प्रज्ञानानंदचा ‘चेकमेट’!

प्रज्ञानानंदचा ‘चेकमेट’!

भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंद याने जागतिक बुद्धिबळ विश्वात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. ग्रँड चेस टूर – सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्झ स्पर्धेत एक फेरी बाकी असतानाच त्याने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. अंतिम फेरीत उझबेकिस्तानच्या जावोखिर सिंदारोव याच्याविरुद्धचा सामना अनिर्णित राहिल्यानंतर प्रज्ञानानंदच्या जेतेपदावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले.

अवघ्या २० वर्षीय प्रज्ञानानंदने स्पर्धेत ३५ पैकी २३ गुण मिळवत विजेतेपद पटकावले. सिंदारोव २२ गुणांसह उपविजेता ठरला, तर अमेरिकेच्या वेस्ली सो याने २०.५ गुणांसह तिसरे स्थान मिळवले.

या विजेतेपदासाठी प्रज्ञानानंदला ५० हजार अमेरिकी डॉलर (सुमारे ₹४३ लाख) बक्षीस आणि १३ ग्रँड चेस टूर गुण मिळाले. या कामगिरीमुळे तो ग्रँड चेस टूरच्या एकूण गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच प्रज्ञानानंदने आघाडी कायम ठेवली. अखेरपर्यंत सिंदारोवने त्याला कडवी झुंज दिली, मात्र भारतीय ग्रँडमास्टरने आपले वर्चस्व अबाधित राखत आणखी एक प्रतिष्ठेचे विजेतेपद आपल्या नावावर केले.

विशेष म्हणजे, याच वर्षी जूनमध्ये प्रज्ञानानंदने नॉर्वे चेस स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय ठरत इतिहास घडवला होता. आता सेंट लुईसमधील या यशाने त्याच्या नावावर आणखी एक मोठी आंतरराष्ट्रीय कामगिरी जमा झाली आहे.
३१ जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान झालेल्या या स्पर्धेत जगातील १० अव्वल ग्रँडमास्टर्स सहभागी झाले होते. स्पर्धेत ९ रॅपिड आणि १८ ब्लिट्झ अशा एकूण २७ फेऱ्या खेळवण्यात आल्या.

Exit mobile version