महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकींचा निकाल शुक्रवारी लागला. यानंतर भाजप हा पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष ठरला. प्रतिष्ठीत अशी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत देखील ठाकरेंच्या सत्तेला सुरुंग लावत भाजपाने यश मिळवले. यानंतर आता मुंबईचा महापौर भाजपाचा असणार हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या निवडणुकांच्या रणांगणात आडनावांचा वापर करून राजकारण करण्यात आले होते. पवार कुटुंबीय आणि ठाकरे ब्रँड हे त्यात आघाडी होते. महानगरपालिकांच्या निवडणुकीत या दोन्ही कुटुंबीयांनी आपल्या आडनाव वापरून प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपाला मिळालेल्या यशानंतर हे प्रयत्न फोल ठरल्याचे समोर आले आहे.
१५ जानेवारी रोजी झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेल्या निकालांचा अर्थ केवळ देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेवर (बीएमसी) नियंत्रण मिळवणे किंवा राज्याची सांस्कृतिक राजधानी मानल्या जाणाऱ्या पुण्यात सत्तास्थापन करणे इतकाच मर्यादित नव्हता. मतदारसंघांचे आकडे आणि वॉर्डनिहाय नकाशांच्या पलीकडे पाहिल्यास, भाजपाचा एक अधिक खोल आणि दीर्घकालीन उद्देश स्पष्टपणे दिसतो. गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणावर वर्चस्व गाजवणाऱ्या ठाकरे आणि पवार या दोन प्रभावी राजकीय ‘ब्रँड्स’ला पद्धतशीरपणे कमजोर करणे हा उद्देश होता.
राज्याच्या राजकारणातील या दोन ब्रँड्सना बाजूला सारण्यात भाजपाला मिळालेले यश हे योगायोगाने घडलेले नाही. ही एक ठरवून आखलेली रणनीती असून, गेल्या दशकभरापासून भाजपाने यासाठी सातत्याने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम केले आहे. या दोन राजकीय ब्रँड्सवर एकाच वेळी हल्ला चढवण्यात आल्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.
दुसऱ्या बाजूने पाहता, भाजपच्या नेत्यांनी ‘नकली’ अशी टीका केलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेपेक्षा दुप्पट जागा मिळाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी पक्ष फोडताना पक्षाचे अधिकृत नाव आणि निवडणूक चिन्ह स्वतःकडे घेतले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा नैतिक विजय मानला जाऊ शकतो. परंतु याच प्रक्रियेत भाजपाने ठाकरे कुटुंबाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बीएमसीतून त्यांना बाहेर फेकले आहे. बीएमसी ही ठाकरे कुटुंबासाठी केवळ एक महानगरपालिका नव्हती, तर अनेक दशकांपासून त्यांची सत्ता आणि प्रभाव टिकवून ठेवणारे केंद्र होते. या संस्थेमुळे त्यांना संघटनात्मक बळ, संसाधने, राजकीय आश्रय आणि मुंबईसह राज्यभर शिवसेना शाखांचा विस्तार करता आला. याच कारणामुळे उद्धव ठाकरे यांनी आपले दुरावलेले चुलत भाऊ आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी हातमिळवणी केली आणि मुंबई महानगरपालिकेतील प्रभाव वाचवण्यासाठी दोघांनी जोरदार प्रचार केला.
“ही लढाई ठाकरे कुटुंबाच्या अस्तित्वासाठी नाही, तर मुंबईच्या अस्तित्वासाठी आहे,” असे उद्धव ठाकरे यांनी ११ जानेवारी रोजी मुंबईतील प्रचार सभेत सांगितले. “मुंबईतून मराठी माणूस हद्दपार करण्याचा डाव आहे,” असा आरोप राज ठाकरे यांनी १२ जानेवारी रोजी ठाण्यातील निवडणूक सभेत केला. १९६१ साली झालेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा संदर्भ देत दोन्ही ठाकरे नेत्यांनी, आपल्या आजोबा स्व. प्रबोधनकार ठाकरे यांच्या सहभागाची आठवण करून दिली. भाजप मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करून गुजरातमध्ये विलीन करण्याचा कट रचत असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, भाजपाच्या प्रचाराचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आरोप फेटाळून लावले. ११ जानेवारी रोजी नाशिकमध्ये आणि १२ जानेवारी रोजी मुंबईतील शिवतीर्थावर बोलताना त्यांनी ठाकरे गटाच्या ‘मुंबई आणि मराठी अस्मिता’ तसेच ‘अस्तित्व’ या मुद्द्यांना सातत्याने प्रत्युत्तर दिले.
ठाकरे गटाकडून बेरोजगारी आणि ‘भूमिपुत्रां’च्या प्रश्नावर मांडल्या जाणाऱ्या भूमिकेला उत्तर देताना फडणवीस यांनी ‘ग्लोबल मुंबई’ ही संकल्पना पुढे मांडली. भाजपाने मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ९० हून अधिक मराठी उमेदवार दिले आणि पुढील महापौर मराठीच असणार असल्याची घोषणा केली.
सुमारे तीन वर्षांपूर्वी भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट घडवून आणण्यात केवळ मदतच केली नाही, तर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पारंपरिक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला. कारण दोन्ही पक्षांच्या फुटलेल्या गटांनी एकाच वेळी मूळ पक्षाचा वारसा आपलाच असल्याचा दावा केला. पक्षाच्या संस्थापकांपासून दूर गेलेल्या गटाला अधिकृत नाव आणि निवडणूक चिन्ह मिळणे, हे त्या पक्षांच्या ब्रँडसाठी मोठे नुकसानकारक ठरले. “अजित पवार यांनी फडणवीस यांच्या व्यासपीठावरून भाषणे करताना अनेक कार्यकर्ते नाराज झाले होते. पण हीदेखील आमच्या ठरवून आखलेल्या रणनीतीचा भाग होती,” असे भाजपाच्या एका नेत्याने सांगितले.
हे ही वाचा:
दिलासा आणि कृतज्ञता… इराणहून परतलेल्या भारतीयांनी मोदी सरकारचे मानले आभार
पुणे–पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा पवारांना धक्का
टी२० विश्वचषकापूर्वी नेपाळचा मोठा डाव
जुलै २०२३ मधील राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीपूर्वीच भाजपाने महाराष्ट्रातील एनसीपीची ताकद कमी करण्यासाठी पावले उचलली होती. सहकारी बँका, साखर कारखाने आणि त्यांच्याशी संबंधित संघटनांमध्ये भाजपाने आपला प्रभाव वाढवला. पवारांचे अनेक विश्वासू नेते तसेच काँग्रेसमधील काही नेते भाजपात दाखल झाले, त्यामुळे पवारांचा ‘साखर पट्टा’ कमकुवत झाला.
अजित पवार यांनी आपल्या काकांसोबत पुन्हा हातमिळवणी केली आणि पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीचे दोन्ही गट मिळून दुसऱ्या क्रमांकावर आले, तरीही हे पवार ब्रँडसाठी समाधानकारक ठरले नाही. काँग्रेसऐवजी राष्ट्रवादी मुख्य विरोधी पक्ष ठरली असली, तरीही पवार कुटुंब एकत्र येऊनही भाजपाला त्यांच्या बालेकिल्ल्यात सलग दुसऱ्यांदा रोखू शकले नाहीत. अजित पवार यांनी स्पष्ट केले की, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर त्यांचा पक्ष भाजपसोबतच आहे आणि भाजपप्रणीत सरकारचा तो अविभाज्य घटक आहे.
