राहुल गांधींचा दावा खोटा; कर्नाटकचे सर्वेक्षण म्हणते ईव्हीएम योग्य!

भाजपकडून जोरदार टीका

राहुल गांधींचा दावा खोटा; कर्नाटकचे सर्वेक्षण म्हणते ईव्हीएम योग्य!

कर्नाटकातील काँग्रेस नेतृत्वाखालील सरकारने २०२४ च्या लोकसभा निवडणुकांबाबत करवून घेतलेल्या एका सर्वेक्षणात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनबाबत (ईव्हीएम) जनतेचा मोठ्या प्रमाणावर विश्वास असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निष्कर्षांनंतर भाजपने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वारंवार निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या वक्तव्यांवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

“Evaluation of Endline Survey of KAP (Knowledge, Attitude and Practice) of Citizens” या नावाच्या या सर्वेक्षणानुसार, तब्बल ८३.६१ टक्के उत्तरदात्यांनी ईव्हीएम विश्वसनीय असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. एकूण उत्तरदात्यांपैकी ६९.३९ टक्के लोकांनी ईव्हीएम अचूक निकाल देतात याला सहमती दर्शवली, तर १४.२२ टक्के लोकांनी यास ठाम सहमती दिली.

हे सर्वेक्षण कर्नाटक सरकारने मुख्य निवडणूक अधिकारी व्ही. अंबुकुमार यांच्या माध्यमातून करवून घेतले होते. यामध्ये बेंगळुरू, बेळगावी, कलबुर्गी आणि म्हैसूर या प्रशासकीय विभागांतील १०२ विधानसभा मतदारसंघांमधील ५,१०० नागरिकांचा समावेश होता.

विभागनिहाय निष्कर्ष

विभागनिहाय आकडेवारीनुसार, कलबुर्गी विभागात ईव्हीएमवर सर्वाधिक विश्वास दिसून आला. येथे ८३.२४ टक्के लोकांनी सहमती दर्शवली, तर ११.२४ टक्के लोकांनी ठाम सहमती व्यक्त केली.

हे ही वाचा:

काळा लसूण : हृदय, यकृत आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी फायदेशीर

बांगलादेशमध्ये हिंदू व्यावसायिकाला चाकूने मारहाण करून जाळले

पानाच्या सेवनाचे सात मोठे फायदे

ईव्ही, सोलार पॅनल, डेटा सेंटरमुळे तांब्याला सोन्याची चमक

म्हैसूर विभागात ७०.६७ टक्के लोकांनी सहमती, तर १७.९२ टक्के लोकांनी ठाम सहमती दर्शवली. बेळगावी विभागात ६३.९० टक्के लोकांनी सहमती आणि २१.४३ टक्के लोकांनी ठाम सहमती नोंदवली.

बेंगळुरू विभागात ठाम सहमतीचे प्रमाण सर्वात कमी म्हणजे ९.२८ टक्के होते, तरीही ६३.६७ टक्के लोकांनी ईव्हीएम वर विश्वास व्यक्त केला. तटस्थ मतांचे प्रमाण बेंगळुरूमध्ये सर्वाधिक १५.६७ टक्के होते, जे इतर विभागांच्या तुलनेत जास्त आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणुकांमध्ये ईव्हीएम मध्ये छेडछाड आणि ‘व्होट चोरी’ झाल्याचा आरोप करत भाजप आणि भारतीय निवडणूक आयोगावर वारंवार टीका केली आहे.

या सर्वेक्षणावर प्रतिक्रिया देताना, कर्नाटक भाजपचे विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले, अनेक वर्षांपासून राहुल गांधी देशभर फिरून एकच गोष्ट सांगत आहेत – भारतातील लोकशाही धोक्यात आहे, ईव्हीरम विश्वासार्ह नाहीत आणि संस्थांवर विश्वास ठेवता येत नाही.

भाजपने म्हटले की, या राज्यव्यापी सर्वेक्षणातून हे स्पष्ट झाले आहे की लोकांना निवडणुकांवर, ईव्हीएमवर आणि भारताच्या लोकशाही प्रक्रियेवर विश्वास आहे, आणि हे निष्कर्ष काँग्रेससाठी “थेट गालावर बसलेली चपराक” आहेत.

भाजपने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारवरही टीका करत सांगितले की, जनतेचा स्पष्ट विश्वास असतानाही, सिद्धरामय्या सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकांद्वारे घेण्याचा निर्णय घेत आहे. यामुळे छेडछाड, विलंब आणि गैरवापरासाठी ओळखली जाणारी जुनी पद्धत पुन्हा जिवंत केली जात आहे.

भाजपने पुढे आरोप केला की, काँग्रेस पक्ष निवडणुका हरला की संस्थांवर प्रश्न उपस्थित करतो आणि जिंकल्यावर त्याच व्यवस्थेचे कौतुक करतो. हे तत्त्वनिष्ठ राजकारण नाही, तर सोयीचे राजकारण आहे. बनावट कथानकं रचूनही ही वस्तुस्थिती आता लपवता येणार नाही,” असे भाजपने स्पष्ट केले.

Exit mobile version