वैभव सूर्यवंशीवर दबाव टाकू नका!

वैभव सूर्यवंशीवर दबाव टाकू नका!

श्रीलंकेचे माजी वेगवान गोलंदाज चमिंडा वास यांनी भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना त्याच्यावर अनावश्यक दबाव टाकू नये, असे आवाहन केले आहे. अवघ्या १५ वर्षीय वैभवमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण असून तो भविष्यात भारतासाठी मोठी कामगिरी करेल, असा विश्वास वास यांनी व्यक्त केला.

सध्या तेलंगणा टी-२० लीगमध्ये पलामुरू स्ट्रायकर्स संघाचे मार्गदर्शक (मेंटॉर) म्हणून कार्यरत असलेल्या वास यांनी आयएएनएसशी संवाद साधताना सांगितले की, भारताने गेल्या काही वर्षांत जागतिक दर्जाचे अनेक युवा क्रिकेटपटू घडवले आहेत. वैभव अजून खूप लहान असून त्याला नैसर्गिकरीत्या विकसित होण्यासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे.

वास म्हणाले, “वैभवला भारताकडून खेळण्याची संधी नक्की मिळेल. तो राष्ट्रीय संघात आपले स्थान पक्के करेल आणि उत्कृष्ट कामगिरी करेल. मात्र त्याच्यावर अनावश्यक अपेक्षांचे ओझे टाकू नका.”

आयपीएल २०२५ मध्ये पदार्पणानंतर वैभव सूर्यवंशी चर्चेत आला. त्यानंतर त्याने इंडिया ‘अ’ आणि भारताच्या १९ वर्षांखालील संघाकडून सातत्यपूर्ण कामगिरी केली. आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने ७७६ धावा करत ऑरेंज कॅप पटकावली आणि त्याच्या दमदार कामगिरीमुळे भारतीय टी-२० संघातही त्याची निवड झाली.

तेलंगणा टी-२० लीगचे कौतुक करताना वास म्हणाले की, अशा स्पर्धांमुळे युवा खेळाडूंना स्वतःची क्षमता दाखवण्याची संधी मिळते आणि आयपीएल तसेच भारतीय संघापर्यंत पोहोचण्याचा मार्ग खुला होतो.

ते पुढे म्हणाले, “हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने सुरू केलेली ही स्पर्धा युवा खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक संघात प्रतिभावान खेळाडू आहेत. पलामुरू स्ट्रायकर्समध्येही अनेक युवा खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. संघ म्हणून आम्ही अपेक्षित यश मिळवू शकलो नाही, पण अनेक खेळाडूंनी प्रभावी प्रदर्शन केले.”

भारतातील विविध राज्यांमध्ये नियमित टी-२० स्पर्धा आयोजित केल्या जात असल्याने युवा क्रिकेटपटूंना सातत्याने संधी मिळत असून, याच व्यवस्थेमुळे भारतीय क्रिकेटची भक्कम पायाभरणी झाली आहे, असेही वास यांनी नमूद केले.

Exit mobile version