जम्मू-काश्मीरचे खेळाडू कौतुकास पूर्णपणे पात्र

जम्मू-काश्मीरचे खेळाडू कौतुकास पूर्णपणे पात्र

जम्मू-काश्मीरने इतिहास रचत प्रथमच रणजी ट्रॉफीचे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. कर्नाटकविरुद्धचा अंतिम सामना अनिर्णित राहिला, मात्र पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर जम्मू-काश्मीरने हा किताब पटकावला.

आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी जम्मू-काश्मीर संघाचे ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन करत ही कामगिरी जिद्द आणि सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याचे म्हटले आहे. ही विजयगाथा येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर शाह यांनी लिहिले, “हिम्मत आणि जिद्दीची अप्रतिम कहाणी लिहिल्याबद्दल जम्मू-काश्मीर संघाचे अभिनंदन. खेळाडू या कौतुकास पूर्णपणे पात्र आहेत. मात्र या ऐतिहासिक यशामागे पडद्यामागून मेहनत घेणाऱ्या प्रशिक्षक, व्यवस्थापन आणि प्रशासक यांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे.”

या अंतिम सामन्यात जम्मू-काश्मीरने पहिल्या डावात ५८४ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात कर्नाटकचा पहिला डाव केवळ २९३ धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात जम्मू-काश्मीरने ११३ षटकांत ४ बाद ३४२ धावा करत सामना अनिर्णित राखला आणि पहिल्या डावातील महत्त्वपूर्ण आघाडीच्या जोरावर विजेतेपद मिळवले.

पाच दिवस चाललेल्या या अंतिम लढतीत संयम, धैर्य आणि सर्वांगीण उत्कृष्ट खेळाच्या जोरावर जम्मू-काश्मीरने पहिले रणजी विजेतेपद पटकावले.

या विजयाचा परिणाम केवळ निकालापुरता मर्यादित नसून तो प्रदेशातील युवा क्रिकेटपटूंना मोठी प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला. “मला खात्री आहे की हा विजय आजच्या पिढीच्या मनात आत्मविश्वास निर्माण करेल आणि पुढील पिढीला बॅट किंवा चेंडू हातात घेण्यासाठी प्रेरित करेल,” असे त्यांनी म्हटले.

क्रिकेटमध्ये प्रेरणादायी कथा निर्माण करण्याची ताकद असल्याचे अधोरेखित करत शाह यांनी जम्मू-काश्मीरच्या या यशाला व्यापक स्तरावर गौरव मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

दरम्यान, बीसीसीआय अध्यक्ष मिथुन मन्हास यांनी संघातील बदलांचा उल्लेख करत या यशाचे श्रेय सुरुवातीच्या प्रयत्नांना दिले. त्यांनी म्हटले, “हा एक शानदार प्रवास आहे. जून २०२१ मध्ये याची सुरुवात झाली. बीसीसीआयचे, विशेषतः जय भाईंचे आभार मानतो. ६७ वर्षांनंतर जम्मूत येणारे ते पहिले सचिव होते. त्यांनी परिस्थिती पाहिली आणि त्यानंतर आम्ही मागे वळून पाहिले नाही.”

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनीही संघाचे अभिनंदन करत म्हटले, “मुलांनो, तुम्ही कमाल केलीत. इतिहास घडवला. रणजी ट्रॉफीच्या या शानदार विजयाबद्दल जम्मू-काश्मीर क्रिकेट संघाचे मनःपूर्वक अभिनंदन. तुम्ही संपूर्ण देशाचा अभिमान वाढवला आहे.”

Exit mobile version