अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या झाल्याचे वृत्त आहे. मृत विद्यार्थ्याचे नाव प्रवीण गंपा असे असून तो तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील केसमपेटचा रहिवासी होता. अमेरिकेतील मिलवॉकीमध्ये २७ वर्षीय प्रवीणचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळला. तो गेल्या वर्षी पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी अमेरिकेला गेला होता. विद्यार्थ्याच्या ओळखीच्या लोकांनी असा दावा केला आहे की त्याच्या घराजवळील समुद्रकिनाऱ्यावर त्याला गोळ्या घालून ठार मारण्यात आले. तथापि, त्याच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, एका दुकानातील काही चोरांनी त्याच्यावर गोळीबार केला, ज्यामध्ये त्याला आपला जीव गमवावा लागला.
इंडिया टुडेच्या बातमीनुसार, प्रवीण त्याच्या शिक्षणाच्या दुसऱ्या वर्षात होता. तो एका स्थानिक दुकानात अर्धवेळ नोकरीही करत होता. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांचे वडील राघवुलु गम्पा म्हणाले, “मला पहाटे ५ वाजता मुलाचा एक व्हॉट्सअॅप कॉल आला, पण त्याला उत्तर देवू शकलो नाही. त्यानंतर त्याला व्हॉइस मेसेज पाठवला. पण एक तास उलटूनही कोणताही कॉल परत आला नाही.”
प्रवीणचे वडील पुढे म्हणाले, “जेव्हा मी त्याच्या मित्रांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी मला सांगितले की त्यांना माहिती मिळाली आहे की तो अर्धवेळ नोकरीसाठी एका दुकानात गेला आहे. त्यानंतर काही चोरांनी तिथे गोळीबार केला. त्याला गोळी लागली आणि तो मरण पावला.” दरम्यान, शिकागोमधील भारतीय दूतावासाने सांगितले की त्यांनी प्रवीणच्या कुटुंबाशी संपर्क साधला आहे आणि सर्वतोपरी मदत केली जात आहे.
हे ही वाचा :
शाळांमधील गैरसोयीवर दिल्लीच्या मुख्यमंत्री संतापल्या!
उत्तराखंडच्या हर्षिलमध्ये पंतप्रधान मोदींनी केली गंगा मातेची पूजा
यूपीच्या कौशांबीतून दहशतवाद्याला अटक
कौशंबीमधून बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या दहशतवाद्याला अटक
गेल्या काही वर्षांत अमेरिकेत झालेल्या प्राणघातक हल्ल्यांमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी मारले गेले आहेत. २० जानेवारी रोजी तेलंगणातील २६ वर्षीय विद्यार्थी रवी तेजाची वॉशिंग्टनमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्याच वेळी, नॉर्थ अमेरिकन असोसिएशन ऑफ इंडियन स्टुडंट्सने एक्सवर पोस्ट केले आणि लिहिले की, “भारतातील हैदराबाद येथील २६ वर्षीय विद्यार्थी रवी तेजाची वॉशिंग्टन डीसीमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. तो २०२२ मध्ये एमबीए करण्यासाठी अमेरिकेत गेला होता. सध्या या घटनेची चौकशी सुरू आहे.”
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, २२ वर्षीय भारतीय वंशाची महिला संतारा साजू न्यूब्रिजजवळील पाण्यात मृतावस्थेत आढळली होती. त्याचप्रमाणे कॅनडामध्येही तीन भारतीय विद्यार्थ्यांच्या हत्येची बातमी समोर आली होती. त्यानंतर भारताने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती.