राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांच्या निकालानंतर भाजप हा पुन्हा एकदा नंबर वन पक्ष ठरला आहे. याशिवाय मुंबई महानगरपालिकेवरील ठाकरेंच्या सत्तेला सुरुंग लावत प्रतिष्ठेची लढाई ठरलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतही भाजपाने विजयी गुलाल उधळला. दुसरीकडे तब्बल २० वर्षांनी एकत्र आलेल्या आणि मुंबई महानगरपालिका निवडणूक युतीमध्ये लढणाऱ्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना पराभव पाहावा लागला. यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडिया माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरेंच्या मनसेला मुंबई महानगरपालिका निवडणुकीत दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही. इतर महापालिकांमध्येही मनसेची कामगिरी खास झालेली नाही. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीली आहे. त्यांनी प्रथम मनसे आणि ठाकरे गटाकडून निवडणून आलेल्या उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.
राज ठाकरे यांनी लिहिले आहे की, “यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.” पुढे ते म्हणाले की, मनसेला अपेक्षित यश मिळालं नसल्याचे दुःख आहे, पण म्हणून खचून जाणार नाही. जे नगसेवक निवडून आलेत ते तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील.
हे ही वाचा:
मुंबईत महिला नेतृत्वाच्या विजयाचा झंझावात!
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार प्रदान होताच समितीने काय म्हटले?
भाजपची रणनीती आणि ठाकरे, पवार राजकीय ‘ब्रँड्स’चा वाजला बँड
दिलासा आणि कृतज्ञता… इराणहून परतलेल्या भारतीयांनी मोदी सरकारचे मानले आभार
“आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची , मराठी अस्मितेच्यासाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे. ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान सगळ्यांना आहे. बाकी काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच,” असे राज ठाकरेंनी म्हटले आहे. पुढे त्यांनी लिहिले आहे की, मराठी माणसाच्या पाठीशी ठाम उभं रहायचं असून निवडणुका येतील जातील पण श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही. लवकरच भेटूया. पुन्हा कामाला लागूया. नव्याने आपला पक्ष आणि संघटना उभारूया.
