जयकुमार गोरेंकडून संजय राऊत, रोहित पवारांविरोधात हक्कभंग

‘लयभारी’ युट्युब चॅनेल विरोधात बदनामीचा आरोप करत हक्कभंग दाखल

जयकुमार गोरेंकडून संजय राऊत, रोहित पवारांविरोधात हक्कभंग

राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर महिलेला अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली जात आहे. दरम्यान, जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्यांविरोधात हक्कभंग दाखल करण्यात आला आहे. खासदार संजय राऊत, आमदार रोहित पवार आणि एका युट्युब चॅनेलवर हक्कभंग दाखल केला आहे.

जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वतःचे नग्न फोटो पाठवल्याचे सांगत हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा विनयभंग केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. रोहित पवार यांनीही यावर भाष्य केले होते. तर लयभारी युट्युब चॅनेलही बदनामी करत असल्याचा दावा जयकुमार गोरे यांनी केला आहे. या संदर्भात बोलताना जयकुमार गोरे यांनी बुधवारी म्हटले होते की, सदर प्रकरणात न्यायालयाने माझी निर्दोष मुक्तता केली आहे. ज्यांनी आरोप केले, त्यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार आहे. अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार आहे. त्यानंतर त्यांनी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी थेट हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. त्यामुळे जयकुमार गोरे यांच्या विरोधात ज्यांनी नाव घेऊन आरोप केले त्यांच्यावर हक्क भंग दाखल करण्यात आला आहे. यात संजय राऊत, रोहित पवार यांच्यासह लयभारी नावाचे युट्युब चॅनेल यांचाही समावेश आहे.

मंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार संजय राऊत, आमदार रोहित पवार आणि युट्युब चॅनलचे संपादक तुषार खरात यांच्या विरोधात तीन हक्कभंग प्रस्ताव मांडले आहेत. विधानसभा अध्यक्षांनी हे तिन्ही प्रस्ताव स्विकारले असून पुढील कार्यवाहीसाठी हक्कभंग समितीकडे पाठवले आहेत.

मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले होते की, त्यांनी महिलेला त्यांचे नग्न अवस्थेतील फोटो पाठवले. हे प्रकरण २०१९ साली निकालात निघाले होते. मात्र, आता मंत्री झाल्यानंतर जयकुमार गोरे पुन्हा या महिलेच्या पाठी लागल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता.

हे ही वाचा : 

अमेरिकेतील घुसखोरांना मायदेशी पाठवण्याचा खर्च ३० लाख डॉलर्स, उड्डाणे स्थगित

अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या!

शाळांमधील गैरसोयीवर दिल्लीच्या मुख्यमंत्री संतापल्या!

उत्तराखंडच्या हर्षिलमध्ये पंतप्रधान मोदींनी केली गंगा मातेची पूजा

संजय राऊत यांनी हे प्रकरण लावून धरल्यानंतर जयकुमार गोरे यांनी त्यांची बाजू स्पष्ट केली की, “माझ्यावर २०१७ साली एक गुन्हा दाखल झाला होता. दोन वर्षे हा खटला सुरु होता आणि २०१९ मध्ये या प्रकरणाचा निकाल. त्या निकालाची प्रत असून या प्रकरणात न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. त्यावेळी न्यायालयाने मोबाईल आणि इतर मुद्देमाल जप्त करण्याचे आदेश दिले होते. हा निकाल येऊन सहा वर्षे झाली आहेत,” असे जयकुमार गोरे यांनी म्हटले आहे.

Exit mobile version