भारतीय हॉकीच्या नव्या दमाच्या पिढीची खरी परीक्षा आता आशियाई रंगमंचावर होणार आहे. एएचएफ ज्युनियर आशिया चषक २०२६ स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने १८ सदस्यीय भारतीय पुरुष संघाची घोषणा केली असून, दमदार बचावपटू अनमोल एक्का याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. चीनमधील मोकी येथे ३० ऑगस्ट ते १३ सप्टेंबर दरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेत भारत विजेतेपदाच्या इराद्याने उतरणार आहे.
नवीन मुख्य प्रशिक्षक फ्रेडरिक सोयेज यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ सध्या बंगळुरूतील साई केंद्रात कसून सराव करत आहे. स्पर्धेपूर्वी संघाने बेल्जियमचा एक्स्पोजर दौरा करून बलाढ्य आंतरराष्ट्रीय संघांविरुद्ध सामने खेळले. या दौऱ्यातून खेळाडूंना मौल्यवान अनुभव मिळाला, तसेच संघरचना आणि रणनीती अधिक भक्कम करण्याची संधीही मिळाली.
तयारीचा पुढचा टप्पा म्हणून भारतीय संघ मलेशियाच्या २१ वर्षांखालील संघाविरुद्ध सराव सामने खेळत आहे. या सामन्यांमुळे स्पर्धेपूर्वी खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक वातावरणाची सवय होत आहे.
संघनिवडीबाबत प्रशिक्षक सोयेज म्हणाले, “संघातील प्रत्येक खेळाडूने गेल्या काही महिन्यांत कठोर परिश्रम घेतले आहेत. संघात समतोल, गुणवत्ता आणि दबावात उत्कृष्ट कामगिरी करण्याची क्षमता आहे. आम्ही शिस्तबद्ध आणि आक्रमक हॉकी खेळण्यावर भर देणार आहोत.”
एएचएफ ज्युनियर आशिया चषक ही आशियातील सर्वोत्तम युवा हॉकी स्पर्धांपैकी एक मानली जाते. या स्पर्धेत भारताच्या युवा खेळाडूंना स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्याची आणि भविष्यातील वरिष्ठ संघासाठी आपली दावेदारी मजबूत करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
