दिग्विजय सिंह यांच्या पोस्टनंतर रेवंत रेड्डींचे प्रत्युत्तर

दिग्विजय सिंह यांच्या पोस्टनंतर रेवंत रेड्डींचे प्रत्युत्तर

ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे पक्षात खळबळ उडाल्यानंतर अवघ्या एका दिवसात तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी या वादात उडी घेतली. दिग्विजय सिंह यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटन कौशल्याचे कौतुक करणारी एक पोस्ट टाकली होती. त्याला एकप्रकारे रेवंत रेड्डी यांनी उत्तर दिले आहे. रेड्डी यांनी दोन उदाहरणे देत, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली दोन नेते देशाचे पंतप्रधान कसे बनले, हे अधोरेखित केले.

रेवंत रेड्डी यांनी एक्सवर लिहिले, “सौ. सोनिया गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली तेलंगणातील एका दुर्गम अशा गावातून सार्वजनिक जीवनाची सुरुवात करणारे पी. व्ही. नरसिंह राव देशाचे पंतप्रधान होऊ शकले. तसेच, अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधान बनवण्याचा निर्णयही सोनिया गांधीजी यांनीच घेतला.”

काँग्रेस पक्ष आपल्या १४० व्या वर्धापनदिनाचा उत्सव साजरा करत असताना, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाचे कौतुक होणे स्वाभाविक असले, तरी दिग्विजय सिंह यांच्या ट्विटनंतर लगेचच आलेली रेवंत रेड्डी यांची पोस्ट पक्षातील अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर आणते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. अनेक नेते एकमेकांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत स्वतःचा मुद्दा अधोरेखित करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे चित्र दिसत आहे.

हे ही वाचा:

उस्मान हादीच्या हत्येचा खटला २४ दिवसांत पूर्ण करा!

पठाण, कल्कीला मागे टाकत ‘धुरंधर’ची १,०५० कोटींची कमाई

“निष्पाप अल्पसंख्याकाला जिवंत जाळण्यात आले आणि…” काय म्हणाले कवी कुमार विश्वास?

‘या’ टॉप ७ आयपीओंनी गुंतवणूकदारांना केले मालामाल

दिग्विजय सिंह यांची पोस्ट आणि वादाची ठिणगी

राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १९९६ मधील एक जुना फोटो शेअर केला होता. हा फोटो गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांच्या शपथविधी समारंभातील असल्याचे सांगितले जाते. या छायाचित्रात तरुण नरेंद्र मोदी हे जमिनीवर बसलेले दिसतात, तर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी खुर्चीवर बसलेले आहेत.

दिग्विजय सिंह यांनी या फोटोसोबत लिहिले होते, “मला हा फोटो Quora वर सापडला. हा अतिशय प्रभावी आहे. RSS मधील एक सामान्य स्वयंसेवक आणि जनसंघ/भाजपचा कार्यकर्ता, जो कधी वरिष्ठ नेत्यांच्या पायाशी बसायचा, तो पुढे राज्याचा मुख्यमंत्री आणि देशाचा पंतप्रधान झाला. ही संघटनेची ताकद आहे. जय सिया राम.”

शशी थरूर, तिरुवनंतपुरमचे खासदार आणि जी-२३ गटातील नेते, यांनी दिग्विजय सिंह यांचे समर्थन करत म्हटले, “आम्ही मित्र आहोत, चर्चा होणे स्वाभाविक आहे. संघटना मजबूत करणे गरजेचे आहे, यात काहीच शंका नाही.” थरूर हे काँग्रेसमधील आंतरिक लोकशाहीसाठी आवाज उठवणाऱ्या जी-२३ गटाचे प्रमुख नेते असून त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक मल्लिकार्जुन खरगे यांच्याविरोधात लढवली होती.

मात्र, काँग्रेस खासदार मनिकम टागोर यांनी दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्याला तीव्र विरोध केला. त्यांनी आरएसएसची तुलना थेट अल-कायदासारख्या दहशतवादी संघटनेशी केली.

Exit mobile version