ठाकरे परिवाराचे निवासस्थान असलेल्या वांद्रे येथील मातोश्रीजवळ एक ड्रोन रविवारी सकाळी आढळले. त्या ड्रोनसंदर्भातील एक पोस्ट उबाठाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टाकल्याचे बातम्यांमध्ये दिसू लागले. त्यानंतर सगळ्या मीडियातून ठाकरेंच्या घराबाहेर ड्रोन दिसल्याच्या बातम्या येऊ लागल्या. मातोश्रीबाहेर ड्रोन म्हणजे टेहळणीसाठी, ठाकरेंच्या सुरक्षेचा मुद्दा, महाराष्ट्राचे काय होणार, अशा चर्चांना उधाण आले. लागलीच मीडियाने विविध लोकांच्या प्रतिक्रिया घेऊन सहानुभूतीचा पाऊस पाडला. त्यातच मग अनिल परब, आदित्य ठाकरे यांनी पोस्ट लिहून किती मोठा अन्याय सुरू आहे महाराष्ट्रात. सगळ्यांच्या खाजगी आयुष्य़ात डोकावण्याची ही कसली वाईट खोड वगैरे प्रतिक्रिया दिल्या.
अनिल परब यांनी लिहिले की, शिवसेना पक्षप्रमुख यांच्या निवासस्थान ‘मातोश्री’च्या बाहेर एक ड्रोन घिरट्या घालताना दिसला – पण प्रश्न असा आहे की हा ड्रोन नेमका कोणाचा आणि कोणत्या हेतूसाठी होता? या ड्रोनद्वारे चित्रीकरण का करण्यात आले? यामागे कोणतेही अतिरेकी पार्श्वभूमी कारण तर नाही ना? मातोश्रीसारख्या Z+ सुरक्षा असलेल्या संवेदनशील क्षेत्रात न कळवता ड्रोनद्वारे शूटिंग करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या घटनेमागे कोणते षडयंत्र लपलेले आहे का, याचा शोध घेणे आवश्यक आहे.
दरम्यान, हे ड्रोन एमएमआरडीएचे असल्याचे कळले. मीडियाचा सगळाच हिरमोड झाला. निदान या ड्रोनच्या निमित्ताने काहीतरी हाती लागेल आणि दिवसभर आरत्या ओवाळता येतील अशी अपेक्षा होती. पण सगळे फुस्स झाले. एमएमआरडीएने स्पष्ट केले की, बीकेसीमधील पॉड टॅक्सीच्या प्रकल्पासाठी सर्वेक्षण सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून ड्रोनच्या माध्यमातून हे सर्वेक्षण सुरू आहे.
आदित्य ठाकरेंनीही हीच भीती व्यक्त केली, ते म्हणाले की, ड्रोनच्या माध्यमातून आमच्या घरात डोकावण्याचा प्रयत्न झाला. असे कोणते सर्वेक्षण सुरू होते, का तिथल्या रहिवाशांना कळविण्यात आले नाही. हे सर्वेक्षण फक्त आमच्या घराचे होते की, सगळ्या बीकेसीचे. जर पोलिसांनी या सर्वेक्षणाला परवानगी दिली तर स्थानिक रहिवाशांना का कळविण्यात आले नाही.
हे सगळे दावे इतके हास्यास्पद होते की, विचारता सोय नाही. मुळात एमएमआरडीए एखादे सर्वेक्षण करत असेल त्यासाठी ड्रोन चालविण्याची परवानगी पोलिसांकडून घेतली असेल तर लोकांना सांगण्याची काय आवश्यकता. एमएमआरडीए ही अधिकृत संस्था आहे. अडीच वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा या एमएमआरडीचे काम मुख्यमंत्र्यांच्या देखरेखीखाली होत होते. तेव्हा ही संस्था दुसऱ्यांच्या घरात काय चालले आहे, हे पाहण्यासाठी होती का? ही काही खाजगी ड्रोन नाहीत की ती घरात कोण काय बोलते आहे, कोण काय करते आहे हे पाहण्यासाठी कुणा व्यक्तीने आकाशात सोडली आहेत. मुळात हवेत असे ड्रोन उडविण्यासाठी परवानगी लागते. त्यामुळे कुणीही ते पाऊल उचलू शकत नाही. मीडियानेही आधी सगळ्या राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पाडण्यापूर्वी पोलिसांशी संपर्क साधून कुणाचे ड्रोन आहे, कोणत्या कामासाठी वापरले जात आहे, याची शहानिशा करायला हवी होती. पण ती न करता त्याला राजकीय वळण देण्यात आले.
उद्धव ठाकरे यांचे आज निवासस्थान असलेले मातोश्री हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना देशातील एक महत्त्वाचे राजकीय केंद्र होते. अनेक घडामोडी या वास्तूने पाहिलेल्या आहेत, अनेक नेत्यांना तिथे पायधूळ झाडताना पाहिलेले आहे. त्यामुळे त्या वास्तूचे महत्त्व आहे पण लगेच कुणीतरी टेहळणी करण्यासाठी ड्रोन पाठवले, आता काय होणार, उद्धव ठाकरेंच्या सुरक्षेचे तीनतेरा वाजले अशी अनाठायी भीती बाळगण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती. ते ड्रोन अज्ञात आहे असे कळले असते तर निदान काही आरोप करता आले असते पण एमएमआरडीएने लागलीच ते ड्रोन हवेत सोडल्याचे जाहीर केल्यानंतर त्यापुढे जाऊन बोलण्याची आवश्यकताच नव्हती. त्यातून हसेच झाले. बरे या ड्रोनमधून घरात काय काय चालले आहे हे टिपण्याची क्षमता खरोखरच असते का, त्या ड्रोनची काय वैशिष्ट्ये आहेत, हे माहीत करून घेतले का, ही सगळी माहिती नसताना आमच्या खाजगी आयुष्यात डोकावण्यासाठी ड्रोन पाठवले अशी उथळ विधाने करण्याची आवश्यकता नव्हती. आता एमएमआरडीएला सर्वेक्षण करायचे तर ते त्या परिसराचे सर्वेक्षण करणार. रस्त्यांची मोजमापे, इमारती, बैठी घरे, रहदारी अशा सगळ्याचा आढावा त्यातून घेणार. कुणाच्या घरात कोण काय करते आहे, याच्याशी एमएमआरडीएचे काय देणेघेणे, हा कॉमनसेन्स आहे. आसपासच्या सगळ्या इमारतीतील लोकांना एमएमआरडीए सर्वेक्षणाबद्दल सांगत बसले तर काम कधी करणार? याचाही विचार करायला नको का?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना या वास्तूभोवती सुरक्षा कवच होते. शिवसैनिकही मोठ्या प्रमाणावर तिथे असत. त्यामुळे प्रचंड राबता तिथे आढळून येत असे. आज मात्र ती परिस्थिती नाही. पूर्वी बाळासाहेब ठाकरे कुणाला भेटायला, राजकीय चर्चा करायला दुसऱ्या नेत्यांच्या घरी जात नसत उलट ते नेतेच मातोश्रीवर येत. तसे एक वलय तयार झाले होते. पण आज ती परंपरा राहिलेली नाही. उद्धव ठाकरे आज राजकीय चर्चा करायला अन्य नेत्यांच्या घरी जातात. ते नेते उद्धव ठाकरेंना भेटायला कधीमधी येतात. सुरक्षेचे ते कवचही आता आवश्यक राहिलेले नाही. शिवसेनेची एक घोषणा राहिलेली आहे…कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला. कुणालाही नडण्याची, भिडण्याची भाषा शिवसैनिकांची राहिलेली आहे, तेच या घोषणेतून दिसते. बाळासाहेबांच्या भाषणांमुळे पाकिस्तानही चळचळा कापत असे. मग एक ड्रोन फिरू लागल्यावर दरदरून घाम फुटण्याचे कारण तरी काय?
हे ही वाचा:
बिहारमध्ये लाल झेंड्याच्या आडून नक्षलवाद आणण्याचा प्रयत्न
इराणमध्ये तीव्र दुष्काळ; तेहरानमध्ये टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा बंद
खाजगी वैद्यकीय तज्ज्ञाची गळा चिरून हत्या
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केरळमध्ये एर्नाकुलम बेंगळुरू वंदे भारत रेल्वेचे उद्घाटन झाले त्यावेळी त्यात केरळमधील सरस्वती विद्यालयाच्या मुलांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गणगीतम गायले. “परमपवित्रमथामिए मन्निल भारतमबाये पूजिक्कन” असे त्या गीताचे बोल आहेत. भारतमातेच्या स्तुतीपर ते गाणे आहे. या गाण्यामुळे अर्थातच डाव्या तथाकथित सेक्युलर, पुरोगामी लोकांच्या पोटात दुखणे स्वाभाविक आहे. देशाच्या गौरवार्थ काहीही गायचे, बोलायचे नाही, हा या सगळ्या तथाकथित विचारवंतांचा विचार. केरळचे मुख्यमंत्री पिनराय विजयन हे कम्युनिस्ट सरकारचे प्रमुख. त्यामुळे अर्थातच या गीतामुळे त्यांचा तीळपापड झाला. हे गाणे कसे काय गायले गेले, त्या शाळेची चौकशी वगैरे करण्याची भाषा ते करू लागले. हे गीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतही गायले जाते. पण त्यात देशाचा अपमान करणारे असे काय आहे? हे विजयन यांनी पहिले देशाला सांगावे. जर त्यात केवळ भारतमातेची स्तुती असेल तर त्याबद्दल तुमच्या पोटात एवढा मोठा खड्डा का पडतो. तुम्ही भारतमातेला मानत नसाल पण अवघा देश मानतो. वंदे मातरमच्या १५० वर्षांच्या पूर्तीनंतरही अनेक तथाकथिक पुरोगामी, डाव्यांच्या शरीराची लाही लाही झाली. देशाची स्तुतीच मुळात त्यांना नको असते. त्यात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या माध्यमातून होत असेल तर नकोच.
भारताच्या दक्षिण रेल्वेने त्यांच्या अधिकृत हैंडलवरुन शेयर केलेल्या या वीडिओला हटवले. त्यावर सरस्वती विद्यालयाने पंतप्रधानांना पत्र लिहून विचारलं आहे की, आमच्या मुलांना देशभक्तीपर गाणे म्हणण्याचाही अधिकार नाही का. जर देशप्रेमाकडे अशापद्धतीने संशयाच्या दृष्टीने पाहिले गेले तर त्यांच्या मनात राष्ट्रभावना कशी काय जागृत होणार? मुळात त्या विद्यार्थ्यांनी ते गीत गायले तर ते त्यांनी गाऊ नये हे सांगणारे तुम्ही कोण? असा सवाल विचारला गेला पाहिजे. संविधानाचे पुस्तक हातात घेऊन रोज नाचवायचे मात्र ते उघडून कधी बघायचे नाही, मग तुम्हाला संविधान कळणार कसे? ती मुले चीनच्या कौतुकाचे गाणे तर म्हणत नव्हती ना. कदाचित चीनच्या स्तुतीपर गाणे म्हटले असते तर विजयन हे कदाचित त्या गाण्यावर नाचलेही असते. त्यामुळे लोकशाहीच्या गप्पा मारणारे हे सगळे लोक किती दुटप्पी आणि ढोंगी आहेत, याचे हे उदाहरण यानिमित्ताने दिसून आले.
