आपल्याच मैदानात भारत पाहुणा!

दिल्लीमध्ये अफगाणिस्तान करणार टीम इंडियाचे यजमानपद; ३ टी-२०चा थरार

आपल्याच मैदानात भारत पाहुणा!

क्रिकेट चाहत्यांसाठी आणखी एक धमाकेदार मालिका सज्ज झाली आहे. अफगाणिस्तान भारताविरुद्ध तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार असून, बीसीसीआयने मालिकेच्या तारखांवर शिक्कामोर्तब केले आहे. विशेष म्हणजे, भारतात अफगाणिस्तान पहिल्यांदाच टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाचे यजमानपद स्वीकारणार आहे.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन टी-२० सामने १३, १५ आणि १७ सप्टेंबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत.

बीसीसीआय अध्यक्ष मिथुन मन्हास यांनी अफगाणिस्तान क्रिकेटच्या विकासासाठी भारताचा पाठिंबा कायम राहणार असल्याचे सांगितले. द्विपक्षीय मालिका या दोन्ही संघांना मजबूत प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध नियमितपणे खेळण्याची आणि महत्त्वाचा अनुभव मिळवण्याची संधी देतात, असे त्यांनी नमूद केले.

बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी भारत-अफगाणिस्तान क्रिकेटमधील वाढत्या संबंधांचा उल्लेख केला. दोन्ही संघांमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक रंगतदार सामने झाले असून, अफगाणिस्तानचे खेळाडू भारतीय चाहत्यांमध्येही लोकप्रिय असल्याचे त्यांनी सांगितले.

२०१८ मध्ये भारताने अफगाणिस्तानच्या ऐतिहासिक पहिल्या कसोटीचे यजमानपद स्वीकारले होते. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये सातत्याने द्विपक्षीय क्रिकेट होत आहे. नुकतेच जूनमध्ये भारताने अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी आणि वनडे मालिकेचे आयोजन केले होते. आता टी-२० मालिकेमुळे दोन्ही संघ तीनही फॉरमॅटमध्ये एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मीरवाइज अशरफ यांनी ही मालिका अफगाणिस्तान क्रिकेटसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. भारतात द्विपक्षीय मालिकेचे आयोजन करणे ही अफगाणिस्तानसाठी मोठी बाब असून, बीसीसीआयच्या सहकार्याचे त्यांनी कौतुक केले.

अफगाणिस्तानने अलीकडच्या काळात भारत आणि यूएईमध्ये आपले सामने आयोजित केले आहेत. मात्र या मालिकेचे महत्त्व आणि व्याप्ती लक्षात घेता भारत हे या मालिकेसाठी योग्य ठिकाण असल्याचे अशरफ यांनी म्हटले.

आता दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर राशिद खानच्या अफगाणिस्तानची फिरकी आणि भारताच्या स्टार खेळाडूंची फटकेबाजी असा क्रिकेटचा तडका पाहायला मिळणार आहे. १३ सप्टेंबरपासून तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरुवात होणार असून, क्रिकेट चाहत्यांसाठी ही मालिका चांगलीच रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत.

Exit mobile version