नंबर वनशी भिडणार, आयुष स्वतःची वाट घडवणार!

नंबर वनशी भिडणार, आयुष स्वतःची वाट घडवणार!

भारतीय बॅडमिंटनपटू आयुष शेट्टी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. भारताच्या दिग्गज खेळाडूंच्या कामगिरीशी स्वतःची तुलना करण्याऐवजी आपला मार्ग स्वतः घडवण्याचा निर्धार आयुषने व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, पहिल्याच फेरीत त्याच्यासमोर जगातील नंबर वन खेळाडू चीनचा शी यू क्यूई याचे आव्हान असणार आहे.

वर्षाच्या सुरुवातीला निंगबो येथे झालेल्या बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपमध्ये उपविजेता ठरून चर्चेत आलेल्या २१ वर्षीय आयुषसमोर वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या पदार्पणातच मोठी परीक्षा असेल. आशिया चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात शी यू क्यूईने आयुषचा सरळ गेममध्ये पराभव केला होता. आता घरच्या प्रेक्षकांच्या पाठिंब्यासह आयुषला त्या पराभवाचा हिशेब चुकता करण्याची संधी मिळणार आहे.

भारताच्या दिग्गज खेळाडूंची कामगिरी आपल्यासाठी बेंचमार्क आहे का, असे विचारले असता आयुष म्हणाला, “मी त्याकडे बेंचमार्क म्हणून पाहत नाही. मला माझा मार्ग स्वतः घडवायचा आहे. माझा बेंचमार्कही मीच ठरवू इच्छितो.”

तो पुढे म्हणाला, “इतरांनी काय केले किंवा खेळासाठी काय योगदान दिले, याचा मी विचार करत नाही. ते या खेळाचे दिग्गज आहेत. मात्र, माझे लक्ष स्वतःवर आहे. चांगला खेळ करत राहायचे आणि सामने जिंकायचे, एवढेच माझे ध्येय आहे.”

पुढच्या पिढीसाठी बेंचमार्क निर्माण करण्याचा दबाव घ्यायचा नसल्याचेही आयुषने स्पष्ट केले. “मला खेळाचा आनंद घ्यायचा आहे. ही भारतात होणारी वर्ल्ड चॅम्पियनशिप असल्याने दबाव नक्कीच आहे. मात्र, भारतातच वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदार्पण करणे माझ्यासाठी शानदार संधी आहे. हा माझ्यासाठी खरोखरच खास टूर्नामेंट आहे,” असे त्याने सांगितले.

शी यू क्यूईविरुद्धची पहिलीच लढत आयुषसाठी कठीण असणार आहे. मात्र, गेल्या काही आठवड्यांत शी आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये नसल्याने आयुषसमोर सामना अधिक चुरशीचा करण्याची संधी असेल. शीविरुद्ध उपयोगी ठरणाऱ्या खेळातील काही बाबींवर आयुष सध्या मेहनत घेत आहे. विशेषतः त्याच्या डिफेन्स आणि फिटनेसमध्ये झालेली सुधारणा निर्णायक ठरू शकते.

भारत तब्बल १७ वर्षांनंतर प्रथमच या स्पर्धेचे आयोजन करत आहे. त्यामुळे घरच्या प्रेक्षकांसमोर पहिल्याच वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये खेळण्याचा अनुभव आयुषसाठी आणखी खास ठरणार आहे.

“अपेक्षा तर आहेतच. लोकांना मी पुढे जावे असे वाटत असेल. मात्र, माझा पहिलाच सामना वर्ल्ड नंबर वनविरुद्ध आहे, हे मोठे आव्हान आहे. त्यामुळे मला मोठ्या पाठिंब्याची अपेक्षा आहे. माझ्याकडून अपेक्षा असतील आणि मी त्यासाठी खूप उत्सुक आहे. या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत आहे,” असे आयुषने सांगितले.

Exit mobile version