भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तानचे १२ वाजवले

भारताने जिंकली सलग १२वी लढत

भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तानचे १२ वाजवले

भारतीय महिला संघाने पुन्हा एकदा सिद्ध केलं की, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांमध्ये स्पर्धात्मक असे काही शिल्लक राहिलेले नाही. कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर रविवारी (५ ऑक्टोबर) झालेल्या महिला विश्वचषक सामन्यात भारताने पाकिस्तानचा ८८ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने पाकिस्तानविरुद्धच्या कामगिरीत १२-० अशी अद्वितीय आघाडी कायम ठेवली. २००५मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध पहिला विजय मिळविला होता, त्यानंतर महिलांनी ही विजयी मालिका पुढील २० वर्षे कायम ठेवली. 

हा फक्त महिला क्रिकेटमधीलच नव्हे तर सलग चौथ्या रविवारी भारताने पाकिस्तानवर विजय मिळवलेला आहे. पुरुष संघाने आशिया कपमध्ये रविवारीच विजय मिळवला होता आणि आता महिलांनी त्याच परंपरेला पुढे नेत पुन्हा पाकिस्तानला नमवले. या विजयामुळे भारताने चार गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवलं.

त्याआधी नाणेफेकीदरम्यान नाट्य रंगले. भारताची कप्तान हरमनप्रीतने नाणे उडवल्यावर पाकिस्तानी कर्णधाराने काटा असे पुकारले. पण प्रत्यक्षात नाणे खाली पडल्यावर छापा आला होता. मात्र पाकिस्तानी कर्णधार छापाच म्हणाली असा अर्थ काढून पंचांनी पाकिस्तानला फलंदाजी किंवा गोलंदाजीतील एकाची निवड करण्याची संधी दिली. त्याप्रमाणे पाकिस्तानने प्रथम गोलदाजी स्वीकारली. भारताचा डाव २४७ धावांवर आटोपला. भारताच्या कोणत्याही फलंदाजाला अर्धशतक गाठता आले नाही.

भारताची  स्मृती मंधाना (२३), प्रतिका रावल (३१), हरमनप्रीत कौर (१९), हरलीन देओल (४६), जेमिमा रॉड्रिग्ज (२५) यांनी योगदान दिले. पण ते पुरेसे नव्हते. भारतीय फलंदाजांनी अनेक निर्धाव चेंडू खेळले त्यामुळे त्यांना योग्य धावगती ठेवता आली नाही. मधल्या षटकांत पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाज सादिया इक्बाल, नाश्रा संधू आणि रामीन शमिम — यांनी नियंत्रण ठेवून भारतावर दडपण आणलं.

पाकिस्तानकडून डायना बेगने १० षटकांत ६९ धावा देत ४ विकेट्स घेतल्या, तर फातिमा सनाने जखमी असूनही १० षटकांत ३८ धावा देत २ बळी घेतले.

पाकिस्तानला मात्र ही धावसंख्याही जड गेली. पाकिस्तानचा डाव सुरुवातीपासूनच दबावाखाली होता. त्यांनी पॉवरप्ले मध्ये फक्त २५ धावा करत दोन विकेट्स गमावल्या. मुनीबा अलीला दीप्ती शर्माच्या थेट थ्रोने बाद केलं, तर सदफ शामासलाही क्रांती गौडने बाद केलं. सिद्रा अमीन (८१) आणि नतालिया परवेज (३३) यांनी चौथ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केली, पण आवश्यक रनरेट सतत वाढत राहिला. क्रांती गौडने परवेजला बाद करून ती भागीदारी मोडली.

फातिमा सना दीप्ती शर्मावर फटका खेळताना स्मृतीकडून लाँग-ऑनवर झेलबाद झाली. सिद्रा मात्र भारताविरुद्ध वनडे सामन्यात षटकार मारणारी पहिली पाकिस्तानी फलंदाज ठरली आणि ८२ चेंडूंवर तिने अर्धशतक पूर्ण केलं. ती शेवटी १०६ चेंडूंवर ८१ धावा करून स्नेह राणाकडून बाद झाली. दीप्ती शर्माने सादिया इक्बालला बाद करत पाकिस्तानला १५९ धावांवर (४३ षटके) गुंडाळलं.

हे ही वाचा:

‘चार वेळा दहशतवाद्यांना भेटलो’

पूरस्थितीच्या नुकसानीचा अहवाल पाठवा, मोदी विनाविलंब मदत देणार!

बिहार निवडणुकीपूर्वी ‘बुरख्या’वरून वाद!

दंत शस्त्रक्रिया पदवीधारक तरुणाची अमेरिकेत गोळी घालून हत्या!

भारताने जरी या सामन्यात विजय मिळवला असला, तरी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात काही कमकुवत दुवे स्पष्ट दिसले.
पाकिस्तानच्या फिरकीसमोर भारताची मधली फळी कोसळली. क्षेत्ररक्षणातही भारताने तीन झेल सोडून पाकिस्तानचा आत्मविश्वास वाढवला. डीआरएसचा वापर देखील निराशाजनक ठरला. दोनही रिव्ह्यू भारताने वाया घालवले.

आता भारताचा पुढील सामना ९ ऑक्टोबरला विशाखापट्टणममध्ये लॉरा वुल्वार्ड्टच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.
भारतीय संघाकडे या दरम्यान तीन दिवस आहेत — जेणेकरून या छोट्या चुका सुधारता येतील.

Exit mobile version