भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय क्रिकेट मालिका सुरू आहे. रविवारी वडोदरा येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने ४ गडी राखून विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसरा एकदिवसीय सामना बुधवारी राजकोटमध्ये होणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ मालिका आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करेल, मात्र राजकोटमधील जुना एकदिवसीय सामना इतिहास टीम इंडियासाठी चिंतेचा ठरत आहे.
राजकोट येथील निरंजन शाह क्रिकेट मैदानावर भारतीय संघाने आतापर्यंत चार एकदिवसीय सामने खेळले आहेत. यापैकी तीन सामन्यांमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे.
या मैदानावर भारताने पहिला एकदिवसीय सामना २०१३ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. त्या सामन्यात इंग्लंडने ९ धावांनी विजय मिळवला होता. २०१५ मध्ये भारताचा दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाला, ज्यात दक्षिण आफ्रिकेने १८ धावांनी विजय मिळवला. २०२० मध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी झाला होता आणि त्या वेळी भारतीय संघाने ३६ धावांनी विजय मिळवला होता. हा या मैदानावरील भारताचा एकमेव विजय ठरला आहे. त्यानंतर २७ सप्टेंबर २०२३ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताला ६६ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. चार सामन्यांपैकी तीन पराभव हे टीम इंडियासाठी नक्कीच चिंतेचे कारण ठरत आहेत. विशेष म्हणजे तिन्ही वेळा भारताला धावांचा पाठलाग करताना अपयश आले, तर एकमेव विजय प्रथम फलंदाजी करताना मिळाला होता.
हेही वाचा:
जगातील सर्वात मोठ्या ३३ फुटी शिवलिंगाची होणार प्राणप्रतिष्ठा
आयसीसीने बांगलादेश क्रिकेट बोर्डचा बुरखा फाडला; नेमकं प्रकरण काय?
बांगलादेशात २८ वर्षीय हिंदू रिक्षा चालकाची हत्या
रजत भस्म : त्वचेला देईल नवी ऊर्जा
केन विल्यमसन, मॅट हेन्री आणि मिशेल सॅन्टनर यांसारख्या प्रमुख खेळाडूंशिवाय खेळणाऱ्या न्यूझीलंड संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यातही भारतीय संघाला कडवी झुंज दिली होती. विराट कोहली यांची उत्कृष्ट फलंदाजी आणि न्यूझीलंड संघाचे खराब क्षेत्ररक्षण यामुळे सामना भारताच्या बाजूने झुकला. त्यामुळे राजकोटमध्ये भारतीय संघाला अधिक सावध राहावे लागणार आहे. प्रमुख खेळाडू नसतानाही न्यूझीलंड संघात पलटवार करण्याची पूर्ण क्षमता आहे.
राजकोटमधील हा एकदिवसीय सामना दुपारी १:३० वाजता सुरू होणार असून नाणेफेक दुपारी १ वाजता होईल.
