वन्यप्राण्यांच्या शिकारीचा शौकिन असलेला अलिबाग राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार) तालुकाध्यक्ष जयेंद्र भगत याच्या अटकेनंतर कोणती कठोर कारवाई होणार का, पक्ष यासंदर्भात आता तरी काही कठोर पावले उचलणार का, असा संतप्त सवाल सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.
काही दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातून राष्ट्रवादीचा अलिबाग तालुका अध्यक्ष जयेंद्र भगत याला पोलिसांनी अटक केली होती. सध्या त्याला जामीन मिळाला असल्याचे कळते. या जयेंद्र भगतच्या घरात भेकराचे मांस फ्रीजमध्ये ठेवलेले आढळले आणि त्यासंदर्भात त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. या सगळ्या शिकारप्रकरणात कुणाची बंदूक वापरली, बंदुकीचा परवाना आहे का, या प्रश्नांचा मागही काढला जात आहे. ती बंदूक विनापरवाना आहे, अशीही चर्चा आहे.
पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली होती. या कारवाईनंतर सदर राष्ट्रवादी तालुकाध्यक्षाच्या शिकारीच्या शौकाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. जयेंद्र भगतने फणसाड अभयारण्यात भेकराची शिकार केल्याचे म्हटले जात आहे. या शिकारीनंतर त्याने भेकराचे मांस घरात ठेवून घेतले. वन्यजीवांची शिकार करण्यास बंदी असताना देखील त्याने अशाप्रकारे कायद्याचे उल्लंघन करून शिकार केल्यामुळे वनमंत्री, वनखाते हे यासंदर्भात कोणती कठोर पावले उचलणार याकडेही लोकांचे लक्ष आहे. जयेंद्र भगतने भेकराचे मांस घरात ठेवल्याची गुप्त माहिती पोलिसांना कळल्यावर त्याच्या घरावर छापा टाकण्यात आला.
हे ही वाचा:
टीव्ही चॅनेलवर इस्रायलला पाठिंबा दिल्याबद्दल पाकिस्तानी पत्रकाराची हत्या
छठ पूजा सणादरम्यान देशभरात ५०,००० कोटींची उलाढाल
बुमराहला तयारीची कला माहितेय : सूर्यकुमार
इंडीचा ढोंगीपणा; १२ राज्यात विरोध करत महाराष्ट्रात एसआयआरची मागणी
पोलीस निरीक्षक एस. व्ही. लांडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने जयेंद्र भगत यांच्या घरावर छापा टाकला. या छाप्या दरम्यान जयेंद्र भगतच्या घरातील फ्रिजमधून सुमारे एक किलो मांस जप्त केले होते. पोलिसांनी जप्त केलेले भेकराचे मांस आणि जयेंद्र भगत यांना वनविभागाच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वन विभागामार्फत केला जात आहे.
जयेंद्र भगतचा पूर्वेइतिहास गुन्हेगारीचा आहे. सदर भेकराची शिकार करताना जयेंद्र भगतसोबत आणखी कोण होते, याचाही शोध पोलिस घेत आहेत. वन विभागाकडून तपासणीअंती प्राण्याची ओळखही निश्चित होणार आहे.
बेकायदा उत्खननातही सामील
दरम्यान, २०२२मध्ये याच जयेंद्र भगतवर अलिबागमधील वाडगाव येथे बेकायदा उत्खनन केल्याबद्दल आरोप होत होते. शेकापचे जयंत पाटील यांनी सभागृहात हा प्रश्न उपस्थित केला होता. तेथील डोंगर बेकायदा पद्धतीने कापण्यात आल्याच्या घटना घडत होत्या आणि त्यातून निसर्गाची अपरिमित हानी होत असल्याचे दिसत होते. मात्र त्याकडे प्रशासनाने साफ दुर्लक्ष केल्याचे आढळले होते. या बेकायदा उत्खननावर बंदी घालण्यात तत्कालिन तहसिलदार, जिल्हाधिकारी अपयशी ठरत असल्याचा आरोप केला जात होता. पण त्यावर ठोस कारवाई होत नव्हती. आता तीन वर्षांनी याच जयेंद्र भगतला वन्यप्राण्यांच्या शिकार आणि मांस तस्करीप्रकरणी पोलिसांनी अटक केली.
जयेंद्र भगतकडून गेल्या वर्षी निवडणुकीच्या काळात स्थानिक आदिवासींना मारहाण झाल्याचा आरोपही केला गेला होता. त्यांना वेठबिगारासारखी वागणूक भगत याच्याकडून दिली जात असल्याचाही आरोप होत होता.
