भारताचा टी२० कर्णधार सूर्यकुमार यादवने जसप्रीत बुमराहच्या संघात असण्याचं महत्त्व सांगितलं आहे. सूर्याच्या म्हणण्यानुसार, बुमराह हा असा खेळाडू आहे जो गरज पडल्यास जबाबदारी उचलायला नेहमी तयार असतो.
अलीकडेच संपलेल्या वनडे मालिकेसाठी बुमराहला विश्रांती देण्यात आली होती. मात्र, तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणाऱ्या टी२० मालिकेत खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही मालिका २९ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
सूर्यकुमार म्हणाला, “पॉवरप्लेमध्ये विकेट घेणं नेहमीच आव्हानात्मक असतं. आपण पाहिलंय की बुमराहनं टी२० विश्वचषकात किती प्रभावी गोलंदाजी केली. एशिया कपमध्येही त्यानं पॉवरप्लेमध्ये दोन ओव्हर्स टाकण्याची जबाबदारी स्वतः घेतली होती. हे खूप छान आहे की तो नेहमी पुढे येतो आणि जबाबदारी स्वीकारतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पॉवरप्लेमध्ये ही एक छान स्पर्धा असेल.”
कर्णधार पुढे म्हणाला, “बुमराहनं गेल्या अनेक वर्षांत क्रिकेटमध्ये स्वतःला सर्वोच्च स्थानी ठेवले आहे. त्याला चांगल्या मालिकेसाठी तयारी कशी करायची हे उत्तम माहिती आहे. त्यानं भारतातील अनेक खेळाडूंपेक्षा जास्त वेळा ऑस्ट्रेलियाचा दौरा केला आहे. त्यामुळे सर्वजण त्याच्याकडून सल्ला घेत आहेत. तो अत्यंत मोकळा आणि मदत करणारा आहे. तो मैदानात उतरतो तेव्हा आत्मविश्वास वाढतो. ऑस्ट्रेलियात खेळण्यासाठी तो संघात असणं ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे.”
संघाचं लक्ष सध्या बुमराहला पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी तंदुरुस्त आणि ऊर्जावान ठेवण्यावर आहे. मात्र, तो या पाचही टी२० सामन्यांमध्ये खेळेल की वर्कलोड मॅनेजमेंटसाठी काही सामन्यांत विश्रांती घेईल, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.







