टी-२० वर्ल्डकप २०२६ मधून बांगलादेशची हकालपट्टी!

टी-२० वर्ल्डकप २०२६ मधून बांगलादेशची हकालपट्टी!

टी-२० वर्ल्डकप २०२६ संदर्भात बांगलादेश आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) यांच्यात सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा निघाला आहे. भारतात खेळण्यासाठी येणार नाही, अशी भूमिका ठामपणे मांडणाऱ्या बांगलादेशला आयसीसीनं मोठा दणका दिला असून, त्यांना थेट वर्ल्डकपमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यांच्या जागी आता स्कॉटलंडला टी-२० वर्ल्डकप २०२६ मध्ये सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, आयसीसीनं यापूर्वीच बांगलादेशला स्पष्ट इशारा दिला होता की, भारतात खेळण्याची तयारी ठेवा, अन्यथा तुमच्या जागी स्कॉटलंडला संधी दिली जाईल. या निर्णयासाठी बांगलादेशला काही दिवसांचा अवधीही देण्यात आला होता. मात्र, भारतात येणार नाही, या भूमिकेवर बांगलादेश ठाम राहिला. अखेर आयसीसीनं कोणतीही तडजोड न करता बांगलादेशची टी-२० वर्ल्डकप २०२६ मधून गच्छंती करण्याचा अंतिम निर्णय घेतला.

बांगलादेशच्या या हटवादी भूमिकेचा थेट फायदा स्कॉटलंडला झाला असून, त्यांना अचानक वर्ल्डकपमध्ये प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात हा निर्णय मोठी उलथापालथ मानला जात आहे.


बांगलादेश भारतात येण्यास राजी का नाही?

बांगलादेश भारतात खेळण्यास नकार देण्यामागे अलीकडील घडामोडी कारणीभूत ठरल्याचं सांगितलं जात आहे. बीसीसीआयच्या सूचनेनुसार कोलकाता नाईट रायडर्सनं बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्ताफिजूर रहमान याला संघातून बाहेर काढलं.

आयपीएल २०२६ साठी कोलकात्यानं मुस्ताफिजूरसाठी ९.२० कोटी रुपये मोजले होते. मात्र, काही महिन्यांपासून बांगलादेशात हिंदूंवर होत असलेले हल्ले, हत्या आणि धार्मिक हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयनं कठोर भूमिका घेतली. त्यानंतरच कोलकात्याला मुस्ताफिजूरला रिलीज करण्याची सूचना करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर बांगलादेश क्रिकेट मंडळानं नाराजी व्यक्त करत भारतात खेळण्यास नकार दिल्याचं सांगितलं जात आहे.


आयसीसीचा ठाम संदेश

या संपूर्ण प्रकरणातून आयसीसीनं स्पष्ट संदेश दिला आहे की,
स्पर्धेचे यजमान देश, सुरक्षा आणि आयोजन व्यवस्थेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

भारतामध्ये खेळण्यास नकार देणाऱ्या संघाला स्पर्धेबाहेर ठेवण्याचा निर्णय हा याच भूमिकेचा भाग असल्याचं मानलं जात आहे.

Exit mobile version