कॉमनवेल्थ गेम्समध्ये पदक जिंकून देशाची मान उंचावणारे खेळाडू आता क्रिकेटच्या मैदानावर किंवा क्रीडा मंचावर नव्हे, तर थेट ‘कौन बनेगा करोडपती’च्या हॉट सीटवर दिसणार आहेत. ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मधील पदकविजेते शर्मिला धनखड, लव्हलिना बोर्गोहेन आणि झंडू कुमार हे लोकप्रिय क्विझ शोमध्ये विशेष पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या तिन्ही खेळाडूंना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बसण्याची संधी मिळणार आहे. कॉमनवेल्थ पदकविजेत्यांचा हा विशेष भाग १५ ऑगस्टनंतर प्रसारित होण्याची शक्यता आहे.
पॅरा अॅथलीट शर्मिला धनखड यांनी कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये एफ-५७ शॉटपुट प्रकारात सुवर्णपदक पटकावले. त्यांच्या पदकापेक्षा त्यांच्या संघर्षाची कहाणी अधिक प्रेरणादायी आहे. कौटुंबिक हिंसाचारातून बाहेर पडत त्यांनी क्रीडा क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आणि अखेर कॉमनवेल्थच्या मंचावर देशासाठी सुवर्णपदक जिंकले.
बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन यांनी महिलांच्या ७५ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले. तर पॅरा-पॉवरलिफ्टर झंडू कुमार यांनी पुरुषांच्या हेवीवेट गटात कांस्यपदक पटकावले. झंडू यांनी १९० किलो वजन उचलून १३०.९ गुण मिळवत भारताला या स्पर्धेतील पहिले पदक मिळवून दिले होते.
‘कौन बनेगा करोडपती’च्या नव्या पर्वाचा प्रीमियर १० ऑगस्टला सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर झाला. आता या स्पोर्ट्स तिकडीच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला वेगळाच रंग मिळणार आहे. अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नांना उत्तरे देतानाच हे खेळाडू आपल्या संघर्षाची आणि यशाची कहाणी देशासमोर मांडणार आहेत.
दरम्यान, ग्लासगो येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये भारताने एकूण ३९ पदके जिंकत पदकतालिकेत चौथे स्थान मिळवले. भारताच्या खात्यात १३ सुवर्ण, १७ रौप्य आणि ९ कांस्यपदके जमा झाली.
कुस्ती, शूटिंग आणि हॉकीसारखे काही महत्त्वाचे खेळ स्पर्धेत नसतानाही भारताची कामगिरी उल्लेखनीय ठरली. विशेषतः बॉक्सिंगमध्ये भारतीय खेळाडूंनी ७ सुवर्णपदके आणि ३ रौप्यपदकांसह एकूण १० पदके जिंकली. एका कॉमनवेल्थ स्पर्धेतील बॉक्सिंगमध्ये भारताने जिंकलेल्या सर्वाधिक सुवर्णपदकांचा हा विक्रम ठरला.
आता या तीन पदकविजेत्यांच्या संघर्षाची कहाणी अमिताभ बच्चन यांच्या ‘हॉट सीट’वरून घराघरात पोहोचणार आहे.
