पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) २०२६ सुरू होण्याच्या तोंडावर बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. पीएसएलमध्ये सहभागी होण्यासाठी बांग्लादेशच्या खेळाडूंना सरकारच्या मंजुरीची आवश्यकता असल्याचे बीसीबीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पाकिस्तानसोबतच्या क्रिकेट संबंधांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पीएसएल २०२६ ची सुरुवात २६ मार्चपासून होणार आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा असल्याने सरकारची परवानगी घेतल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे बीसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. “सामान्य परिस्थितीत अशी परवानगी आवश्यक नसते, पण सध्या परिस्थिती वेगळी आहे,” असे त्यांनी नमूद केले.
सरकारकडून परवानगी मिळाल्यासच खेळाडू पाकिस्तानला जातील. अन्यथा ते न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या व्हाईट-बॉल मालिकेसाठी बांग्लादेशमध्येच तयारी करतील. न्यूझीलंडचा संघ १३ एप्रिल रोजी तीन वनडे आणि तीन टी-२० सामन्यांसाठी ढाकामध्ये दाखल होणार आहे.
बीसीबीने काही खेळाडूंना आंशिक ‘एनओसी’ दिले आहेत. मुस्तफिजुर रहमानला २६ मार्च ते १२ एप्रिल आणि २४ एप्रिल ते ३ मे या कालावधीसाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच परवेज हुसैन इमोन, शोरीफुल इस्लाम, नाहिद राणा, तंजीद हसन तमीम आणि रिशाद हुसैन या खेळाडूंनाही यापूर्वी एनओसी देण्यात आले आहे. मात्र, अंतिम सहभाग सरकारच्या मंजुरीवर अवलंबून असेल.
दरम्यान, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील वाढत्या तणावामुळे पीएसएल २०२६ च्या सुरक्षित आयोजनाबाबत शंका व्यक्त केली जात आहे. तरीही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचा दावा केला आहे.
