राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी येत्या १५ तारखेला मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचाराला वेग आला असून राजकीय घडामोडीही सुरू आहेत. अशातच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राज ठाकरे यांचा मनसे आणि उद्धव ठाकरे यांचा ठाकरे गट हे पक्ष एकत्र आले आहेत. यानंतर ठाकरे बंधूंनी ‘सामना’ वृत्तपत्राला संयुक्त मुलाखत देत त्यांच्या भूमिकेवर भाष्य केले. तसेच त्यांनी मराठी भाषेचा मुद्दा अधोरेखित करत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याच्या डावाचा पुनरुच्चार केला.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि दिग्दर्शक- अभिनेते महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या या मुलाखतीत एकत्र येण्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की, काही गोष्टी का आणि कशा घडल्या हे आता सोडून द्यायला हव्यात. यापूर्वीच म्हटले होते की, कुठच्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. हे संकट महाराष्ट्रावरती, मुंबईवरती असून हे संकट मराठी माणसाला समजलं आहे. ती एकच गोष्ट या एकत्र येण्याचं सर्वात मोठं कारण आहे, असं राज ठाकरे म्हणाले. तसेच प्रश्न आमच्या अस्तित्वाचा नसून महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या अस्तित्वाचा आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, आम्ही दोन भाऊ एकत्र आलो हा भावनिक मुद्दा असला तरी, त्यामागचा मूळ उद्देश मराठी माणसाला एकत्र आणणे आहे. जर आपण आपापसात वेगळ्या चुली मांडल्या, तर महाराष्ट्र तोडण्याची स्वप्ने पाहणारे आपली पोळी भाजून घेतील. महाराष्ट्र वाचवण्यासाठी पक्षापलीकडे जाऊन मराठी म्हणून एकत्र येणे काळाची गरज आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची आठवण करून देताना राज ठाकरेंनी केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांवर आरोप केले. उत्तरेतून दररोज गाड्या भरून लोक महाराष्ट्रात येतात, ज्यामुळे ठाणे जिल्ह्यासारख्या भागात ८-९ महानगरपालिका बनवाव्या लागल्या आहेत. मुंबईचा महापौर उत्तर भारतीय करू अशी भाषा वापरली जात असून हे केवळ रोजीरोटीसाठी नाही, तर स्वतःचे मतदारसंघ बनवण्यासाठी सुरू असलेला खटाटोप आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी मुंबई तोडण्याचे जे प्रयत्न झाले होते, तसेच चित्र आजही दिसत आहे. मुंबईवर कब्जा मिळवून ती महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे स्वप्न पाहणारेच सत्तेत आहेत, असा दावा राज ठाकरेंनी पुन्हा केला.
हे ही वाचा:
भाजपशी युती केल्याने निलंबित केलेल्या १२ काँग्रेस नगरसेवकांनी हाती घेतले ‘कमळ’
अमेरिका रशियन तेल खरेदीदार देशांवर ५००% कर लावणार?
कामगिरी मूल्यांकनाच्या बहाण्याने नेमबाजी प्रशिक्षकाचा अल्पवयीन खेळाडूवर बलात्कार
बांगलादेश सीमेवरून बनावट नोटा रॅकेटची मुख्य सूत्रधार गजाआड
पुढे राज ठाकरे म्हणाले की, “मुंबई महापालिकेची मुदत २०२२ ला संपली होती. त्याच वेळी उद्धवचं सरकार गेलं. २०२६ पर्यंत इतका काळ निवडणुका का घेतल्या नाहीत? देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे आहे. अजून काही जण हे बाहेरचे आहेत. पण त्यातल्या किती जणांना मुंबई समजली आहे. मुंबईला काय हवे हे मुंबईत जन्मल्याशिवाय कळणार नाही. बाहेरचे मंत्री मुंबईत येतात, तेव्हा त्यांना कळत नाही इथली नेमकी समस्या काय आहे,” असे राज ठाकरे म्हणाले.
