मराठा आंदोलनामुळे फ्री वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये कोंडी

पोेलिसांकडून कोंडी फोडण्याचे प्रयत्न

मराठा आंदोलनामुळे फ्री वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये कोंडी

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा क्रांती मोर्चाच्या हजारो समर्थकांनी शुक्रवारी आझाद मैदान गाठले. या आंदोलनामुळे मुंबई जवळजवळ ठप्प झाली होती. दक्षिण मुंबईतील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली तर ईस्टर्न फ्रीवे आंदोलकांनी पूर्णपणे रोखल्याने वाहनचालकांना तासन्तास अडकून बसावे लागले. कोस्टल रोडवर प्रियदर्शिनी पार्क (पीडीपी) ते नरिमन पॉइंटपर्यंत गाड्यांची रांग लागली.

मुंबई वाहतूक पोलिसांनी नागरिकांना वारंवार सूचना देत दक्षिण मुंबई टाळण्याचा इशारा दिला. “आझाद मैदानावरील आंदोलनामुळे फ्रीवे वापरणे टाळा, कृपया त्यानुसार नियोजन करा,” असे पोलिसांनी स्पष्ट केले. तसेच सीएसटी परिसरात जाणे टाळण्याची विनंतीही करण्यात आली.

सीएसएमटी, फोर्ट आणि नरिमन पॉइंट परिसरात मोठी गर्दी झाली होती. आंदोलकांचा महासागर रस्त्यांवर उतरल्याने सर्व वाहतूक ठप्प झाली. सीएसएमटी प्लॅटफॉर्मवरही शेकडो समर्थक जमल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली. यामुळे बेस्ट बससेवा विस्कळीत झाली असून पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने बसेस अनियमित झाल्याचे बेस्ट प्रशासनाने मान्य केले.

भायखळा, मोहम्मद अली रोड, कार्नाक ब्रिज या ठिकाणी गुरुवार रात्रीपासूनच पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. आंदोलकांना वाहनांऐवजी पायी आझाद मैदान गाठण्याचे निर्देश पोलिसांनी दिल्याने कोंडी आणखी वाढली.

हे ही वाचा:

चिंता कशाला भारत आहे ना ! अमेरिकेच्या बसमधून उतरण्याचे जपानचे संकेत…

जपानमध्ये पंतप्रधानांना भेट स्वरुपात मिळालेली ‘दारुमा बाहुली’ आहे तरी काय?

लॉस एंजेलिसमध्ये दुधारी तलवारीने प्रदर्शन करणाऱ्या शीख युवकाला घातल्या गोळ्या

“पंतप्रधान, मुख्यमंत्री, न्यायाधीश यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा अधिकार नाही”

या मोठ्या निषेधामुळे गणेशोत्सवाच्या सुरुवातीला पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. लाखो गणेशभक्त शहरभरातील मंडपांकडे जात असताना आंदोलकांचा तगडा मोर्चा निघाल्याने सुरक्षेची तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गणेशोत्सवासाठी मुंबईत दाखल झाल्याने सुरक्षा यंत्रणांवर ताण वाढला आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनिश्चित उपोषण सुरू करण्याचा संकल्प करून मनोज जरंगे पाटील हजारो समर्थकांसह मुंबईत दाखल झाल्याने आरक्षणाची लढाई आणि कायदा-सुव्यवस्थेचे आव्हान दोन्हीही गडद झाले आहे.

Exit mobile version