सागर धनखड हत्याप्रकरणी सुशीलचा जामीन फेटाळला

सागर धनखड हत्याप्रकरणी सुशीलचा जामीन फेटाळला

ऑलिम्पिक पदकविजेता मल्ल सुशील कुमार याला सागर धनखड हत्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. न्यायालयाने गुरुवारी त्याचा नियमित जामीन अर्ज फेटाळून लावला. याआधी रोहिणी न्यायालयानेही त्याची जामीन याचिका फेटाळली होती. त्या निर्णयाविरोधात सुशीलने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

४-५ मे २०२१ च्या मध्यरात्री दिल्लीतील छत्रसाल स्टेडियम परिसरात ज्युनिअर राष्ट्रीय कुस्तीपटू सागर धनखड याची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सुशील कुमार हा मुख्य आरोपी असून त्याला २३ मे २०२१ रोजी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली होती. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत आहे.

या प्रकरणात ऑक्टोबर २०२२ मध्ये न्यायालयाने सुशील कुमारविरुद्ध हत्या, गुन्हेगारी कट, धमकी, शस्त्रांसह दंगल तसेच आर्म्स अॅक्टअंतर्गत आरोप निश्चित केले होते. जुलै २०२३ मध्ये गुडघ्याच्या शस्त्रक्रियेसाठी त्याला एक आठवड्याचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता.

सागर धनखड हत्याकांडात नाव येण्यापूर्वी सुशील कुमार हा भारतातील सर्वात यशस्वी मल्लांपैकी एक मानला जात होता. त्याने बीजिंग ऑलिम्पिक २००८ मध्ये कांस्य, तर लंडन ऑलिम्पिक २०१२ मध्ये रौप्यपदक जिंकून देशाचे नाव उज्ज्वल केले होते.

Exit mobile version