आर. अश्विन उस्मान तारिकच्या समर्थनार्थ

गोलंदाजी अ‍ॅक्शनवरील वादावर प्रतिक्रिया

आर. अश्विन उस्मान तारिकच्या समर्थनार्थ

भारतीय संघाचा माजी दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज उस्मान तारिकच्या समर्थनार्थ उभा राहिला आहे. आपल्या गोलंदाजी अ‍ॅक्शनमुळे टीकेचा धनी ठरत असलेल्या तारिकबाबत अश्विनने स्पष्ट मत व्यक्त करताना नियम केवळ गोलंदाजांसाठीच मर्यादित ठेवू नयेत, असे म्हटले आहे.

बुधवारी माजी क्रिकेटपटू श्रीवत्स गोस्वामी यांनी तारिकच्या रन-अपदरम्यान थांबण्याच्या शैलीवर टीका केली होती. त्यांनी याची तुलना फुटबॉलमधील त्या नियमाशी केली, ज्यामध्ये पेनल्टी घेताना खेळाडूंना रन-अपदरम्यान थांबण्यास मनाई असते.

गोस्वामी यांनी ‘एक्स’वर लिहिले की, “फुटबॉलमध्येही आता पेनल्टी रन-अपदरम्यान थांबता येत नाही. मग हे कसे योग्य ठरू शकते? अ‍ॅक्शन ठीक आहे, पण चेंडू टाकताना थांबणे मान्य होता कामा नये.”

यावर प्रत्युत्तर देताना अश्विनने म्हटले की, “फुटबॉलमध्ये परवानगी नसल्याचे मान्य आहे. पण फलंदाजाला अंपायर किंवा गोलंदाजाला न सांगता स्विच-हिट किंवा रिव्हर्स शॉट खेळण्याची मुभा असेल, तर निर्बंध फक्त गोलंदाजांवरच का? गोलंदाजाला अंपायरला न सांगता गोलंदाजीचा हात बदलण्याची परवानगी नाही. आधी तो नियम बदलायला हवा.”

या वक्तव्यानंतर अश्विनला सोशल मीडियावर टीकेला सामोरे जावे लागले. त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देताना लिहिले की, “गोलंदाजी अ‍ॅक्शनची वैधता केवळ आयसीसीच्या अधिकृत तपासणी केंद्रातच ठरवता येते. १५ अंशांच्या नियमाअंतर्गत गोलंदाजाची कोपर सरळ असावी लागते. मैदानी पंचांना प्रत्यक्षात तो १५ अंशांच्या मर्यादेत आहे की नाही, हे ठरवणे कठीण असते. यासाठी रिअल-टाइम तपासणी यंत्रणा आवश्यक आहे. ही बाब ‘ग्रे एरिया’मध्ये येते आणि कोणावरही त्याचा गैरफायदा घेतल्याचा आरोप करणे योग्य नाही. क्रीजवर थांबणे पूर्णपणे वैध आहे, कारण ते त्याच्या नियमित अ‍ॅक्शनचा भाग आहे.”

उस्मान तारिकच्या गोलंदाजी शैलीत हाताच्या हालचालीत स्पष्ट वाकणे आणि वेगळ्या पद्धतीचा रन-अप दिसून येतो. त्यामुळे त्याच्या अ‍ॅक्शनची कायदेशीरता आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कसोटीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात तारिकने ३ बळी घेत पाकिस्तानच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर त्याच्या गोलंदाजी अ‍ॅक्शनवरून पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे.

Exit mobile version