अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश केलेल्या स्थलांतरितांना परत पाठवण्यासाठी महागड्या लष्करी विमानांचा वापर डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने स्थगित केल्याची माहिती आहे. अमेरिकन लष्करी विमानांचा वापर महागडा आणि अकार्यक्षम ठरत असल्याचे कारण देत हा निर्णय घेण्यात आला आहे. या कारवाई संदर्भातील शेवटचे उड्डाण हे १ मार्च रोजी होणार आहे यानंतर सध्या पुढील कोणत्याही उड्डाणांचे वेळापत्रक जारी करण्यात आले नसल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अमेरिकेच्या सत्तेची सूत्र हाती घेताच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांना मायदेशी धाडण्याची मोहीम कठोर इमिग्रेशन धोरणांचा भाग म्हणून अंमलात आणली. लष्करी उड्डाणांचा वापर बेकायदेशीर इमिग्रेशनवर प्रशासनाच्या कारवाईबाबत एक मजबूत संदेश पाठवण्यासाठी होता. हे धोरण लागू झाल्यापासून, प्रशासनाने भारत, ग्वाटेमाला, इक्वेडोर, पेरू, होंडुरास, पनामा आणि ग्वांतानामो बे सारख्या देशांमध्ये सुमारे ४२ हद्दपारी उड्डाणांसाठी C-17 आणि C-130 लष्करी विमानांचा वापर केला. मात्र, ही उड्डाणे चांगलीच महागडी ठरली आहेत.
भारतात येण्यासाठी केलेल्या उड्डाणांचा प्रत्येकी खर्च हा ३० लाख डॉलर्स इतका आला. ग्वांतानामो बे येथे जाणाऱ्या काही उड्डाणांसाठी प्रत्येकी २०,००० डॉलर्स खर्च आला. तुलनेने, यूएस ट्रान्सपोर्टेशन कमांडनुसार, मानक यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) नागरी विमानांच्या उड्डाणांसाठी प्रति तास ८,५०० डॉलर्स ते १७,००० डॉलर्स इतका खर्च येतो, तर C-17 लष्करी विमानासाठी प्रति तास २८,५०० डॉलर्स इतका खर्च येतो. याव्यतिरिक्त, मेक्सिकोच्या हवाई क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या अमेरिकन लष्करी विमानांवरील निर्बंधांमुळे प्रवासाचा वेळ आणि खर्च आणखी वाढला आहे.
हे ही वाचा :
अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या!
शाळांमधील गैरसोयीवर दिल्लीच्या मुख्यमंत्री संतापल्या!
उत्तराखंडच्या हर्षिलमध्ये पंतप्रधान मोदींनी केली गंगा मातेची पूजा
यूपीच्या कौशांबीतून दहशतवाद्याला अटक
काही लॅटिन अमेरिकन देशांनी अमेरिकन लष्करी विमानांद्वारे निर्वासित स्थलांतरितांना स्वीकारण्यास नकार दिला आहे. जानेवारीमध्ये, कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी दोन C-17 विमानांना प्रवेश नाकारला, यानंतर ट्रम्प यांनी शुल्क आकारण्याची धमकी दिली. व्हाईट हाऊसने नंतर जाहीर केले की कोलंबियाने निर्वासितांना स्वीकारण्यास सहमती दर्शविली आहे, परंतु कोणतेही अमेरिकन लष्करी विमान तेथे उतरलेले नाही. त्याऐवजी, कोलंबिया आणि व्हेनेझुएला यांनी निर्वासित नागरिकांना वाहतूक करण्यासाठी स्वतःच्या व्यावसायिक उड्डाणांचा वापर केला आहे.