विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या लग्नाची चर्चा होत असते. ते लग्न कधी जुळणार याबाबतही वेगवेगळे अंदाज सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. पण राहुल गांधींमुळे एखाद्याने लग्नाचा विचार सोडून दिला अशी घटना प्रथमच घडली आहे. सध्या समाजमाध्यमांवर एका तरुणीची पोस्ट चर्चेत आली आहे. लग्नासाठी तिला एका देखण्या तरुणाची मागणी आली होती. त्याचे वार्षिक वेतन तब्बल ४० लाख रुपये होते आणि त्याचे कुटुंबही चांगल्या पार्श्वभूमीचे होते. मात्र, केवळ एका कारणामुळे या तरुणीने त्याचा विवाहाचा प्रस्ताव नाकारल्याचा दावा केला आहे.
तरुणीने एक्सवर पोस्ट करत आपण त्या मुलाला का नकार दिला याचे वर्णन केले आहे. तरुणीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, तिला नुकताच एका तरुणाचा विवाहाचा प्रस्ताव आला होता. तो दिसायला देखणा होता, त्याचे वार्षिक वेतन ४० लाख रुपये होते आणि त्याचे कुटुंबही चांगले होते. मात्र, त्याच्या समाजमाध्यमावरील व्यक्तिचित्रात राहुल गांधी यांना आदर्श मानल्याचे दिसल्यानंतर तिने हा प्रस्ताव नाकारण्याचा निर्णय घेतला.
हे ही वाचा:
एफडीधारकांसाठी मोठी बातमी! आता व्याजदराची माहिती रोज मिळणार
भारत-मॉरिशसदरम्यान ५ वर्षांचा मोठा इंधन करार
ब्रिटन-युरोपच्या गुंतवणुकीला भारताचा ‘ग्रीन चॅनेल’
अभ्यास न केल्याने शिक्षिकेने थप्पड मारली; ६ वर्षांचा मुलगा तिथेच गतप्राण
तिने राहुल गांधी यांच्यावर टीका करत, एखादी व्यक्ती ज्याला आपला आदर्श मानते, त्यावरून तिच्या विचारसरणीबद्दल अंदाज बांधता येतो, असा दावा केला. या तरुणीने आपल्या निर्णयाचे समर्थन करताना म्हटले आहे की, तिच्यासाठी पैसा, सौंदर्य किंवा मोठे वेतन यापेक्षा देश आणि धर्म अधिक महत्त्वाचे आहेत.
तिने स्वतःला राष्ट्रवादी हिंदू म्हणत, आपल्या विचारसरणीशी जुळणारा जीवनसाथी निवडणे आपल्यासाठी महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. तिच्या मते, विवाह हा केवळ आर्थिक स्थैर्य किंवा बाह्य व्यक्तिमत्त्व पाहून करण्याचा निर्णय नसून, दोघांच्या विचारांमध्ये आणि मूल्यांमध्येही सुसंगती असणे आवश्यक आहे.
समाजमाध्यमांवर पोस्टची चर्चा
ही पोस्ट आरुही रेड्डी नावाच्या समाजमाध्यम वापरकर्त्याने १७ ऑगस्ट रोजी केल्याचे उपलब्ध वृत्तांत नमूद आहे. त्यानंतर पोस्ट समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात चर्चेत आली. या प्रकरणावर समाजमाध्यमांवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
