जिद्द, मेहनत आणि स्वप्नांवरचा विश्वास असेल तर गरिबी कधीच आड येत नाही, याचं जिवंत उदाहरण जालंधरच्या अर्जुन राजपूतने घालून दिलं आहे. डीएव्ही कॉलेजबाहेर छोले-कुलचेची छोटी रेहडी लावणाऱ्या होती राम यांचा मुलगा अर्जुन राजपूत याची भारतीय अंडर-१९ क्रिकेट संघात निवड झाली आहे.
आता ४ जुलैपासून भारतीय अंडर-१९ संघ श्रीलंका दौऱ्यावर रवाना होणार असून, या दौऱ्यात अर्जुन भारताची निळी जर्सी परिधान करून मैदानात उतरणार आहे. त्याच्या निवडीमुळे संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण असून, अर्जुन टीम इंडियासाठी धावा आणि बळी दोन्ही मिळवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अर्जुन हा डावखुरा फलंदाज असून उजव्या हाताचा ऑफ-स्पिन गोलंदाज आहे. त्याने क्रिकेटचा प्रवास माजी भारतीय फिरकीपटू हरभजन सिंग क्रिकेट अकादमीमधून सुरू केला. मर्यादित आर्थिक परिस्थिती असूनही त्याने कधीही हार मानली नाही. प्रशिक्षक विक्रम सिद्धू यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने आपल्या खेळात सातत्याने प्रगती केली.
भारतीय अंडर-१९ संघात निवड झाल्यानंतर अर्जुन म्हणाला, “मी आठ-नऊ वर्षांचा असताना क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. आज या टप्प्यावर पोहोचल्याचा खूप आनंद आहे. श्रीलंका दौऱ्यात आम्ही भारताचे प्रतिनिधित्व करणार आहोत. सर्व सामने जिंकून ट्रॉफी भारतात आणण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू. माझे आई-वडील आणि संपूर्ण कुटुंब नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिले. निराशेच्या काळात त्यांनीच मला प्रेरणा दिली.”
अर्जुनने सांगितले की, त्याचे वडील डीएव्ही कॉलेजबाहेर साधी रेहडी लावून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. “माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वडिलांनी खूप कष्ट घेतले. आता त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे. मी त्यांना अनेकदा सांगतो की, आता कुलचे बनवण्याचे काम सोडा. परिस्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही,” असे अर्जुन भावूक होत म्हणाला.
वडील होती राम यांनी सांगितले की, “मी अनेक वर्षांपासून कुलचे विकण्याचे काम करत आहे. अर्जुन पाच-सहा वर्षांचा असल्यापासून क्रिकेट खेळत आहे. त्याने दिवस-रात्र मेहनत घेतली. हरभजन सिंग अकादमीत प्रशिक्षण घेतले. त्याची भारतीय अंडर-१९ संघात निवड झाल्याची बातमी समजताच आमचा आनंद गगनात मावेनासा झाला.”
आई नन्ही देवी यांनीही आनंद व्यक्त करताना सांगितले, “आज सकाळी ही बातमी समजली आणि आनंदाश्रूंना वाट मोकळी झाली. हा आमच्या कुटुंबासाठी अभिमानाचा क्षण आहे.”
अर्जुनची बहीण किरण राजपूत हिने सांगितले की, “माझा भाऊ अनेक वर्षांपासून सातत्याने मेहनत करत होता. संपूर्ण कुटुंब त्याच्या पाठीशी उभे राहिले. आज त्याच्या मेहनतीचे चीज झाले असून, त्याला टीम इंडियाच्या निळ्या जर्सीत पाहण्याचे आमचे स्वप्न पूर्ण झाले आहे.”
गरीब कुटुंबातून आलेल्या अर्जुन राजपूतची ही यशोगाथा आज हजारो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. मेहनत, चिकाटी आणि कुटुंबाचा पाठिंबा असेल तर कोणतेही स्वप्न अशक्य नसते, हे अर्जुनने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे.
