उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट टाकत आपण काही काळ मित्र परिवार, कार्यकर्त्यांपासून दूर राहणार आहोत. प्रकृतीच्या काही गंभीर समस्यांमुळे लोकांमध्ये मिसळता येणार नाही, गर्दीत सामील होता येणार नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे. उपचार सुरू असून नव्या वर्षातच कदाचित आपली भेट होऊ शकेल असे राऊत यांनी त्यात म्हटले आहे. संजय राऊत यांच्या प्रकृतीला लवकर आराम पडो अशी न्यूज डंकाच्या वतीने प्रार्थना. मात्र त्यांनी म्हटल्याप्रमाणे पुढील दोन महिने जर ते सार्वजनिक जीवनापासून लांब राहणार असतील तर नक्कीच राजकीय क्षेत्रात त्याची चर्चा होणारच.
रोज सकाळी कोणत्याही विषयावर बोलणारे संजय राऊत दोन महिने गप्प बसणार असतील तर त्याचे परिणाम हे नक्कीच जाणवणार आहेत. विशेषतः जो मीडिया त्यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर, सामनाच्या कार्यालयाबाहेर किंवा मग ते दिल्लीत असताना तेथील निवासस्थानाबाहेर सकाळी सकाळी प्रतीक्षा करत असतो, त्यांची चांगलीच ससेहोलपट होणार आहे. कारण दिवसभरातील राजकीय बातम्यांची सुरुवात संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेने पत्रकार करून देत असतात. त्यांच्याशिवाय मीडियाचे पानही हलत नाही. संजय राऊत यांनी केलेले कसलेही आरोप, दिलेल्या शिव्याशाप तातडीने दुसऱ्या पक्षातील नेत्याकडे घेऊन जाणे आणि त्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया विचारणे हा गेल्या काही वर्षातील दिनक्रम बनलेला आहे. तो पुढील दोन महिने बदलणार म्हणजे कठीणच आहे.
मध्यंतरी संजय राऊत यांना रुग्णालयात दाखल केले होते, त्यामुळे त्यांच्या प्रकृतीच्या काही समस्या नक्की असतील. पण यानिमित्ताने अनेकांच्या मनात कुतुहल जागृत होईलच. नेमका १ नोव्हेंबरला महाविकास आघाडी, मनसे यांचा वोटचोरीच्या संदर्भात मोर्चाही निघणार आहे. या मोर्चात राऊत सहभागी होणार का, की आता त्यांनी म्हटल्याप्रमाणे ते गर्दीत सामील होऊ शकणार नसल्याने मोर्चात भाग घेणे त्यांना शक्य होणार नाही? की संजय राऊत यांचे पक्षात काही बिनसले आहे, अशी शंकाही अनेकांनी सोशल मीडियावर यानिमित्ताने बोलून दाखवली आहे. खरे काय ते माहीत नाही. राऊत यांच्या अनुपस्थितीत आता ती सकाळची पत्रकार परिषद सुषमा अंधारे घेतील का की ती जागाच आता पुढील दोन महिने रिकामी ठेवली जाईल, हेदेखील प्रश्न आहेत.
हे ही वाचा:
बिहार: पंतप्रधान मोदींनी ‘गमछा’ फिरवला, ‘मोदी-मोदी’च्या घोषणेने परिसर दुमदुमला!
शिवम दुबेचा अजेय रेकॉर्ड तुटला!
एअर इंडियाला १०,००० कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची आवश्यकता!
“मी उघडपणे म्हणतो की आरएसएसवर बंदी घालावी”
काही वर्षांपूर्वी संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात गेले होते. तब्बल १०० दिवस ते राजकारणापासून दूर होते. तेव्हाच अंधारे यांचा पक्षप्रवेश झाला होता. आता जवळपास ६० दिवस तर राऊत हे बोलताना दिसणार नाहीत. खरी गोची होणार आहे ती मीडियाची. सत्ताधारी पक्षांवरील आरोपांची धार थोडी कमीच होईल नाही का?
राज्य सरकारच्या वतीने नमो टुरिझम केंद्र स्थापन करण्यात येणार असून महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध किल्ल्यांजवळ ही केंद्रे उभी राहणार आहेत. तिथून ते पर्यटनासंदर्भातील सुविधा लोकांना उपलब्ध करून देतील.
महाराष्ट्रातील शिवनेरी, प्रतापगड, रायगड, साल्हेर या किल्ल्यांच्या परिसरात ही सुविधा केंद्रे उभारण्यात येणार आहेत. पर्यटकांना एकाचठिकाणी माहिती उपलब्ध व्हावी, युवक युवतींना पर्यटन क्षेत्रातील कौशल्य विकास, रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात हाही त्यामागचा उद्देश तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याची एक संधी. राज्य शासन त्यासाठी ५० कोटींचा निधी देणार आहे.
सरकार अशा प्रकारच्या अनेक योजना आणत असते, कालांतराने त्या योजनेच्या आवश्यकतेनुसार टिकतात किंवा बंद केल्या जातात. पण या किल्ल्यांच्या परिसरात ही केंद्रे उभी राहणार असल्याचे म्हटल्यानंतर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अशी केंद्रे उभी राहिली तर ती तोडून टाकण्याची भाषा केली. मुळात अशी केंद्रे ही किल्ल्यांवर उभारताच येणार नाहीत. किल्ल्याखालील एखाद्या जागेवर असे केंद्र उभे राहिले तर ते तोडण्याची आवश्यकता काय? शिवाय, तिथे कुणीतरी मराठी माणूसच त्या केंद्रात काम करत असेल किंवा ते केंद्र चालवत असेल मग ते तोडून मराठी माणसाचा नेमका काय फायदा होणार? या केंद्रांमुळे शिवाजी महाराजांचे नाव पुसून तिथे नमो टुरिझम केंद्र तर उभारले जाणार नाही.
आता मुद्दा आहे तो अशा किल्ल्यांवरील अतिक्रमणांचा. महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर आज अनेक अतिक्रमणे झालेली आहेत किंवा करण्याचा प्रयत्न होतो. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाची कबर एवढी मोठी करण्यात आली की इथे अफजलखानाने काहीतरी महापराक्रम गाजवला होता आणि त्याच्या सन्मानार्थच त्याची कबर बांधण्यात आली होती, असे वाटावे. अशी अनेक अतिक्रमणे, मजारी किल्ल्यांवर बांधण्याचा प्रयत्न होतो, चादरी टाकण्यात येतात आणि ती जागा हडप करण्याचा प्रयत्न होतो. ती अतिक्रमणे खरे तर तोडण्याची भाषा केली तर ती लोकांना अधिक आवडेल. ती न तोडता रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारे काही होत असेल तर त्यात खोडा घालण्याची गरज काय?
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी मध्यंतरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावे अवघ्या २० रुपयात एक आधारकार्ड बनवून दाखवले. त्याविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. त्यावर म्हटले जात आहे की, रोहित पवार असे गुन्हे दाखल केल्यामुळे घाबरणार नाहीत. ते खरेही आहे. रोहित पवारांनी घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. पण जे आधार कार्ड बनविण्याचे प्रयोग आहेत, ते तरी त्यांनी बंद केले पाहिजेत.
अशी खोटी, बनावट आधारकार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड बनविणाऱ्या टोळ्या देशभरात आहेत. त्यांना वेळोवेळी पोलिसांकडून पायबंद घातला जात असतो. तो अर्थातच गुन्हा आहे म्हणून. मग आपण असे आधार कार्ड बनवू शकतो, हे दाखवून रोहित पवार नेमके काय सांगू पाहतात? अशी खोटी कागदपत्रे तयार करणे हे काही कठीण काम नाही. कठीण काम आहे ते अशा बाबी उघडकीस आणणे, खोटे मतदार शोधणे, घुसखोरी करून भारतात आलेले, झोपडपट्ट्यांमध्ये आश्रय घेतलेले, तिथेच कागदपत्रे तयार करून सगळ्या सोयीसुविधांचा लाभ उठवणारे लोक शोधणे आवश्यक आहे. ते शोधले तर जी खऱ्या अर्थाने वोटचोरी होते, त्याचा छडा लागू शकेल.
आज रोहित पवारांच्या त्या कृतीने बनावट कार्ड करणाऱ्यांचा आत्मविश्वास भलताच वाढला असेल. एक आमदारही अशी कार्ड बनवू शकतो, म्हणजे आपल्या धंद्याला भलतीच बरकत आलेली आहे की काय, असा प्रश्न या बनावट आधार कार्ड बनविणाऱ्यांना पडला असेल. खरे तर, आधार कार्ड ज्या पद्धतीने बनवले जाते, ती प्रक्रिया सुरक्षित आहे. मात्र त्या पद्धतीवर एकप्रकारे अविश्वास निर्माण करण्याचे काम रोहित पवार का करत आहेत? आगामी काळात एक जबाबदार नागरीक म्हणून बनवाट, खोटे असे काही करू नका, असा सल्ला देण्याऐवजी सगळी कागदपत्रे बनावट करता येतात, मी तुम्हाला दाखवतो, असे आवाहन तर रोहित पवार करणार नाहीत ना?
