जिद्द, मेहनत आणि संघर्ष यांचं नाव म्हणजे मीराबाई चानू! मणिपूरच्या डोंगरदऱ्यांत लहानपणी डोक्यावर लाकडांची जड मोळी वाहणारी ही मुलगी आज जागतिक वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णाक्षरांनी आपलं नाव कोरत आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये सलग तीन सुवर्णपदके जिंकणारी जगातील पहिली महिला वेटलिफ्टर बनत मीराबाईने इतिहास रचला आहे.
८ ऑगस्ट १९९४ रोजी मणिपूरमधील नोंगपोक काकचिंग येथे जन्मलेल्या मीराबाईचे बालपण अत्यंत हालाखीत गेले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने लहानपणीच ती डोंगर चढत लाकडांच्या जड मोळ्या वाहायची. तिची ही विलक्षण शारीरिक ताकदच पुढे तिच्या यशाचा पाया ठरली.
सुरुवातीला तिला तिरंदाजीची आवड होती. मात्र इम्फाळ येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या केंद्रात वेटलिफ्टिंगचा सराव पाहिल्यानंतर तिचा जीवनमार्गच बदलला. २००८ मध्ये तिने मणिपूर स्पोर्ट्स अकादमीत प्रशिक्षण सुरू केले. मात्र अकादमीपर्यंत पोहोचण्यासाठी तिच्याकडे प्रवासाचे पैसेही नसत. त्यामुळे वाळू आणि दगड वाहून नेणाऱ्या ट्रकचालकांकडून लिफ्ट मागून ती सरावासाठी जात असे.
२०१४ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिने रौप्यपदक जिंकून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची दमदार सुरुवात केली. त्यानंतर २०१७ च्या जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत दोन दशकांनंतर भारताला विश्वविजेतेपद मिळवून दिले.
२०१८ आणि २०२२ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिने सुवर्णपदकांवर मोहोर उमटवली. टोकियो ऑलिम्पिक २०२१ मध्ये ४९ किलो गटात रौप्यपदक जिंकत ऑलिम्पिकमध्ये रौप्य जिंकणारी पहिली भारतीय महिला वेटलिफ्टर ठरली.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक हुकल्यानंतर अनेकांनी तिच्या पुनरागमनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पण मीराबाईने हार मानली नाही. कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये ४८ किलो गटात एकूण १९० किलो वजन उचलत सुवर्णपदक पटकावले आणि कॉमनवेल्थच्या इतिहासात सलग तीन सुवर्णपदके जिंकणारी जगातील पहिली महिला वेटलिफ्टर होण्याचा मान मिळवला.
देशासाठी सातत्याने मिळवलेल्या यशाबद्दल मीराबाईला ‘पद्मश्री’ आणि ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न’ या सर्वोच्च क्रीडा सन्मानांनी गौरविण्यात आले आहे. तिचा प्रवास हा केवळ एका खेळाडूचा नाही, तर संघर्षातून स्वप्नांना सुवर्णस्पर्श देणाऱ्या भारताच्या जिद्दीचा प्रेरणादायी इतिहास आहे.
