भारताचा अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा आगामी श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघासाठी सर्वात महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो, असा विश्वास भारताचे माजी यष्टिरक्षक-फलंदाज दीप दासगुप्ता यांनी व्यक्त केला आहे. श्रीलंकेतील फिरकीला पोषक खेळपट्ट्यांवर खेळण्याचा आणि गोलंदाजी करण्याचा जडेजाचा मोठा अनुभव भारतीय संघासाठी निर्णायक ठरेल, असे त्यांनी म्हटले.
भारतीय संघातील अनेक खेळाडू प्रथमच श्रीलंकेतील कसोटी मालिकेत खेळणार आहेत. मात्र रवींद्र जडेजा आणि के. एल. राहुल यांच्याकडे श्रीलंकेतील कसोटी क्रिकेटचा अनुभव आहे. राहुलने २०१५ आणि २०१७ च्या दौऱ्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते, तर जडेजा २०१७ मध्ये भारताने श्रीलंकेला ३-० ने व्हाईटवॉश दिलेल्या ऐतिहासिक मालिकेचा सदस्य होता.
दीप दासगुप्ता म्हणाले, ‘फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्ट्यांवर केवळ चेंडू फिरतो म्हणून विकेट मिळत नाही. योग्य वेग, अचूक लाइन-लेंथ आणि परिस्थितीनुसार गोलंदाजी करण्याची कला अवगत असावी लागते. हिरव्या खेळपट्टीवर जसा काही वेगवान गोलंदाज अतिरिक्त उत्साहात शॉर्ट बॉल टाकतात, तसाच प्रकार फिरकीपटूंनी करू नये. योग्य ठिकाणी चेंडू टाकल्यासच त्याला आवश्यक वळण मिळते.’
जडेजाच्या अनुभवाचे कौतुक करताना त्यांनी सांगितले की, ‘जडेजाला अशा खेळपट्ट्यांवर गोलंदाजी कशी करायची याची उत्तम जाण आहे. श्रीलंकेतील परिस्थितीचा त्याला अनुभव असल्याने त्याने आपल्या अनुभवाचा फायदा युवा गोलंदाजांना करून दिल्यास भारतीय संघाला मोठा लाभ होईल.’
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका १५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे, तर दुसरा सामना २३ ऑगस्टपासून कोलंबो येथील सिंहली स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळविण्यात येणार आहे.
