मुंबईसह राज्यातील 29 महापालिका निवडणुकींचे निकाल जाहीर होत आहेत. भाजपला महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळताना पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रातील निवडणूक निकालांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर प्रतिक्रिया देत राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. “महाराष्ट्राचे मनापासून आभार. एनडीएच्या सुशासन आणि विकासाच्या अजेंड्याला जनतेने दिलेला पाठिंबा प्रेरणादायी आहे,” असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले. या ट्विटनंतर राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली असून, भाजप व महायुतीच्या नेत्यांनी हा कौल जनतेच्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे.
प्राथमिक तसेच अंतिम निकालांकडे पाहिले असता, महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये भाजपप्रणीत महायुतीने आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील एकूण २९ महानगरपालिकांपैकी बहुसंख्य ठिकाणी महायुतीला स्पष्ट आघाडी किंवा बहुमत मिळाल्याचे चित्र आहे. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सांगली-मिरज आणि वसई-विरार यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये महायुतीच्या उमेदवारांनी लक्षणीय यश मिळवले आहे.
हे ही वाचा :
निशिकांत दुबे मुंबईत येऊन भेटणार राज-उद्धव यांना
बांगलादेशमध्ये हिंदू शिक्षकाचे घर जाळले
संजय राऊतांना आवाज देणारे नवनाथ बन विजयी
काही महापालिकांमध्ये भाजप आणि मित्रपक्षांनी बहुमताचा आकडा गाठला असून, काही ठिकाणी ते सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आहेत. राज्यभरात हजारो नगरसेवकांच्या जागांसाठी झालेल्या निवडणुकांमध्ये महायुतीला मोठी आघाडी मिळाल्याचे आकडे दर्शवतात. शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही विकास, पायाभूत सुविधा, सुरक्षा आणि विविध कल्याणकारी योजनांना जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या विजयाचे यश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला होता. या निकालानं स्पष्ट केलं की जनतेचा विश्वास पंतप्रधान मोदींवर आहे. लोकांना विकास हवाय. शिवसेनेचे संस्थापक हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे स्मरण करतो, त्यांचा आपल्याला आशिर्वाद मिळाल्यानं विजय मिळाला आहे. विकासच हा अजेंडा राहणार आहे. असे वक्तव्य फडणवीस यांनी केला होता.
पंतप्रधान मोदी यांच्या ट्विटनंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, हा निकाल केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर जनतेने व्यक्त केलेल्या विश्वासाचा कौल असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
