केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी भारतीय विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसनचा सन्मान केला. टी२० विश्वचषक २०२६ मध्ये भारताच्या विजेतेपदात मोलाची भूमिका बजावणाऱ्या सॅमसनला सोमवारी (१६ मार्च) ‘क्लिफ हाऊस’ या अधिकृत निवासस्थानी आमंत्रित करण्यात आले होते.
संजू सॅमसनने टी२० विश्वचषक २०२६ मध्ये ५ सामने खेळत ८०.२५ च्या सरासरीने ३२१ धावा केल्या. तो स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर होता. नामिबियाविरुद्ध २२ आणि झिम्बाब्वेविरुद्ध २४ धावा केल्यानंतर त्याच्या प्लेइंग इलेव्हनमधील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, वेस्ट इंडिजविरुद्धच्या सुपर-८ सामन्यात त्याने नाबाद ९७ धावांची खेळी करत संघाला उपांत्य फेरीत नेले.
उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध सॅमसनने ८९ धावांची शानदार खेळी केली आणि भारताच्या विजयाचा नायक ठरला. अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्धही त्याने ८९ धावा करत भारताला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
या सत्कार सोहळ्यात ३१ वर्षीय संजू पारंपरिक वेशात उपस्थित होता. मुख्यमंत्री विजयन यांनी त्याला एक खास स्मृतिचिन्ह भेट दिले, ज्यावर लिहिले होते, “आम्ही संजू विश्वनाथ सॅमसनला सलाम करतो.” या स्मृतिचिन्हावर नॉकआउट फेरीतील त्याच्या महत्त्वाच्या खेळींचा (९७*, ८९, ८९) उल्लेख करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री विजयन यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वर फोटो शेअर करत लिहिले, “काल (सोमवार) क्लिफ हाऊस येथे भारताचा अभिमान आणि केरळचा सुपुत्र संजू सॅमसनचे स्वागत करताना मला खूप आनंद झाला. केरळमधील जनतेचा प्रेम आणि आनंद मी त्याच्यापर्यंत पोहोचवला. त्याने पुढेही अशाच उंची गाठाव्यात, हीच अपेक्षा. त्याला मनःपूर्वक शुभेच्छा.”
विश्वचषक जिंकल्यानंतर आता संजू सॅमसन आयपीएलच्या तयारीत व्यस्त झाला आहे. यंदाच्या हंगामात तो पाच वेळा विजेतेपद पटकावलेल्या चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाकडून पदार्पण करणार आहे.
