टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये रविवारी टीम इंडियासमोर ‘करा किंवा मरा’ अशीच परिस्थिती उभी ठाकली आहे. कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर भारताची वेस्टइंडिजशी भिडंत होणार असून सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी हा सामना जिंकणे भारतासाठी अत्यावश्यक आहे.
सुपर-८ फेरीची सुरुवात भारतासाठी धक्कादायक ठरली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७६ धावांनी झालेल्या पराभवामुळे संघाच्या नेट रनरेटवर मोठा परिणाम झाला. मात्र २६ फेब्रुवारीला झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दमदार पुनरागमन केले. भारताने झिम्बाब्वेला ७२ धावांनी पराभूत करत स्पर्धेत आपली दावेदारी पुन्हा मजबूत केली.
फलंदाजीत अभिषेक शर्माने उत्कृष्ट लय दाखवत स्पर्धेतील पहिले अर्धशतक झळकावले. हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांनीही आक्रमक फलंदाजी करत महत्त्वाचे योगदान दिले. गोलंदाजीत अर्शदीप सिंगने अवघ्या २४ धावा देत ३ बळी घेतले, तर वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनीही प्रभावी कामगिरी बजावली.
दुसरीकडे, सुपर-८ मधील पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेला १०७ धावांनी पराभूत करणाऱ्या वेस्टइंडिजला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ९ विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. १७७ धावांचे लक्ष्य बचावण्यात त्यांचे गोलंदाज अपयशी ठरले. जेसन होल्डरने ३१ चेंडूत ४९ धावांची झुंजार खेळी केली, तर रोमारियो शेफर्डने ३७ चेंडूत ५२ धावा करत लढत दिली.
टी२० क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात आतापर्यंत एकूण ३० सामने झाले आहेत. त्यापैकी १९ सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे, तर वेस्टइंडिजने १० सामने जिंकले असून १ सामना निकालाशिवाय राहिला आहे.
ईडन गार्डन्सची खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक मानली जाते. चेंडूला चांगली उसळी मिळत असल्याने सुरुवातीला फलंदाजांना मदत होते, तर नंतर फिरकीपटूंनाही साथ मिळू शकते. येथे पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या १६१ असून दुसऱ्या डावात ती १३९ आहे.
या निर्णायक सामन्यात पावसाची शक्यता जवळपास नाही. रविवारी किमान तापमान २२ अंश सेल्सियस, तर कमाल तापमान ३३ अंश सेल्सियस राहण्याचा अंदाज आहे. हवामान स्वच्छ राहणार असून प्रेक्षकांना पूर्ण ४० षटकांचा थरार अनुभवता येणार आहे.
