भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समधील जी ७ परिषदेदरम्यान दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत पश्चिम आशियातील संघर्षात मृत्यूमुखी पडलेल्या भारतीय खलाशांचा मुद्दा उपस्थित केला.
“नवीन भागीदारी निर्माण करणे आणि आंतरराष्ट्रीय एकात्मता पुनर्स्थापित करणे” या विषयावरील सत्रात बोलताना मोदी म्हणाले की, पश्चिम आशियातील संघर्षामुळे त्या प्रदेशातील अनेक मैत्रीपूर्ण देशांना मानवी आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.
मोदी म्हणाले, पश्चिम आशियात शांततेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये झालेल्या प्रगतीचे आम्ही स्वागत करतो. या संघर्षामुळे आपल्या मैत्रीपूर्ण देशांमध्ये जीवित आणि मालमत्तेची मोठी हानी झाली आहे. होर्मुझमधील सागरी व्यापारात अडथळे निर्माण झाल्याने जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. अनेक भारतीय नागरिकांनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत.”
अमेरिकन हल्ल्यांनंतर मुद्दा उपस्थित
हा मुद्दा मोदींनी अशा वेळी मांडला जेव्हा काही दिवसांपूर्वी एमटी सेटबेलो या तेलवाहू जहाजावर अमेरिकन लष्कराने केलेल्या कारवाईत तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला होता.
अमेरिकन सेंट्रल कमांडने दावा केला होता की भारतीय खलाशी असलेल्या काही जहाजांनी इराणविरोधी निर्बंधांचे उल्लंघन केले होते किंवा इराणी तेल वाहतूक करण्याचा प्रयत्न केला होता.
समुद्री मार्ग सुरक्षित ठेवण्याचे आवाहन
मोदी यांनी जागतिक सागरी व्यापारासाठी काम करणाऱ्या खलाशांच्या सुरक्षेवर भर दिला.
ते म्हणाले, जागतिक सागरी व्यापाराद्वारे देशांना जोडणाऱ्या खलाशांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. समुद्री मार्ग सुरक्षित राहतील आणि खलाशी कोणत्याही भीतीशिवाय आपले कर्तव्य पार पाडू शकतील याची खात्री आपण केली पाहिजे. तसेच भारत सर्व देशांसोबत सहकार्य करण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मोदी यांनी सांगितले की आज विकसनशील आणि ग्लोबल साऊथमधील देशांना केवळ मदत नको आहे, तर समान भागीदारी हवी आहे.
हे ही वाचा:
जसपाल राणाच्या मृत्यूनंतर आईनेही प्राण त्यागले
मोदी-ट्रम्प जी-७मध्ये भेटले, पण हरवला जोश!
अणुकरारापूर्वीच इराणला ९ अब्ज डॉलर्स
भारताकडून हार, पाकिस्तानला दंड
ते म्हणाले, ग्लोबल साऊथला लाभार्थी म्हणून राहायचे नाही, तर जागतिक विकास प्रक्रियेतील सक्रिय सहभागी बनायचे आहे. त्यांनी दाता-लाभार्थी या जुन्या संकल्पनेपासून पुढे जाण्याचे आवाहन केले. आपण समान भागीदार म्हणून एकत्र काम केले पाहिजे. भागीदारी ही परावलंबित्वाशी नव्हे तर सन्मानाशी जोडलेली असली पाहिजे.
जागतिक राजकारणात विश्वासाचा अभाव
आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये वाढत्या अविश्वासाबाबतही मोदी यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, आज जगात संसाधनांची कमतरता नाही, तर विश्वासाची कमतरता आहे. आपल्या भागीदारीचे भविष्य हा विश्वास निर्माण करण्यावर अवलंबून आहे. खनिजे, तंत्रज्ञान किंवा बाजारपेठ नव्हे, तर परस्पर विश्वास हीच आजची सर्वात महत्त्वाची धोरणात्मक संपत्ती आहे.”
मोदी-ट्रम्प भेट
या सत्रात मोदी आणि ट्रम्प एकमेकांच्या शेजारी बसले होते. याआधी जी-७ समूह छायाचित्रावेळी दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन केले आणि काही काळ अनौपचारिक चर्चा केली.
मोदी यांनी पुढे सांगितले की जगातील विविध भागांतील तणाव आणि संघर्षांचा कायमस्वरूपी तोडगा केवळ संवाद, मुत्सद्देगिरी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याद्वारेच निघू शकतो.
