बिहार निवडणूक कधीच निष्पक्ष नव्हती!

राहुल गांधी यांचा आरोप

बिहार निवडणूक कधीच निष्पक्ष नव्हती!

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी बिहार विधानसभा निवडणुकीत महागठबंधनाच्या (RJD-काँग्रेस-डावे) झालेल्या प्रचंड पराभवानंतर ही निवडणूक सुरुवातीपासूनच निष्पक्ष नव्हती, असा आरोप केला. मतदारांचे आभार मानताना निवडणूक प्रक्रियेवर त्यांनी शंका घेतली.एक्सवर पोस्ट करताना राहुल गांधी म्हणाले की संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी विरोधकांची लढाई आणखी तीव्र होईल.

या निवडणुकीत भाजपा जदयु यांना २०२ जागी यश मिळाले आणि विक्रमी असा विजय त्यांनी मिळवला तर महागठबंधनला अवघ्या ३५ जागा मिळाल्या.

ते म्हणाले, “महागठबंधनावर विश्वास दाखवणाऱ्या बिहारमधील कोट्यवधी मतदारांचे मी मनापासून आभार मानतो. हा निकाल खरोखरच आश्चर्यकारक आहे. ही निवडणूक सुरुवातीपासूनच निष्पक्ष नव्हती आणि त्यामुळे आम्ही विजय मिळवू शकलो नाही.”

हे ही वाचा:

विजयाचा ‘एमवाय’ फॉर्म्युला म्हणजे महिला आणि युवा!

काँग्रेसचं लवकरच विभाजन होईल

बिहारी GEN-Z नेच चिरडले…

संत परंपरा संस्कृतीची पायाभरणी असून भक्तांना अध्यात्मिक प्रेरणा, समाजसेवेचे बळ मिळेल!

राहुल गांधी यांनी हा निकाल आत्मपरीक्षणासाठी एक मोठा धक्का असल्याचे सांगितले. “ही लढाई संविधान व लोकशाहीच्या संरक्षणासाठी आहे. काँग्रेस आणि इंडी आघाडी या निकालाचे सखोल पुनरावलोकन करेल आणि लोकशाही वाचवण्याचे प्रयत्न अधिक प्रभावी करेल,” असे त्यांनी लिहिले.

एनडीए ऐतिहासिक विजयाच्या मार्गावर असल्याचे स्पष्ट झाले होते. २०१० नंतर बिहारमधील काँग्रेसची ही सर्वात खराब कामगिरी मानली जात आहे.

दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी आरोप केला की “या निकालातून ज्ञानेश कुमार बिहारच्या लोकांविरोधात यशस्वी झाले, असे म्हणता येईल.
त्यांनी दावा केला की, आता ही लढत राजकीय पक्षांमधली नसून “ज्ञानेश कुमार विरुद्ध भारतीय मतदार” अशी बनली आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले,  “निकालाचा मी आदर करतो पण संघर्ष सुरूच राहील. काँग्रेस अध्यक्ष  खरगे यांनीही एक्स वर लिहिले की पार्टी निकालाचा आदर करते, पण लोकशाही कमकुवत करण्यासाठी संविधानिक संस्थांचा गैरवापर करणाऱ्या शक्तींविरुद्ध संघर्ष सुरू राहील. त्यांनी महागठबंधनाला मत दिलेल्यांचे आभार मानले आणि कार्यकर्त्यांना निराश न होण्याचे आवाहन केले.

काँग्रेसमध्ये नाराजीचा स्फोट

काँग्रेस खासदार  शशी थरूर म्हणाले, हे आकडे अतिशय निराशाजनक आहेत. मोठे आत्मपरीक्षण आवश्यक आहे— फक्त विचार नाही, तर प्रत्यक्ष अभ्यास करून काय चुकले ते शोधावे लागेल. ते म्हणाले की, त्यांना बिहारमध्ये प्रचारासाठी बोलावलेही गेले नाही.

महाकाय प्रमाणात वोट चोरी

जयराम रमेश यांनी थेट आरोप केला, बिहारचा हा निकाल महाकाय प्रमाणात ‘वोट चोरी’चे प्रतिबिंब आहे. पंतप्रधान, गृहमंत्री आणि निवडणूक आयोग यांच्या नेतृत्वाखाली हे चालले आहे. त्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी लढा अधिक तीव्र करण्याचे आवाहन केले.

“हा जनादेश नाही” — प्रियांक खरगे

कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे म्हणाले की हा निकाल वास्तवाशी जुळणारा नाही. हे लोकांचे मत नाही. हा निकाल अत्यंत आश्चर्यकारक आणि अस्वीकार्य आहे.”

काँग्रेसमध्ये अंतर्गत बंड — ‘निर्णय काहींच्याच हातात’, ‘कार्यकर्त्यांना मान नाही’

काँग्रेस नेत्या मुमताज पटेल यांनी फार कडक शब्दांत पक्षातील त्रुटी मांडल्या.  “निर्णय काही लोकांच्या हातात केंद्रीत आहेत.तळागाळातील राजकारण ओळखणाऱ्यांना संधी मिळत नाही. पक्ष लोकशाही वाचवण्याची भाषा करतो, पण आतूनच जबाबदारी निश्चित करत नाही. त्या म्हणाल्या की, राहुल गांधी खूप मेहनत करतात, पण पक्षातील काही लोक त्यांच्या प्रयत्नांना कमकुवत करतात.”

त्यांनी असेही सुचवले की , जर निवडणूक प्रक्रिया पक्षांच्या मते खरोखरच प्रभावित असेल, तर विरोधकांनी सामूहिकपणे अधिक कठोर धोरणाचा विचार करावा, अगदी निवडणूक बहिष्काराचाही.

माजी मंत्री शकील अहमद म्हणाले,  तिकिट वितरणात अनियमिततेची तक्रारी जुन्याच आहेत. वरिष्ठ नेत्यांनी तिकिटे जाहीर होताच याबाबत पत्रकार परिषद घेतली होती. ते म्हणाले, की सीमांचलातील मुस्लिम मतदार एआयएमआयएमला वाढता पाठिंबा देताना दिसतात.

 

Exit mobile version