25 C
Mumbai
Tuesday, March 17, 2026
घरधर्म संस्कृतीपाश्चात्य जगात नव्या पिढीला नकोय कोणताही पंथ! भारतात मात्र आध्यात्माबद्दल डोळस विचार

पाश्चात्य जगात नव्या पिढीला नकोय कोणताही पंथ! भारतात मात्र आध्यात्माबद्दल डोळस विचार

प्यू रिसर्च सेंटरच्या 'रिलिजियस लँडस्केप स्टडी' अहवालातील वास्तव

Google News Follow

Related

पाश्चात्य जगात, विशेषतः अमेरिकेत, ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांच्या संख्येत होणारी घट ही केवळ लोकसंख्याशास्त्रीय बदलाची बाब नसून ती एका मोठ्या सांस्कृतिक परिवर्तनाची नांदी आहे. प्यू रिसर्च सेंटरच्या ‘रिलिजियस लँडस्केप स्टडी’ (RLS) आणि २०२४-२०२६ दरम्यानच्या विविध अहवालांमधून हे वास्तव स्पष्ट होते. रिलीजन्सवरील (अ)विश्वास आणि लोकसंख्येतील बदल

प्यू रिसर्च सेंटरच्या २०२३-२४ च्या आकडेवारीनुसार, अमेरिकेतील प्रौढ लोकसंख्येमध्ये ख्रिश्चनांचे प्रमाण ६२% पर्यंत खाली आले आहे, जे २००७ मध्ये ७८% होते. जरी २०१९ नंतर ही घसरण काही प्रमाणात स्थिरावली असली, तरी दीर्घकालीन कल स्पष्टपणे अधोगामी आहे. याउलट, स्वतःला कोणत्याही रिलीजन्सशी न जोडणाऱ्या, ज्यांना समाजशास्त्रीय भाषेत ‘Religious Nones’ म्हटले जाते, त्यांची संख्या वेगाने वाढून २९% झाली आहे.

ही आकडेवारी अधिक खोलात जाऊन पाहिल्यास एक धक्कादायक वास्तव समोर येते – तरुण पिढी रिलीजन्सपासून वेगाने दूर जात आहे. १८ ते २९ वयोगटातील तरुण हे ६५ वर्षांवरील वृद्धांच्या तुलनेत खूपच कमी प्रमाणात रिलीजनशी जोडलेले आहेत. अमेरिकेतील कोणत्याही अलीकडील पिढीने वय वाढल्यावर रिलीजनशी अधिक जोडले जाण्याचे लक्षण दाखवलेले नाही. याचा अर्थ असा की, हे परिवर्तन तात्पुरते नसून कायमस्वरूपी आहे. कोष्टक १: अमेरिकेतील लोकसंख्येतील बदल-रिलीजनच्या आधारे (२००७ – २०२४)

 

युरोप आणि जागतिक स्तरावरील पांथीक अलिप्तता

हा कल केवळ अमेरिकेपुरता मर्यादित नाही. प्यू रिसर्चच्या जागतिक सर्वेक्षणानुसार, बालपणीचा पंथ सोडून देण्याची (Religious Switching) प्रक्रिया पाश्चात्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर घडत आहे. नेदरलँड्समध्ये ३६% लोकांनी आपला बालपणीचा पंथ सोडला आहे, तर अमेरिकेत हे प्रमाण २८% आहे. विशेष म्हणजे, हे लोक एका संघटित पंथातून दुसऱ्या पंथात जात नाहीत, तर ते पंथाच्या चौकटीतूनच बाहेर पडत आहेत. याला अलिप्तता म्हटले जाते.

स्वीडनसारख्या देशात, जिथे ख्रिश्चन परंपरेचा मोठा इतिहास आहे, तिथे आता २९% लोक, जे ख्रिश्चन म्हणून वाढले होते, आता स्वतःला ‘Non-religious’ मानतात. याउलट, भारतासारख्या देशात ९५% लोक त्यांच्या बालपणीच्या धर्माशी आजही जोडलेले आहेत. हा विरोधाभास पाश्चात्य आणि पौर्वात्य, विशेषतः भारतीय, धार्मिक संरचनांमधील मूलभूत फरक अधोरेखित करतो.

जागतिक पांथीक विविधता अहवाल २०२६

१२ फेब्रुवारी २०२६ रोजी प्यू रिसर्च सेंटरने प्रसिद्ध केलेला ‘जागतिक पांथीक विविधता’ (Religious Diversity Around the World) हा अहवाल पाश्चात्य जगातील पांथिक ऱ्हासावर शिक्कामोर्तब करतो. या अहवालातील आकडेवारी अब्राहमिक पंथांच्या, विशेषतः युरोपमधील स्थितीवर प्रकाश टाकते. नेदरलँड्सचे उदाहरण (अब्राहमिक पंथाचा अस्त):

या अहवालानुसार नेदरलँड्समध्ये अलिप्त लोकांची संख्या ५४% पर्यंत वाढली आहे. महत्त्वाची विश्लेषणात्मक बाब म्हणजे, यामुळे नेदरलँड्सची ‘पांथीक विविधता’ (Religious Diversity Index अर्थात RDI) तांत्रिकदृष्ट्या कमी झाली आहे. पूर्वी तिथे ख्रिश्चनांचे विविध उपपंथ होते, पण आता अलिप्त हाच एक बहुसंख्य गट बनला आहे. यातून हे दर्शवते की पाश्चात्य प्रगत देशांत संघटित ‘रिलीजन’ लोप पावत असून, तिथे एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

अमेरिकेतील बदलती समीकरणे:

या अहवालानुसार, अमेरिकेत ख्रिश्चनांचे प्रमाण ६४% असून, अलिप्त लोक २९% आहेत. अमेरिकेचा ‘पांथीक विविधता निर्देशांक’ (RDI) ५.८ असून तो लोकसंख्येने मोठ्या असलेल्या देशांमध्ये सर्वाधिक आहे. मात्र, ख्रिश्चन पंथाची पूर्वी असलेली मक्तेदारी आता संपली आहे आणि लोकांचा एक मोठा वर्ग उभा राहिला आहे.

आशिया आणि सिंगापूरचे वैश्विक मॉडेल

जगातील सर्वाधिक पांथिक विविधता असलेला देश म्हणून सिंगापूर (RDI ९.३) समोर आला आहे. तिथे बौद्ध (३१%), ख्रिश्चन (१९%), मुस्लिम (१६%) आणि हिंदू (५%) एकत्र नांदतात. हे आकडे भारतीय तत्त्वज्ञानातील ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या मूल्याचे जागतिक यश अधोरेखित करतात, जिथे विविध पंथ एकमेकांचा नाश न करता सहअस्तित्वात राहू शकतात. याउलट, येमेन आणि अफगाणिस्तानसारखे इस्लामी देश सर्वात कमी विविधता असलेले देश ठरले आहेत.

पाश्चात्य तरुणांच्या अलिप्ततेची कारणे: अब्राहमिक पंथांचा ‘फोलपणा’?

पाश्चात्य तरुणांचा पंथांवरील विश्वास उडण्यामागे अनेक कारणे आहेत, जी अब्राहमिक पंथांच्या, विशेषतः संस्थात्मक ख्रिश्चन पंथाच्या, तात्त्विक मर्यादांकडे बोट दाखवतात. प्यू रिसर्च आणि इतर समाजशास्त्रीय अभ्यासांमधून खालील प्रमुख कारणे समोर येतात:

१. विश्वासाचा अभाव आणि विज्ञानाशी संघर्ष : सुमारे ४६% अमेरिकन प्रौढांनी पंथ सोडण्याचे मुख्य कारण ‘रिलीजियस शिकवणींवर विश्वास नसणे’ असे दिले आहे. आधुनिक विज्ञान आणि बायबलमधील सृष्टीच्या उत्पत्तीच्या कथा यांमधील तार्किक विसंगतीमुळे, तर्कनिष्ठ विचार करणाऱ्या तरुणांना ‘आंधळी श्रद्धा’ ठेवणे कठीण जाते. जेव्हा धर्म प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी प्रश्न विचारणे हेच पाप ठरवतो, तेव्हा बुद्धीवादी तरुण त्यातून बाहेर पडतात.

२. संस्थात्मक संरचना आणि नैतिक मतभेद: पाश्चात्य पंथ हे अत्यंत ‘संघटित’ (Organized) आहेत. तिथे चर्च, पोप किंवा पाद्री यांची मध्यस्थी अपरिहार्य असते. मात्र, आजच्या तरुणांना चर्चची भूमिका अनेक सामाजिक प्रश्नांवर (उदा. समलैंगिक संबंध, स्त्रियांचे अधिकार, गर्भपात) प्रतिगामी वाटते. ३४% लोकांनी पंथाच्या सामाजिक आणि राजकीय भूमिकांमुळे पंथ सोडल्याचे कबूल केले आहे. चर्चमधील लैंगिक शोषणाची प्रकरणे आणि पंथाच्या नेत्यांवरील अविश्वास यामुळे ‘संस्थात्मक पंथ’ तरुणांच्या नजरेतून उतरला आहे.

३. आध्यात्मिक भूकेची अतृप्तता: महत्त्वाचे म्हणजे, पंथ सोडणारे सर्वच तरुण भौतिकवादी होत नाहीत. ते स्वतःला अध्यात्मिक पण धार्मिक नाही असे म्हणवून घेतात. ४५% लोकांनी सांगितले की त्यांचा बालपणीचा पंथ त्यांच्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करू शकला नाही. याचा अर्थ असा की, पाश्चात्य पंथांची ‘विश्वास आणि भीती’ वर आधारित चौकट मानवाच्या उच्च आध्यात्मिक गरजा पूर्ण करण्यात कुठेतरी कमी पडत आहे. भारतीय युवा पिढी आणि अध्यात्म

एकीकडे पाश्चात्य जगात चर्च रिकामे होत आहेत आणि पंथाच्या परिघातून लोक मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. दुसरीकडे, भारतात परिस्थिती पूर्णपणे भिन्न आहे. भारतामध्ये ‘आधुनिकता’ आणि ‘अध्यात्म’ यांचा संघर्ष नसून संगम पाहायला मिळत आहे. भारतीय तरुण पिढी तंत्रज्ञानाचा स्वीकार करत असतानाच आपल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक मुळांकडे अधिक सजगतेने वळत आहे.

आकडेवारी आणि कल: भारतीय तरुणांचा वाढता ओढा

भारतातील विविध सर्वेक्षणांचे निष्कर्ष हे सिद्ध करतात की धर्म आणि अध्यात्म हे भारतीय तरुणांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालले आहेत.

ओमटीव्ही सर्वेक्षण: ओमटीव्ही या भारतीय अध्यात्मिक आणि सांस्कृतिक कंटेंट प्लॅटफॉर्मने केलेल्या सर्वेक्षणानुसार, त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील ८०% दर्शक हे १८ ते ३० वयोगटातील तरुण आहेत. अध्यात्म हा वृद्धांचा विषय आहे ह्या सर्वसाधारण समजाला धक्का देणारी ही आकडेवारी आहे. या सर्वेक्षणात असेही दिसून आले की, टियर-२ शहरे (उदा. इंदूर, जयपूर, कानपूर) या बाबतीत आघाडीवर आहेत.

आध्यात्मिक पर्यटन : भारतात ‘आध्यात्मिक पर्यटन’ (खरेतर त्याला तीर्थयात्रा हाच योग्य शब्द आहे) वेगाने वाढत असून त्यात तरुणांचा मोठा वाटा आहे. अयोध्येतील राम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर किंवा ऋषिकेशमधील योग आश्रम या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांमध्ये ‘जेन झी’ आणि ‘मिलेनियल्स’ ह्या गटांत मोडणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. सोशल मीडियामुळे मंदिरांचे स्थापत्य, इतिहास आणि त्यामागील विज्ञान समजून घेण्याची उत्सुकता तरुणांमध्ये निर्माण झाली आहे.

भारतीय तरुणांच्या धर्माप्रती आकर्षणाची कारणे

पाश्चात्य तरुण त्यांच्या रिलीजन्सना बंदिस्त मानतात, तर भारतीय तरुण धर्मात यम-नियम असूनही ‘मुक्त’ मानतात. या फरकाची कारणे भारतीय संस्कृतीच्या गाभ्यात दडली आहेत.

१. मानसिक आरोग्य आणि तणाव व्यवस्थापन: आजचे जग अत्यंत स्पर्धात्मक आहे. परीक्षेचा तणाव, करिअरची चिंता आणि नातेसंबंधांमधील गुंतागुंत यामुळे तरुण पिढी मानसिक अस्वस्थतेचा सामना करत आहे. पाश्चात्य मानसशास्त्राच्या मर्यादा ओळखून, भारतीय तरुण मनःशांतीसाठी योग, ध्यान आणि गीतेच्या तत्त्वज्ञानाकडे वळत आहेत. त्यामागे, ओमटीव्हीचे संस्थापक नितीन जय शुक्ला यांच्या मते, “मानसिक शांततेचा शोध आणि आपल्या मुळांशी जोडले जाण्याची इच्छा” हे मुख्य कारण आहे. २. तर्कशुद्ध अध्यात्म

२. भारतीय अध्यात्म, विशेषतः वेदांत, हे ‘विश्वास ठेवा’ असे सांगत नाही, तर ‘अनुभव घ्या’ असे सांगते. गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, “विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु” (मी सांगितलेल्या ज्ञानाचा पूर्ण विचार कर आणि तुला योग्य वाटेल ते कर). हे स्वातंत्र्य आणि तर्कशुद्धता आधुनिक, विज्ञाननिष्ठ तरुणांना भावते. त्यांना इथे प्रश्न विचारण्याची मुभा आहे, जी अब्राहमिक रिलीजन्सच्या ‘डोग्मा’ मध्ये अनेकदा नाकारली जाते.

३. सांस्कृतिक अस्मिता : जागतिकीकरणाच्या रेट्यात आपली ओळख पुसली जाऊ नये, या भावनेतून भारतीय तरुण आपल्या परंपरेचा अभिमानाने स्वीकार करत आहेत.

स्वामी रंगनाथानंद आणि ‘आध्यात्मिक लोकशाही’

स्वामी रंगनाथानंद यांनी मांडलेली ‘आध्यात्मिक लोकशाही’ ही संकल्पना अत्यंत महत्वाची आहे. स्वामी रंगनाथानंद हे रामकृष्ण मठाचे १३ वे अध्यक्ष होते.

आध्यात्मिक लोकशाहीची संकल्पना

लोकशाही ही संकल्पना आपण सामान्यतः राजकारणाशी जोडतो, जिथे प्रत्येक नागरिकाला समान मताचा अधिकार असतो. परंतु स्वामी रंगनाथानंद यांच्या मते, राजकीय लोकशाही तोपर्यंत यशस्वी होऊ शकत नाही, जोपर्यंत तिचा पाया ‘आध्यात्मिक’ नसेल.

त्यांच्या मते, आध्यात्मिक लोकशाही म्हणजे: “प्रत्येक जीवात एकच दिव्य आत्मा वास करतो, या सत्याची जाणीव आणि त्या आधारे प्रत्येकाच्या स्वातंत्र्याचा आणि प्रतिष्ठेचा आदर करणे.” पाश्चात्य राजकीय लोकशाही माणसाला ‘बाहेरून’ (कायद्याच्या दृष्टीने) समान मानते, पण वेदांत माणसाला ‘आतून’ (आत्म्याच्या दृष्टीने) समान मानतो. जेव्हा आपण समजतो की समोरच्या व्यक्तीमध्ये आणि आपल्यामध्ये तोच एक ईश्वर आहे (‘तत् त्वम् असि’ – ते तू आहेस), तेव्हा भेदभावाला जागाच उरत नाही. यालाच स्वामीजी ‘अध्यात्मिक लोकशाही’ म्हणतात.

पाश्चात्य संघटित पंथ विरुद्ध आध्यात्मिक लोकशाही

स्वामीजींच्या मते, पाश्चात्य पंथातील तरुणांचा ओढा कमी होण्याचे मुख्य कारण हे आहे की, लोकशाही युगात वाढलेल्या तरुणांना त्यांच्या पंथातील ही ‘हुकूमशाही’ मानवत नाही. त्यांना आध्यात्मिक लोकशाही हवी आहे, जिथे त्यांना स्वतःचा मार्ग शोधण्याचे स्वातंत्र्य असेल.

भारतीय धर्माची पंचसूत्री: उदारता, स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता

भारतीय धर्माची ही पाच मूल्ये आजच्या युगात त्याला जागतिक स्तरावर स्वीकारार्ह बनवतात. ही मूल्ये भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत जरी पाश्चात्य शब्दांत दिसत असली, तरी त्यांचे अधिष्ठान हे भारतीय धर्म आणि संस्कृतीत खोलवर रुजलेले आहे.

उदारता

भारतीय धर्माची उदारता ही केवळ ‘सहिष्णुता’ (Tolerance) नाही. ‘सहिष्णुता’ या शब्दात एक नकारात्मक छटा आहे – “मी तुला सहन करतोय.” स्वामी विवेकानंदांनी शिकागोमध्ये म्हटल्याप्रमाणे, “आम्ही केवळ सार्वत्रिक सहिष्णुतेवर विश्वास ठेवत नाही, तर आम्ही सर्व धर्मांना सत्य म्हणून स्वीकारतो.”

पाश्चात्य अब्राहमिक पंथांमध्ये, विशेषतः कट्टर पंथांमध्ये, “माझाच देव खरा आणि इतर सर्व खोटे” (My God vs. Your God) हा संघर्ष आहे. याउलट, भारतीय धर्मात ‘इष्ट देवते’ची संकल्पना आहे. एकाच घरात एक व्यक्ती शिवाची पूजा करू शकते, दुसरी विष्णूची, आणि तिसरी निराकार ब्रह्माची उपासना करू शकते. कोणालाही आपला देव दुसऱ्यावर लादण्याची गरज नाही. ही बौद्धिक आणि आध्यात्मिक उदारता (Intellectual and Spiritual Generosity) पाश्चात्य तरुणांना आकर्षित करते, कारण ह्या उदारतेत त्यांना अब्राहमिक पंथांप्रमाणे ‘पापी’ किंवा ‘काफिर’ ठरवले जात नाही.

स्वातंत्र्य

पाश्चात्य इतिहासात ‘स्वातंत्र्य’ हे बऱ्याचदा ‘पंथांपासून स्वातंत्र्य’ या अर्थाने पाहिले गेले, कारण तिथे चर्चने विज्ञानावर आणि व्यक्तीस्वातंत्र्यावर बंधने घातली होती (उदा. गॅलिलिओचा छळ). भारतात मात्र, स्वातंत्र्य हे धर्माचे अंतिम ध्येय आहे – ज्याला आपण ‘मोक्ष’ म्हणतो. भारतीय परंपरेत: विचार स्वातंत्र्य: चार्वाकासारख्या ऋषींनी वेदांना आणि ईश्वराला नाकारले, तरीही त्यांना ‘ऋषी’ मानले गेले. नास्तिकता हा देखील भारतीय चिंतनाचा एक भाग आहे.

हे ही वाचा:

भारत ब्राझिलमध्ये रेअर अर्थचा घसघशीत करार

अफगाण सीमेवर पाकिस्तानची मोठी कारवाई

६ जानेवारी हल्ल्यानंतर ट्रम्प यांची खाती बंद

पाकड्यांचा कलंकी फिक्सर भारतावर टीका करतोय!

उपासनेचे स्वातंत्र्य: तुम्हाला हव्या त्या मार्गाने तुम्ही ईश्वराकडे जाऊ शकता.

स्वामी रंगनाथानंद म्हणतात की, “ज्या पंथात प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य नाही, तो पंथ मानवी आत्म्याचा विकास करू शकत नाही.” भारतीय धर्माने हे स्वातंत्र्य अबाधित ठेवल्यामुळेच आजचे विज्ञाननिष्ठ तरुण त्याकडे ओढले जात आहेत.

समता

फ्रेंच राज्यक्रांतीतुन उदयास आलेली समता ही राजकीय होती. पण प्राचीन भारतीय दर्शनातील समता ही अध्यात्मिक एकात्मतेवर (Spiritual Oneness) आधारित आहे. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, “विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि | शुनि चैव श्वपाके च पण्डिताः समदर्शिनः ||” (ज्ञानी पुरुष ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांकडे समदृष्टीने पाहतात).

आज पाश्चात्य जगात वांशिक भेद आणि लिंगभेद यांवरून मोठे संघर्ष सुरू आहेत. प्यू रिसर्चच्या विदेवरून (डेटा वरून) दिसते की अनेक तरुण याच कारणांमुळे ख्रिश्चन धर्माला सोडत आहेत. वेदांत तत्त्वज्ञान सांगते की शरीर, वर्ण किंवा लिंग वेगळे असले तरी, आतला ‘आत्मा’ एकच आहे. हे तत्त्वज्ञान आधुनिक समतेच्या लढ्याला सर्वात भक्कम तात्विक आधार देते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा बौद्ध धर्माचा स्वीकार करताना याच ‘मैत्री’ आणि ‘समते’च्या तत्त्वाचा आधार घेतला होता, जो भारतीय परंपरेचा भाग आहे.

न्याय

अब्राहमिक पंथांमध्ये न्यायाची संकल्पना ‘जजमेंट डे’ वर आधारित आहे. तिथे ईश्वर हा एक न्यायाधीश आहे जो शेवटच्या दिवशी ठरवतो की तुम्ही स्वर्गात जाणार की नरकात. ही संकल्पना अनेकदा भीतीदायक आणि अतार्किक वाटते (उदा. एखाद्या चांगल्या माणसाने बाप्तिस्मा घेतला नसेल तर तो नरकात जाणार का?).

भारतीय धर्मातील न्याय हा ‘कर्म सिद्धांता’वर आधारित आहे. हा एक वैश्विक नियम आहे.

वैज्ञानिक दृष्टिकोन: “प्रत्येक क्रियेला समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते” हा न्यूटनचा नियम जसा भौतिक जगात लागू होतो, तसाच तो नैतिक जगातही लागू होतो.

जबाबदारी: यात ईश्वर शिक्षा देत नाही, तर मनुष्य स्वतःच्या कर्माने स्वतःचे नशीब घडवतो. हे तरुणांना अधिक पटते, कारण यात त्यांना स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार मानले जाते, ईश्वराच्या हातातील बाहुले नाही.

बंधुता

फ्रेंच राज्यक्रांतीतील ‘बंधुता’ ही एका भौगोलिक सीमेपुरती किंवा विचारधारेपुरती मर्यादित होती. भारतीय संस्कृतीने जगाला ‘वसुधैव कुटुम्बकम्’ (संपूर्ण पृथ्वी हेच एक कुटुंब आहे) हा महामंत्र दिला.

स्वामी रंगनाथानंद स्पष्ट करतात की, राजकीय कायद्याने किंवा कराराने खरी बंधुता निर्माण होऊ शकत नाही. ती तेव्हाच निर्माण होईल जेव्हा आपण हे ओळखू की आपण सर्व एकाच चैतन्याचे अंश आहोत. आजच्या विभक्त होत चाललेल्या जगात, ही आध्यात्मिक बंधुता अत्यंत गरजेची आहे. जेव्हा एखादा पाश्चात्य तरुण भारतात येतो आणि त्याला ‘नमस्ते’ (तुझ्यातील ईश्वराला मी नमन करतो) या भावनेने स्वीकारले जाते, तेव्हा त्याला या बंधुतेचा प्रत्यक्ष अनुभव येतो. जागतिक तरुण आणि भारतीय परंपरेचे आकर्षण

केवळ भारतीयच नाही, तर जगभरातील तरुण, (विशेषतः अमेरिका आणि युरोपमधील) भारतीय धर्म आणि परंपरेकडे का ओढले जात आहेत?

योग आणि ध्यानाचा प्रभाव

योग आता केवळ व्यायामाचा प्रकार राहिला नसून तो जीवनशैलीचा भाग बनला आहे. आकडेवारीनुसार, अमेरिकेत ३६ दशलक्षाहून अधिक लोक नियमित योग करतात. शरीराकडून मनाकडे: सुरुवातीला केवळ शारीरिक फायद्यांसाठी योगाकडे वळलेले पाश्चात्य तरुण आता त्याच्या आध्यात्मिक अंगाकडे (अष्टांग योग, ध्यान) वळत आहेत. त्यांना समजले आहे की योग हे केवळ ‘वर्कआउट’ नाही तर ‘वर्क-इन’ (Work-in) आहे.

वैज्ञानिक पुरावे: ध्यानाचे मेंदूवर होणारे सकारात्मक परिणाम (Neuroplasticity) विज्ञानाने सिद्ध केल्यामुळे, विज्ञाननिष्ठ पाश्चात्य तरुणांना ते स्वीकारणे सोपे जाते.

वेदांत सोसायट्या आणि चिन्मय मिशनचे कार्य

स्वामी विवेकानंदांनी १८९३ मध्ये अमेरिकेत पेरलेले बीज आता वटवृक्ष झाले आहे. वेदांत सोसायट्या आणि चिन्मय मिशन यांसारख्या संस्थांनी पाश्चात्य तरुणांना ‘तर्कशुद्ध धर्म’ दिला आहे.

चिन्मय मिशनचा ‘बाल विहार’ प्रयोग: अमेरिकेत चिन्मय मिशनचे ‘बाल विहार’ वर्ग प्रचंड लोकप्रिय आहेत. तिथे मुलांना श्लोक केवळ पाठ करायला लावत नाहीत, तर त्यामागील अर्थ आणि विज्ञान समजावून सांगतात.

बौद्धिक आकर्षण: जे.डी. सॅलिंजर (J.D. Salinger), अल्डस हक्सले (Aldous Huxley) यांसारखे पाश्चात्य विचारवंत आणि साहित्यिक वेदांताकडे आकर्षित झाले, कारण त्यांना ख्रिश्चन पंथातील ‘पाप’ (Sin) या संकल्पनेपेक्षा वेदांतातील ‘दिव्यत्व’ (Divinity) ही संकल्पना अधिक मानवी आणि उन्नत वाटली.

‘पापी’ विरुद्ध ‘अमृतस्य पुत्रा:’ पाश्चात्य पंथांचे मूळ हे ‘मूळ पाप’ (Original Sin) या संकल्पनेत आहे – मानवाचा जन्मच पापातून झाला आहे. यामुळे अनेक तरुणांमध्ये न्यूनगंड (Guilt) निर्माण होतो.

याउलट, स्वामी विवेकानंद यांनी शिकागोमध्ये पाश्चात्य जगाला उद्देशून म्हटले होते: “पापी? मानवाला पापी म्हणणे हे पाप आहे! तुम्ही अमृताचे पुत्र आहात.” हा सकारात्मक आणि सन्मानजनक दृष्टिकोन (Positive Psychology) पाश्चात्य तरुणांना भारतीय परंपरेकडे खेचून आणत आहे. त्यांना इथे स्वतःचा उद्धार करण्यासाठी देवाची नाही, तर स्वतःची ओळख करून घेण्याची गरज वाटते.

शेवटी,प्यू रिसर्च सेंटरचा अहवाल आणि तत्सम जागतिक प्रवाहांचे समग्र विश्लेषण केल्यास खालील महत्त्वाचे निष्कर्ष हाती येतात:

१. अब्राहमिक पंथांचे संकट: पाश्चात्य जगात पंथांचा ऱ्हास हा केवळ आळस किंवा आधुनिकता ह्यामुळे नाही, तर तो तेथील ‘संघटित पंथांच्या’ (Organized Religions) संरचनात्मक त्रुटींचा आणि ‘मताग्रहाचा’ (Dogmatism) परिणाम आहे. विज्ञानाशी वैर आणि मानवी स्वातंत्र्याचा संकोच यामुळे हे पंथ आजच्या तरुणांना सामावून घेण्यात अपयशी ठरत आहेत.

२. भारतीय अध्यात्माचा विजय: भारताने मात्र धर्माला कधीही ‘बिलीफ सिस्टम’ (Belief System) बनवले नाही; ते एक ‘विज्ञान’ (Science of Consciousness) म्हणून विकसित केले. त्यामुळेच भारतीय तरुण विज्ञानाच्या युगातही अध्यात्माकडे वळत आहेत.

३. आध्यात्मिक लोकशाहीची गरज: स्वामी रंगनाथानंद यांनी मांडलेली ‘आध्यात्मिक लोकशाही’ ही आजच्या जगाची गरज आहे. राजकीय लोकशाही माणसाला बाह्यस्वरूपात स्वतंत्र करते, पण आध्यात्मिक लोकशाही त्याला आतून मुक्त करते. उदारता, स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांचे खरे अधिष्ठान हे राजकारण नसून अध्यात्म आहे, हे भारतीय चिंतनाने सिद्ध केले आहे.

जगाला आज ‘मतांतराची’ नाही, तर ‘रूपांतरा’ची गरज आहे. भारतीय संस्कृतीचे ‘एकम् सत् विप्रा बहुधा वदन्ति’ (सत्य एक आहे पण मार्ग अनेक आहेत) आणि ‘वसुधैव कुटुम्बकम्’ (जग एक कुटुंब आहे) हे विचारच जगाला संघर्षातून आणि मानसिक वैफल्यग्रस्ततेतून बाहेर काढू शकतात. भारताची ही ‘सॉफ्ट पॉवर’ केवळ राजकीय नाही, तर ती मानवी कल्याणाची गुरुकिल्ली आहे. ह्यामुळेच पाश्चात्य जगात पांथीक अलिप्तता वाढत असताना, भारतात मात्र तरुणांत आध्यात्मिक ओढ वाढतेय.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा