तामिळनाडूतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील सहभागावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. राज्याच्या कॉलेजिएट एज्युकेशन विभागाने सरकारी कला आणि विज्ञान महाविद्यालयांतील विद्यार्थी तसेच तरुणांना डाव्या पक्ष आणि ‘तामिळनाडू कॉकरोच जनता पार्टी’ (TNCJP)च्या आंदोलनांमध्ये सहभागी होण्यापासून रोखण्यासाठी अधिकाऱ्यांनी समन्वयाने कारवाई करावी, असे निर्देश दिले होते. मात्र, आदेश जारी झाल्यानंतर काही मिनिटांतच तो मागे घेण्यात आला.
विभागाने राज्यातील सर्व सरकारी कला आणि विज्ञान महाविद्यालयांच्या प्राचार्यांना हा आदेश पाठवला होता. विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी अशा आंदोलनांमध्ये सहभागी होऊ नये, यासाठी शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने समन्वय साधून आवश्यक कारवाई करावी, असे त्यात नमूद करण्यात आले होते. या प्रकरणाला ‘अत्यंत तातडीचे’ असल्याचेही आदेशात म्हटले होते.
हा आदेश मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कॉलेजिएट एज्युकेशन विभागाकडून जारी करण्यात आला होता. मात्र, आदेशाची माहिती समोर आल्यानंतर विद्यार्थी संघटना आणि विविध घटकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले. विशेषतः तामिळनाडू कॉकरोच जनता पार्टी आणि डाव्या पक्षांचीच नावे आदेशात का नमूद करण्यात आली, असा सवाल करण्यात आला. यानंतर कॉलेजिएट एज्युकेशनच्या संयुक्त संचालक सिंथिया सेल्वी पी. यांनी पूर्वीचे निर्देश मागे घेतल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना आंदोलनांपासून रोखण्यासाठी करण्यात येणारी प्रस्तावित कारवाई आता लागू राहणार नाही.
हे ही वाचा:
सकाळी १० वाजले तरी ऑफिस रिकामं! बंगळुरूच्या ट्रॅफिकला कंपन्या हैराण
जेन झीला आकर्षित करण्यासाठी सरकारी बँकांनी ‘कूल’ व्हावे
भारतीय कार बाजाराला वेग! FY31 पर्यंत ६३ लाख वाहनांची विक्री शक्य
आयएसआय कनेक्शन असलेल्या वहाब आलमच्या तिसऱ्या साथीदाराला बेड्या
दरम्यान, ‘तामिळनाडू कॉकरोच जनता पार्टी’ (TNCJP) ही तामिळनाडूमधील एक संघटना असून तिने प्रादेशिक राजकीय पक्ष म्हणून नोंदणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केल्याचे वृत्त आहे. माहितीनुसार, या गटाचे नेतृत्व तामिळनाडूस्थित वकील सी. ब्रह्मा बालसुब्रमण्यम करत आहेत. या गटाच्या सदस्यांचे म्हणणे आहे की, त्यांना राज्यातील सामाजिक न्याय आणि कामगार, विद्यार्थी व शेतकऱ्यांचे हक्क यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करायचे आहे. हा ‘कॉकरोच जनता पार्टी’ पासून प्रेरित असल्याचे सांगतो, परंतु ती एक स्वतंत्र संघटना आहे.
