एकेकाळी वनडे क्रिकेटच्या मैदानावर जगावर राज्य करणाऱ्या वेस्ट इंडिजसमोर आता विश्वचषकात प्रवेश करण्यासाठीच मोठी परीक्षा उभी राहिली आहे. १९७५ आणि १९७९ या पहिल्या दोन वनडे विश्वचषकांची विजेती वेस्ट इंडिज २०२७ च्या विश्वचषकासाठी थेट पात्र ठरणार नसून तिला क्वालिफायर स्पर्धा खेळावी लागणार आहे.
दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे २०२७ मध्ये वनडे विश्वचषक होणार आहे. विशेष म्हणजे २०२३ च्या भारतात झालेल्या वनडे विश्वचषकातही वेस्ट इंडिजला स्थान मिळवता आले नव्हते. वनडे विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच वेस्ट इंडिजला या स्पर्धेबाहेर राहावे लागले होते. त्यानंतर २०२५ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतही संघाला प्रवेश मिळाला नव्हता.
आता २०२७ च्या विश्वचषकाची वाटही वेस्ट इंडिजसाठी सोपी नाही. ३० सप्टेंबर २०२६ रोजीच्या आयसीसी वनडे क्रमवारीतील अव्वल आठ संघांना थेट पात्रता मिळणार आहे. यामध्ये यजमान दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांचा समावेश केला जाणार नाही.
आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लंड, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांनी विश्वचषकातील आपले स्थान निश्चित केले आहे. अफगाणिस्तानने आयर्लंडविरुद्ध सलग दोन वनडे सामने जिंकून विश्वचषकाचे तिकीट मिळवले आहे.
वेस्ट इंडिजला आता फेब्रुवारी २०२७ मध्ये होणाऱ्या क्वालिफायर स्पर्धेत खेळावे लागेल. या स्पर्धेत विजय मिळवून पुढचा मार्ग मोकळा करावा लागणार आहे. क्वालिफायरमधील विजेता थेट विश्वचषकाच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश करेल. तर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील संघांना ‘सुपर सीरीज’च्या पहिल्या फेरीत खेळावे लागेल. या तिरंगी मालिकेतील अव्वल संघाला दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळेल.
या क्वालिफायरमध्ये आयर्लंड आणि वेस्ट इंडिज, क्रिकेट विश्वचषक लीग-२ मधील अव्वल चार संघ तसेच विश्वचषक क्वालिफायर प्लेऑफमधील अव्वल चार संघ सहभागी होतील.
कधीकाळी विश्वचषक म्हणजे वेस्ट इंडिज आणि वेस्ट इंडिज म्हणजे विश्वचषक, अशी परिस्थिती होती. मात्र आता दोन वेळचा विश्वविजेता संघ विश्वचषकात जाण्यासाठीच पात्रता फेरीची लढाई लढणार आहे. वेस्ट इंडिज क्रिकेटच्या घसरणीचे हे आणखी एक ठळक चित्र मानले जात आहे.
