरू आहे, ते पाहता येत्या काही वर्षात मुंबई अधिक सुंदर होईल याबाबत कोणाच्या मनात शंका नाही. तिसऱ्या मुंबईचे काम सुरू झालेले आहे. गर्दी कमी करण्याच्या दिशेने काम सुरू आहे.
यापूर्वी बड्या देशांचे नेते मुंबईत येत होते. परंतु त्याची कारणे वेगळी होती. यूपीएच्या काळात मुंबईवर २६ /११ चा दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर काही आठवड्यात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझी शोकसंवेदना व्यक्त करण्यासाठी मुंबईत आले होते. कारण या हल्ल्यात दोन फ्रेन्च नागरीक ठार झाले होते. २०१० मध्ये यूकेचे पंतप्रधान डेव्हीड कॅमरुन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा मुंबईत आले होते. त्यांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण केली.
जागतिक नेते दिल्लीत उतरतात राष्ट्रपती भवन, हैदराबाद हाऊस, पंतप्रधान निवास इथे गाठीभेटी करतात. आग्य्राला भेट देऊन ताजमहाल सोबत एखादा फोटा काढतात आणि त्यांच्या देशात परतात हा ट्रेण्ड मोदींनी बदलला. दिल्ली पलिकडे गाठीभेटी होऊ शकतात आणि ताजमहाल शिवाय पाहण्यासारखे बरेच आहे, हे दाखवण्याचा मोदींनी प्रयत्न केला. तो यशस्वी ठरलेला आहे.
जागतिक नेत्यांना मुंबईत पाचारण करण्याची सुरूवात केली. कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. इथे जागतिक नेते उद्योजकांच्या ताफ्यासोबत येऊ लागले. महाराष्ट्रातील उद्योजकांशी चर्चा करू लागले. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू २०१८ मध्ये मुंबईत आले होते. किअर स्टार्मर यांचे गेल्या वर्षी मुंबईत आले होते. मॅक्रॉन काल रात्री मुंबईत दाखल झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांचे स्वागत केले.
मोदी दिल्लीचे महत्व कमी करत नाहीत. ते दिल्लीच्या रांगेत मुंबई, अहमदाबाद, वाराणसीला उभे कऱण्याचा प्रय़त्न करत आहेत. २०१७ मध्ये जपानचे दिवंगत पंतप्रधान शिंजो आबे आधी अहमदाबादेत उतरले, तिथून ते वाराणसी आणि शेवटी दिल्लीत गेले. २०२० मध्ये डोनाल्ड ट्रम्प अहमदाबादेत आले होते. त्याच परंपरेनुसार मॅक्रॉन मुंबईत दाखल झाले आहेत.
दुपारी तीन वाजता राजभवन येथे पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन यांची राजभवन येथे भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये व्यापार, सामरिक भागीदारी, तंत्रज्ञान आणि जागतिक राजकारणाबाबत सविस्तर चर्चा झाली. इंडीया फ्रान्स इनोव्हेशन फोरमची ताज पॅलेसमध्ये बैठक, गेट वे ऑफ इंडीया येथे इंडीया फ्रान्स ईयर ऑफ इनोव्हेशन २०२६ या उपक्रमाचा शुभारंभ करून ते नवी दिल्लीला रवाना होणार आहेत.
ताज पॅलेसमध्ये होणरी इंडीया फ्रान्स इनोव्हेशन फोरमची बैठक महत्वाची आहे. कारण या बैठकीत उद्योग जगतातील बडी मंडळी, स्टार्टअप्सशी संबंधित उद्योजक, संशोधन क्षेत्रात काम करणारे असे लोक एकत्र येणार आहेत.
मॅक्रॉन या भेटीत २६११ च्या दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्या दोन नागरीकांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. लोकांना पुन्हा एकदा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाची आठवण करून देण्यात मोदी यशस्वी ठरले आहेत.
(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
